Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पेट्रोल पंपाचा मालक पोलिसांना मामा बनवतो तेव्हा….पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरून मारहाण …..मालकानेच केली दरोडा पडल्याची बतावणी….पोलीस आले धावून …..मालक गेला भांबावून…..

नॅशनल फोरम/ पुणे/ दि/ प्रतिनिधी/(वृत्तविश्लेषण)
पोलिसांना विनाकारण फार काळ तुम्ही मामा बनवू शकत नाही. शेकडो नव्हे तर हजारो आणि लाखो सरावलेले गुन्हेगार पोलिसांच्या हाताखालून गेलेले असतात. समाज माध्यमांमध्ये एखादा व्यक्ती कितीही प्रामाणिकपणाचे ढोंग घेऊन फिरत असला, तरी त्या सोंगाड्याचे सोंग पोलीस प्रशासनाला चांगलेच ठाऊक असते. परंतु जोपर्यंत संबंधित इसम कायद्याच्या चाकोरीत येत नाही, तोपर्यंत त्याचं लबाड लांडग्यासारखं वागणं जनतेसमोर मांडता येत नाही. परंतु अशी ढोंग धतुर करणारे मानभावी मंडळी तशीही कमी नाहीत.
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची तक्रार आल्यानंतर पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 1 यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली. शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी आरोपींना 4 तासात अटक केली. आरोपी अटक केल्यानंतर जे काही समोर आलं ते सर्व आश्चर्यचकित करण्यासारखे होते. मुळातच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्या वादाचे पर्यवासन मारहाणीत झाले होते. तथापि पेट्रोल पंपाच्या मालकाने कथित बतावणी करून पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर सर्व पोलिसांची पळापळी झाली. त्याबाबतची हकिकत अशी की,

दि. 26 फेब्रुवारी रात्री शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत पुणे महानगरपालिकेजवळील भारत पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची बातमी प्रसारित होताच, पोलीस परिमंडळ एक चे पोलीस उपआयुक्त श्री.संदीपसिंह गिल्ल, सहाय्य पोलीस आयुक्त विश्रामबाग श्री वसंत कुवर यांनी भेट देऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वात एक टीम तयार करण्यात आली होती. या पोलिस टीमला तत्काळ गुन्हेगारांना पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर पेट्रोल पंपाचे मालक सचिन अनिल शहा यांना बांबूने डोक्यावर मारहाण झाल्याने त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांच्या पेट्रोल पंपावरील कामगार फिर्यादी श्री नवनाथ कसरू काळे, वय 26 वर्ष यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली.

दरम्यान पोलिस अंमलदार श्री.आदेश चलवादी यांना तांत्रिक तपास व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तीन अनोळखी आरोपींचा शोध गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बडे व पथकाने घेतला असता, त्यांची नावे 1. सुरजीतसिंग युवराजसिंग जुनी वय 24 वर्ष रा. पाटील इस्टेट पुणे 2. जयसिंग जलसिंग जुनी वय -19 वर्ष रा. पाटील इस्टेट व 3.  शिवसिंग नसीब सिंग जुनी वय 17 वर्ष रा. हडपसर पुणे यांना पुण्यातील मोटरसायकल सह ताब्यात घेऊन चौकशी केली असता, वरील सर्व प्रकार हा पेट्रोल पंपावर दरोडा नसून पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याचे उघड झाले आहे.

शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला असून आरोपीविरुद्ध भादवि कलम 452, 324, 427, 34 सह  कलम 128 (1), 194, 3(1) 181 नुसार गुन्हा नोंद करून अनुक्रमांक एक व दोन यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील हत्यार हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील या करीत आहेत.

या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर सावंत,  बाजीराव नाईक, सपोनी सविता सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार भिवरे, सय्यद, रुपेश वाघमारे, साठे, पवार, मेंगडे, केंगले, वाघ, निकाळजे, शितोळे ,धावडे, धाडस, तायडे, चालवादी यांनी केली आहे.

दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील व पुणे महानगरपालिके सारख्या गजबजलेल्या रस्त्यावर दरोडा पडणे शक्य नव्हते. तरी देखील पोलीस यंत्रणेला खोटी माहिती देऊन पेट्रोल पंपाच्या मालकांनी संपूर्ण पोलीस यंत्रणेला वेठीस धरले होते. पेट्रोल भरण्यावरून वाद होणे, मारहाण होणे ही नित्याची बाब असली तरी दरोडा पडल्याची बतावणी करून पोलीस यंत्रणेला वेठीस धरणे योग्य ठरत नव्हते. पोलिसांना सहजपणे मामा बनवणे शक्य नसते हे पुण्यातील गुन्हेगारांसह व्यापारी वर्गाने ही लक्षात घेणे आवश्यक ठरते.