
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत असल्याचे पत्र पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्वेसर्वा खासदार सुप्रिया सुळे यांना पाठविले होते. खासदार सुळे यांनी देखील पोलीस आयुक्तांच्या पत्रावर दुसरे पत्र रवाना करून पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान पुणे शहरात दररोज गावठी कट्टे, बंदूका, लोखंडी कोयते पोलीस अंमलदारांकडून जप्त केले जात आहेत. त्यात भरीस भर म्हणून घरफोडी, दरोडा, फसवणूकीच्या प्रकरणात देखील कमालिची वाढ झाली आहे. लोकसेवक व लोकप्रतिनिधींच्या वाकःयुद्धात पुणेकर मात्र भरडले जात आहेत. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था असल्यामुळे की काय पुणे शहरात पुन्हा 37 (1) (3) कलम लागु करण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांना पुन्हा नव्याने आरासा दाखविण्याची आवश्यकता नाही हेच खरे. मागील दोन दिवसांत पुणे शहरावर सुमारे दोन कोटी रुपये पेक्षा अधिक रकमेचा दरोड, घरफोडी व फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत. पोलीस स्टेशन, पोलीस अंमलदार अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहेत, यात वादच नाही. पुणे शहरातील गुन्हे शाखा देखील चिकाटीने कर्तव्यपालन करीत आहेत ही वस्तुस्थिती आहे. तरी देखील शरीराविरूद्ध व मालमत्ते विरूद्धचे गुन्हे सातत्याने घडत असल्याची चिंताजनक परिस्थिती पुणे शहरात निर्माण झाली आहे. यात राजकीय व सामाजिक बाबी असल्या तरी बेरोजगारी, महागाई आणि नोकऱ्यांचा वावणा ह्या बाबी देखील याला कारणीभूत ठरत आहे की काय अशी शंका येते.
- सायबर पोलीस स्टेशन- 1 कोटी 15 लाख
- सिंहगड रोड पोलीस स्टेशन – 9 लाख 93 हजार
- विश्रामबाग पोलीस स्टेशन – 9 लाख 80 हजार
- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन- 4 लाख 10 हजार व 12 लाख 44 हजार
- फरासखाना पोलीस- 1 लाख रुपये
- हडपसर पोलीस – 3 लाख रुपये
- स्वारगेट पोलीस- 58 हजार 500 रुपये
- चंदननगर पोलीस – 70 हजार रुपये
- लक्ष्मीनगर पोलीस – 2 लाख 50 हजार
- बिबवेवाडी पोलीस – 5 हजार 700 रुपये
कुठे किती रुपयांचा दरोडा पडला –
शेअर ट्रेडिंग मध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवुन, दत्तवाडीतील 48 वर्षीय इसमाची 1 कोटी 15 लाखांची फसवणूक-
सायबर पोलीस स्टेशनकडील नोंदीनुसार, दत्तवाडीतील एक 48 वर्षीय इसमाने दि. 15/11/2025 ते 24/12/2025 या कालावधीत फिर्यादी यांना अज्ञात मोबाईलधारकाने संपर्क करून शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. तसेच पैसे ट्रांन्सफर करण्यास सांगुन त्यंची 1 कोटी 15 लाख 32 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. अधिक तपास श्रीमती संगिता देवकाते करीत आहेत.
सिंहगड रोड पोलीस स्टेशन -ॲप डाऊनलोड करण्याच्या बहाण्याने 9 लाख 93 हजाराची फसवणूक-
सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत एक 87 वर्षीय फिर्यादीस दि. 9/2/2026 ते 13/2/2026 या कालावधीत अज्ञात मोबाईलधारकाने युनो ॲप डाऊनलोड करण्याच्या बहाण्याने, फिर्यादीच्या मोबाईलचा ॲक्सेस घेवून, त्यांची 9 लाख 93 हजार 772 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. यात मोबाईलधारक, लिंकधारक व बँक खातेधारक व वापरकर्ते या आरोपींविरूद्ध सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. समीर गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
बिटकॉईन करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 12 लाख 44 हजारांची फसवूणक-
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील एक 31 वर्षीय फिर्यादी (रा. आंबेगाव बुद्रुक) यांना मोबाईलधारक, लिंकधारक, बँक खातेधारक व वापरकर्ते या आरोपींनी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवुन, व्हॉटसॲप गु्रपमध्ये ॲड करून, बिटकॉईन करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादींना त्यांचे मोबाईलवर लिंक पाठवुन त्याव्दारे अकाऊंट ओपन करण्यास सांगुन चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवुन वेगवेगळ्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगुन फिर्यादी यांची 12 लाख 44 हजार 900 रुपयां आर्थिक फसवणूक केली आहे.
आरोपींविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील करीत आहेत.
भारती विद्यापीठ हद्दीत एकाच दिवशी 3 घरफोड्यात 4 लाखाची लुट
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत एकाच दिवशी 3 घरफोड्यांची घटना घडली आहे. यात 1. मनमंदिर बिल्डींग, विश्वजीम जवळ, कात्रज-कोंढवा रोड पुणे, 2. ऋतुपर्ण बिल्डींग, गुजरवाडी रोड, कदम बंगल्याजवळ कात्रज व 3. गुलाब पुष्प अपार्टमेंट, पॅरामाऊंट गार्डन जवळ, कात्रज कोंढवा रोड येथे राहते घराचे/फ्लॅट बंद असतांना, त्यांचे फ्लॅटचे कडी कोयंडा व कुलूप कशाच्या तरी सहायाने उचकटून त्यावाटे आत प्रवेश करून पहिल्या प्रकरणांत बेडरूम मधील कपाटातील 15 हजार रुपये रोख, व सोन्याचे दागिने असा एकुण 1 लाख 73 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.
दुसऱ्या घटनेत एका इसमाचे घरातील 25 जजार रुपये रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा एकुण 60 हजार रुपयांचा ऐवज व तिसऱ्या घटनेत 10 हजार रुपये रोख व सोन्या चांदीचे दागिने असा एकुण 1 लारख 77 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. यात एकुण 4 लाख 10 हजार रुपयांची घरफोडी चोरी करून नेली आहे. याबाबत एक 65 वर्षीय महिलेने फियाद दिली आहे. अज्ञात चोरट्यांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी करीत आहेत.
पीएमपीएल बस प्रवासात एक लाखाचे मंगळसुत्र केले लंपास
फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतून एक 33 वर्षीय महिला रा. हडपसर ह्या दुपारी पावणेबाराच्या सुमारास लाल महाल चौकातून पुढे शिवाजी रोडने बस प्रवास करीत असतांना, प्रवासादरम्यान यातील दोन अनोळखी महिलांनी बस मधील गर्दीचा फायदा घेवून फिर्यादी यांच्या गळातील सुमारे एक लाख रुपये किंमतीचे मंगळसुत्र कशाच्या तरी सहाय्याने कट करून चोरी केली.
दोन अनोळखी महिलांविरूद्ध फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा पोलस फौजदार मेबबुब मोकाशी करीत आहेत.
सिगारेट देणे पडले महागात, तीन लाखाच्या सोन्याच्या साखळीला हिस्का मारून चोरटे पसार
हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील जैन मंदिर शेजारी गुरूड वस्ती ससाणे नगर येथे काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल वरील दोन अनोळखी इसमांनी सिगारेटची मागणी केली. सिगारेट देण्यासाठी फिर्यादी हे खाली वाकले असता, अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे 3 लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरीने हिस्का मारून चोरी करून मोटार सायकलवर पळून गेले. हडपसर येथील एका 65 वर्षीय इसमाने हडपसर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, अनोळखी इसमांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक सत्यवान गेंड करीत आहेत.
25 वर्षीय महिलेच्या हातातील 70 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकाविला
चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील एचडीएफसी बँकचे जवळ जुना मुंढवा रोड, रिलायंन्स मार्ट जवळ वडगाव शेरी येथे एक 25 वर्षीय महिला रा. वडगाव शेरी ह्या आठ वाजण्याच्या सुमारास पायी जात असतांना मोटारसायकल वरील एक अनोळखी इसमाने त्यांचे जवळ येवून, फिर्यादीच्या हातातील 70 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन जबरीने हिसकावून चोरी करून नेला. अनोळखी इसमाविरूद्ध चंदन नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत.
शेअर ट्रेडिंग मध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवुन 9 लाख 80 हजाराला गंडा
विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीतील एक 52 वर्षीय फिर्यादी (रा. सेनादत्त पेठ, भिडे हॉस्पीटलचे समोर पुणे) यांना दि. 8/5/2026 ते 24/5/2026 या कालावधीत आरोपीत मोबाईलधारक, बँक खातेधारक व वापरकर्ते (अटक नाही) यांनी शेअर ट्रेडींग मध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करून चांगला परवाना देण्याचे आमिष दाखविण्यात आले. यासाठी आरोपींनी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगुन फिर्यादी यांची 9 लाख 80 हजार रूपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. मोबाईलधारक, बँक खातेधारक व वापरकर्ते अज्ञात आरोपी विरूद्ध विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलस निरीक्षक गुन्हे श्री. नवनाथ जगताप करीत आहेत.
महिलेची दिशाभुल करून अडीज लाख लांबविले
लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एक 50 वर्षीय फिर्यादी ह्यांना येरवडा गाडीतळ मच्छी मार्केट जवळ सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आरोपी अनोळखी महिलेने दिशाभुल करून फिर्यादीकडील 2 लाख 50 हजाररुपयांची सोन्याचे दागिने चोरी करून पसार झाली आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक लिंगाडे करीत आहेत.
स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील, स्वारगेट एसटी स्टँडवर एक 41 वर्षीय महिला (रा. काचीमेट नागपुर, दत्तवाडी) ह्या श्रीगोंदा ते स्वारगेट पुणे या एसटी बसने प्रवास करीत असतांना, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बस मधील गर्दीचा फायदा घेवून फिर्यादी महिलेच्या पर्समधुन साडेतीन हजार रोख व सोन्याचे दागिने असा एकुण 58 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक संजय शिरसाठ करीत आहेत.
बिबवेवाडी पोली स्टेशन हद्दीत एका 24 वर्षीय डिलेव्हरी बॉय कडील 700 रुपये रोख व 5 हजार रुपयांचा मोबाईल चोरी केला आहे. एका 24 वर्षीय युवकाने फिर्याद दिली असून त्यात नमूद केले आहे की, आरोपी केतन टेमकर वय 23 वर्ष व खुशाल उर्फ दाद्या शिंदे वय 24 वर्ष यांनी रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेवून, फिर्यादी यांच्या गाडीवर बसुन आराडा ओरडा करू नको नाही तर तुझे काम होईल असे म्हणून फिर्यादीला दोन तीन गल्ल्यांत फिरविले. आरोपींवरूद्ध बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक अमोल माने करीत आहेत.
निष्कर्ष –
गुन्हेगारांना, आरोपींना पोलीसांचा धाक राहिला नाही. नागरीकही निष्काळजीपणे वागत असतील तर जबाबदारी नेमकी घ्यायची तरी कुणी हा प्रश्नही अनुत्तरीत राहतो. तसंही पोलीस काही देव नाहीत, व ते चमत्कारी बुवा आणि बाबाही नाहीत. गुन्हा दाखल झाला की जादूच्या कांडीने आरोपीला पकडतील अशी भाबडी आशाही बाळगणे गैर आहे. नागरीकांनी देखील सजग आणि सतर्क राहिले पाहिजे यात वादच नाही.
