Friday, June 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

बंदूका सापडतात भारतीच्या हद्दीत, फायरिंग होते सहकारनगरात…

सर्व आरोपी आणि फिर्यादी सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीच्या बाहेरचे, तरीही हद्दीत फायरिंगच्या दोन घटना

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/(विश्लेषण)
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदे हायस्कुल जवळील बिकानेर चौक गजलक्ष्मी सोसायटीजवळ बुधवार (दि. 10 जून) रात्री साडेनऊच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या गोळीबारापूर्वी धनकवडी बालाजीनगर येथे आंदेकर टोळीने गोळीबार केल्याची घटना घडली होती. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत दोन्ही ठिकाणे येत असले तरी, गोळीबार करणारे आरोपी आणि फिर्यादी हे सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीबाहेरील असल्याचे समोर आले आहे. तथापी मागील सहा महिन्यांतील ऑर्म ॲक्ट नुसार सर्वाधिक जास्त अग्निशस्त्रे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत जप्त करण्यात आली आहेत. परंतु फायरिंगसाठी सहकारनगरची जमीन निवडली गेली आहे काय अशी शंका उपस्थित होत आहे.

शिंदे हायस्कुलजवळ फायरिंग –
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदे हायस्कुल जवळ गोळीबाराची घटना घडली आहे. त्यातील आरोपी हे जनता वसाहत येथे राहणारे असल्याचे व फिर्यादी हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व सहकारनगर पोलीस स्टेशनच्या बॉर्डरवर राहत असून, संबंधित फिर्यादींचा बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत जिम आहे. जीम मधील कामकाज संपवुन, संबधित फिर्यादी घरी जात असतांना, फळे व भाजी घेण्यासाठी शिंदे हायस्कुलच्या कोपऱ्यावर थांबला असतांना, आरोपींनी त्यांच्यावर फायरिंग केल्याचे समोर आले आहे. पार्कींगच्या वादातून मारहाण व गोळीबार झाला आहे. हे टोळीयुद्ध नसले तरी, आरोपी आणि फिर्यादी हे सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील नाहीत.
पहिल्या घटनेत धनकवडी, बालाजीनगर चौकातील शाहु बँकेजवळ (भारती विदयापीठ पोलीस स्टेशन ते शाहू बँकेचे अंतर निव्वळ 500 मिटर म्हणजे अर्धा किलो मिटर आहे.) गोळीबाराची घटना घडली. आंदेकर टोळीने हा गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले असले तरी, संबंधित गोळीबार करणारे आरोपी व फिर्यादी हे नाना पेठ, गुरूवार पेठेतील म्हणजे खडक व समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील होते. त्यातही सहकारनगर पोलीस स्टेशनचा संबंध दिसून येत नाही. निव्वळ फायरिंग करण्यासाठी सहकारनगर पोलीस स्टेशनची हद्द वापरली जात असल्याचा कयास बांधायला काही हरकत नाही.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बंदुका, पिस्टल, लोखंडी कोयत्यांचा खच पडलाय-
एक वर्ष कशाला, निव्वळ सहा महिन्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यांचा आढावा घेतला तर ऑर्म ॲक्ट नुसार 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. यात विधीसंघर्षित बालकांसह सराईत गुन्हेगारांकडून बंदुका, पिस्टल सारखे अग्निशस्त्रे व लोखंडी कोयते मोठ्या संख्येने जप्त करण्यात आले आहेत. कोयत्यांपेक्षा अग्निशस्त्रांची संख्या मोठी आहे.
पुणे शहरात 15 ते 20 हजार पोलीस कार्यरत आहेत. त्यातील 1 ते 5 क्राईम युनिट, तसेच वेगवेगळे 25 पेक्षा अधिक युनिट्स, सर्व पोलीस स्टेशन मधील अंमलदार व डीबी शाखा सातत्याने कार्यरत असतांना, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतच अधिक संख्येने अग्निशस्त्र जप्त केल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. त्यातही एका विशिष्ठ पोलीस अंमलदारालाच अग्निशस्त्राची खबर मिळते.

एकाच पोलीसाला अग्निशस्त्राची खबर कशी मिळते-
अग्निशस्त्र घेवून अमुक एक इसम पुलाखाली थांबला आहे, अमुक एक इसम पुलावर थांबला आहे, तमुक एक इसम झाडाखाली थांबला आहे, अमुक एक इसम जिन्स पँट घालुन दुचाकीवर थांबला आहे, रिक्षात बसला आहे, फार व्हिलर मधुन जात आहे. …. आणि त्याच्याकडे वा त्याच्या कमरेला एक अग्निशस्त्र आहे. अशीच खबर एकाच पोलीस अंमलदाराला समजते. एकाच अंमलदाराला खबऱ्याकडून खबर मिळते ही आनंदाची व अभिमानाची बाब असली तरी 15 ते 20 हजार पोलीसांना अशी खबर का मिळत नाही अशीही शंका येत आहे. पोलीस स्टेशन मधील डीबीवाल्यांना हद्दीत टाचणी पडली तरी त्याचा आवाज येतो, त्यातही आपल्याकडील क्राईम युनिट 1 ते 5 अतिशय सजग आहेत. अमली पदार्थ असो की अग्निशस्त्रातील फरार व पाहिजे आरोपीला शोधून त्याच्या मुसक्या आवळल्या जात असतात. मग त्यांना अशी खबर का मिळत नाही असाही वहीम मनांत घर करून आहे.

आरोपींची पोलीस कोठडी आणि बंदूक विकणारा कोण-
एखाद्या आरोपीकडे कोणतेही अग्निशस्त्र आढळुन आले तर, पोलीसांकडून न्यायालयात आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाते. पोलीसांकडून न्यायालयात सांगितले जाते की, आरोपीने संबंधित अग्निशस्त्र कुठून आणले, त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, संबंधित अग्निशस्त्राचा कुठे वापर करणार होते. याचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी वा त्याची मुदत वाढवुन घेतली जाते. एवढ्या चौकशीत आजपर्यंत पुणे शहरात नेमक कोण अग्निशस्त्र विकत आहे, विक्री करणारा इसम कुठून खरेदी करतो ह्याचा तपास आजपर्यंत पोलीसांना लागला नाही का अशीही शंका येते.

येरवडा युनिर्व्हसिटीतील कानगोष्टी-
युक्रांदचे प्रमुख कुमार सप्तर्षी यांचे येरवडा युनिर्व्हरसिटी हे पुस्तक माझ्या वाचण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी ह्या विद्यापीठात प्रवेश मिळाला. येरवडा युनिर्व्हरसिटी या पुस्तकात नमूद असलेले देवरस यार्ड, गांधी यार्ड, भिशी अर्थात ब्रिटीशांनी 1875 साली बांधलेले स्वयंपाक घर, तसेच पुणे करारावर ज्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांनी सह्या केल्या, ते पाहण्याची संधी मिळाली. ज्या यार्ड मध्ये महात्मा गांधी, सरदार पटेल विश्राम करीत होते, ते पाहण्याचीही संधी मिळाली. दरम्यान विद्यापीठातील काही अंडरट्रायल व दोषसिद्ध शिक्षा बंदीना भेटण्याची व बोलण्याची नामी संधी मिळाली होती. दरम्यान लोखंडी कोयते तर पुणे शहरासह पुण्याच्या ग्रामीण भागात कुठेही मिळतात त्यात शंकाच नाही. परंतु बंदुका नेमक्या कुठून आणल्या जातात, दुसऱ्याच्या भांडणात तिसऱ्याचा प्रवेश कसा होतो, पुढे हाच तिसरा पहिला कसा होतो, त्यातील पहिल्याचा गेम कसा होतो, यातून टोळ्यांचा जन्म होतो तरी कसा, हे चक्र का थांबत नाही, या सारखे काही प्रश्न कायम माझ्या मनांत घोंगावत होते. काही अंडरट्रायल विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या गोष्टी थक्क करणाऱ्या होत्या. (सगळ्याच बाबी प्रकाशित करता येत नाही.नाहीतर सगळ्यांचेच पितळ उघड पडेल.) येरवडा विद्यापीठात भारताच्या भाग्य विधात्यांचा सुर्य मावळला याबाबत पुढे लेखन होणारच आहे. (मध्येच थांबतो)

परंतु महत्वाची बाब अशी की, सर्व आरोपी आणि फिर्यादी सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीच्या बाहेरचे, तरीही हद्दीत फायरिंगच्या दोन घटना कशा घडल्या...हे सर्व कळत नकळत घडले की, प्रि-प्लॅन घडले याबाबत मात्र शंका आहेच. (लेखन मर्यादा)