Sunday, April 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

विमानतळ पोलीसांकडून सराईत गुन्हेगारांचे संरक्षण?

  • विमानतळ पोलीसांकडून महाराष्ट्र शासन व पुणे शहर पोलीसांची बदनामी केली जात आहे काय…?
  • चार पोलीस स्टेशनने हाकलुन लावलेल्या दरोडेखोरास विमानतळ पोलीसांनी हद्दीत प्रवेश का दिला?
  • दोन/तीन महिने हद्दीत दरोडा घालणारा अब्दुल…अचानक अज्ञात इसम झाला तरी कसा ?
  • ह्याच्यावर मोक्का, त्याच्यावर मोक्का, ह्याच्यावर एमपीडीए, त्याच्यावर एमपीडीए, हा तडीपार तो तडीपार.. आणि सराईत गुन्हेगार पुणे पोलीसांच्या डोईवर?

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यामध्ये सुमारे 30 ते 35 वर्ष मटका, जुगारअड्डे चालविणाऱ्या जुगारखोर इसमाने, देवांना देखील सोडले नाही. थेटच वाई येथील मांढरदेवीच्या यात्रेत भोळ्या भाविकांना दुप्पट पैशांचे आमिष दाखवुन, लुटणारा अब्दुल याने जत्रा संपल्यानंतर, चार पोलीस स्टेशनचे दरवाजे ठोठावले. परंतु ही दरोडेखोरी आमच्या हद्दीत नको म्हणून त्याला पिटाळुन लावले. परंतु विमानतळ पोलीस स्टेशन यांनी मात्र त्याला हद्दीत शिरकाव करू दिला. मागील दोन/तीन महिन्यांपासून प्रवाशी व नागरीकांच्या खिशातील नोटांवर आणि ऑनलाईन पेमेंट करायला भाग पाडून त्यांने अक्षरशः विमानतळ हद्दीत धुमाकुळ घातला होता. विमानतळ पोलीसांकडे तक्रारी करून देखील काहीच उपयोग होत नव्हता. परंतु शनिवार दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजी त्याच्या लाल-काळ्या धंदयाचा, दरोड्याचा पर्दाफाश नॅशनल फोरमने केला. तरी देखील रविवारी धंदा सुरू ठेवण्यात आला होता. रविवारी मात्र लुटालुटीची हद्दच झाली. लाल काळा जुगार खेळला नसतांना देखील तु जुगारात जिंकला आहेत, परंतु तु आकड्यावर पैसे लावले नाहीत, त्यामुळे त्याच्यावर पैसे ठेव म्हणून तेथील पंटरांनी त्या प्रवाशास मारहाण केली. ऑनलाईन पेमेंट करून त्याच्याकडुन 35 हजार रुपये काढुन घेण्यात आले. याचा आरडा ओरडा मोठा झाल्याने, अखेर विमानतळ पोलीसांनी अब्दुल विरूद्ध भादवी कलम 392, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच हा गुन्हा मुळ मालकावर न करता, अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे विमानतळ पोलीस सराईत गुन्हेगाराला संरक्षण देत आहेत काय असाही प्रश्न नागरीक विचारू लागले आहेत. या सर्व प्रकारामुळे महाराष्ट्र शासनाची बदनामी होत असून, त्यात पोलीस खात्याची नाहक बदनामी होत आहे.

काय घडले रविवारी-कशी झाली लुटालुट-
बुलढाणा येथे गावी जाण्यासाठी पुणे नगर रस्त्यावरील खराडी बायपास येथे खाजगी प्रवासी बसची वाट पाहात उभारलेल्या तरुणाला जबरदस्तीने लाल-काळा जुगार खेळायला घेऊन जात त्याच्याकडून जबरदस्तीने ऑनलाईन 35 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रविवारी रात्री पावणे नऊ ते सव्वा नऊ वाजण्याच्या दरम्यान खराडी बायपास रोडवर घडला.
याबाबत किशोर एकनाथ खंडागळे, वय-31 रा. मैत्री पार्क, सासवड, ता. पुरंदर यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. यावरुन चार अनोळखी व्यक्तींवर भादवी कलम 392, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुणे नगर रस्त्यावरील खराडी बायपास येथे जुगार अड्डा मांडून बसलेल्या अब्दुल व इतर आरोपींनी त्यांना तुम्ही आत्ताच 35 हजार रुपये जिंकलात, असे सांगितले. मात्र, फिर्यादी यांनी मी अजून खेळलोच नाही. तर मी कसा जिंकलो? असा प्रश्न केला. त्यावेळी आरोपींनी चिडून जाऊन फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच तुझ्याकडे पैसे असल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही, असे बोलून खंडागळे यांच्या मोबाईलवरुन जबरदस्तीने 35 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले, असे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाकडे करीत असल्याचे पोलीस प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

शनिवारीही लुटालुट झाली, तरीही रविवारी जुगार अड्डा सुरू कसा –
पोलीस अंमलदार दरोडेखोरांसोबत अन्‌‍ पोलीस उपआयुक्त हातात दंडूका घेवून पेट्रोलिंगला अशा मथळ्याखाली काल नॅशनल फोरम मध्ये वृत्त प्रसारित केले होते. त्यात शनिवारी रात्रौ 11.30 वाजेपर्यंतचा साद्यंत वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. शनिवारी झालेली लुटालुट, आणि एका प्रवाशी इसमास त्याच्या गळ्यातील मफलरला हिस्का मारून त्याच्याकडील दोन हजार रुपये लुटल्याचा सर्व प्रकार, पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले होते. दरम्यान पोलीस जुगार अड्डा बंद करतील अशी अपेक्षा होती. परंतु रविवारी देखील जुगारअड्डा सुरू असल्याचे दिसून आले आणि वरील प्रकार घडला आहे.

सराईत गुन्हेगार कोण आहे, हे माहिती असतांना अज्ञात इसमावर गुन्हे दाखल करण्याचे प्रयोजन काय- पोलीस गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत काय-
दरम्यान संबंधित जुगार अड्डा चालवणारे इसम कोण आहेत याची परिपूर्ण माहिती विमानतळ पोलिस स्टेशन यांना असणे स्वाभाविक आहे. परंतु अशा सराईत गुन्हेगारांवर गुन्हे दाखल केले नाहीत. त्याचे नाव अब्दुल आहे परंतु त्याचे पूर्ण नाव माहिती नाही. परंतु विमानतळ पोलीसांना तर सर्व माहिती असणे स्वाभाविक आहे. तरी देखील अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करून मागील 30 ते 35 वर्षांपासून टोळी करून, नागरीकांना लुटणाऱ्यावर गुन्हे दाखल न करता, त्या सराईत गुन्हेगाराला पोलीस संरक्षण दिले आहे काय असाही सवाल पुणेकर व्यक्त करीत आहेत.

विमानतळ पोलीसांकडून महाराष्ट्र शासन व पुणे शहर पोलीसांची बदनामी केली जात आहे काय-
मांढरदेव यात्रेत भाविकांना लुटणाऱ्या इसमाने पुणे शहरातील काही पोलीस स्टेशन हद्दीत भागीदारीत धंदे सुरू केले आहेत. त्याबाबत पूर्वीच बातमी प्रसारित केली आहे. दरम्यान मांढरदेव यात्रा संपल्यानंतर, संबंधित सराईत गुन्हेगाराने चार/पाच पोलीस स्टेशनचे उंबरे झिजविले असल्याचे समजले आहे. परंतु अशा दरोडेखोरीस त्यांनी हद्दीत पायही ठेवू दिला नाही. दरम्यान जुगाराच्या नावाखाली दरोडा घालणाऱ्या इसमास विमानतळ पोलीसांनी हद्दीत प्रवेश का करू दिला हा महत्वाचा प्रश्नच आहेच. विमानतळ पोलीसांकडून महाराष्ट्र शासन व पुणे शहर पोलीसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे काय असाही प्रश्न पुढे येत आहे.

ह्याच्यावर मोक्का, त्याच्यावर मोक्का, ह्याच्यावर एमपीडीए, त्याच्यावर एमपीडीए, हा तडीपार तो तडीपार.. आणि सराईत गुन्हेगार पुणे पोलीसांच्या डोईवर-

पुणे शहर पोलीसांनी मागील दोन वर्षात 200 च्या आसपास मकोका या कायदयानुसार गुन्हेगावर व गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करून त्यांना जेरबंद केले आहे. तसेच एमपीडीए नुसार सुमारे 150 च्या आसपास गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात केली आहे. पुणे शहर पोलीसांनी प्रसारित केलेल्या प्रेसनोट मधील मकोका व एमपीडीए कायदयातील आरोपी गुन्हेगारांची वय 18 ते 28 वयोगटातील आहेत. त्यातही अनु. जाती, अनु. जमाती अर्थात दलित व आदिवासी समाजातील तरूणांची संख्या अधिक असल्याचे त्यांचे राहण्याचे ठिकाण व नावे आडनावावरून दिसून येत आहे. तसेच ओबीसी संवर्गातील तरूणांची देखील लक्षणिय संख्या आहे. परंतु पुणे शहरातील मागील 20/25 वर्षांपासून सराईत गुन्हेगार कार्यरत आहेत, त्यांच्यावर नगण्य स्वरूपाची कारवाई असल्याचे दिसून येत आहे. 

वास्तविक पाहता, या विषयावर राजकीय व सत्ताधारी पक्षाने आवाज उठविणे आवश्यक होते. परंतु त्यावर कुणीच काही बोलत नसल्याचे दिसून येत आहे. एस.सी, एस.टी, ओबीसींची संख्या अधिक कशी हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. 30/35 वर्ष संघटीत टोळी करून पुणे शहरात दरोडे घालणाऱ्या इसमावर गुन्हे दाखल होत नाहीत. अज्ञात इसमावर गुन्हे दाखल करून सराईत गुन्हेगारांना पोलीस संरक्षण देत आहेत काय असाही प्रश्न विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत रॉबरी अर्थात दरोड्याच्या प्रकारावरून समोर येत आहे. या सर्व प्रकारामुळे महाराष्ट्र शासन, राज्य सरकार व पोलीसांविरूद्ध नागरीकांच्या मनांत रोष निर्माण होत आहे. शासनाविषयी अविश्वासाची भावना निर्माण होत आहे. शासनाची नाहक बदनामी होत असल्याचे स्थानिक पातळीवर दिसून येत आहे. याबाबत सन्माननिय पोलीस आयुक्तांनीच या सर्व प्रकाराची झाडाझडती घेणे योग्य ठरणार आहे. 

कायदयाने सर्व समान आहेत –
कायदयाने सर्व नागरीक समान आहेत. तसेच कायदयानुसार सर्व गुन्हेगारांना कडक शासन झालेच पाहिजे. त्याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था राहणार नाही हे देखील तितकेच खरे आहे. परंतु एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय हा भेदभाव कायदयाला अपेक्षित नाही. शिक्षापात्र असलेल्या प्रत्येक अपराधाची न्याय चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच अन्वेषण किंवा कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी करणे हेच कायदयाला अपेक्षित आहेत. त्यासाठीच संहितेमध्ये तपासाला अधिक प्राधान्य दिले असून, न्यायपालिका स्वतः देखील हस्तक्षेप करीत नाही. हे देखील कायदयातच नमूद आहे.