Sunday, April 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे कारण पुढे आले….पोलीस अंमलदार दरोडेखोरांसोबत अन्‌‍ पोलीस उपआयुक्त हातात दंडुका घेवून पेट्रोलिंगला….

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum
सुरा आणि सुंदरींचा जागतिक बाजार म्हणून दुबई आणि बँकॉकचा नंबर लागतो. उघडा-नागडा अय्याशीचा बाजार भरलेला असतो. आता हाच जागतिक बाजार पुण्यातील कोरेगाव पार्क, मुंढवा, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन नंतर विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत भरत आहे. विमानतळ पोलीस स्टेशनचे नामांतर करून आता दुबई किंवा बँकॉक पोलीस स्टेशन करणे तेवढे शिल्लक राहिले आहे. दरम्यान पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी नुकतीच मोक्काची 94 वी तर एमपीडीएची 65 वी कारवाई केल्याचे प्रसारित झाले आहे. असे असतांना देखील पुण्यात क्राईम वाढतच आहे. याचा बोध काही करून होत नव्हता. परंतु शनिवारी बँकॉक अर्था विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत फिरत असतांना गुन्हेगारी वाढण्या मागचे कारण पुढे आले आहे. विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस अंमलदार एका जुगार अड्डयावर थांबले होते. थेटच 395 चा गुन्हा. तसेच परिमंडळ पोलीस उपआयुक्त हे पुणे शहरातून बऱ्याचदा हातात दंडुका घेवून पेट्रोलिंग करतांना दिसत आहेत. याचा अर्थ पुणेकरांनी नेमका काय घ्यायचा हे आता पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी खुलासा केलेला बरा.

पोलीस अंमलदार जुगार अड्डयावर थांबणार, आणि मग पोलीस निरीक्षकांसह उपआयुक्त अंमलदारांची कामे करणार काय –
जुगार आणि अय्याशीचा अड्डा असलेल्या विमानतळ पोलीस स्टेशन मधील वास्तव –

सातारा, वाई आणि मांढरदेव देवीच्या यात्रेमध्ये भाविकांना लुटणाऱ्या इसमाने पुण्यात मोठा धंदा सुरू केला असल्याची बाब समजली. त्यानंतर अधिक माहिती घेतली असता, त्याचे नाव अब्दुल असून तो मागील 30 ते 35 वर्षापासून टोळी करून नागरीकांना लुटण्याचे काम करीत असल्याचेही समोर आले. पोलीस स्टेशन निहाय आढावा घेवून झाल्यानंतर, अब्दुल याने विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्डा सुरू केल्याचे समजल्यानंतर, थेटच विमानतळ पोलीस हद्दीचा दौरा केला. त्यात ढाण ढाण वाजणारा डीजे, सुरा आणि सुंदरीचा बाजार भरल्याचे दिसून आले. सर्वात मोठे मॉल्स व कॉल्स सेंटर मुंढवा व विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने कॉल्स सेंटर मधील गलेलठ्ठ पगार आणि पॅकेज घेणाऱ्या अय्याशबहाद्दरांची तर तोबा गर्दी दिसून येत होती. पब, डान्सबार सारख्या अय्याशीच्या ठिकाणी तर चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जिकडे तिकडे ढाणाढाणा डीजे वाजत होता. मला तर 1984 साली रिलीज झालेल्या पाकीजा चित्रपटाची आठवण झाली. मिना कुमारी अर्थातच साहेबजानचे डॉयलॉग समोर आले.

त्याच्याही पुढे आल्यानंतर, अब्दुल भाई त्याच कुबड काढुन जुगार अड्डयाच्या बाजुने टेहळणी करीत असतांना दिसून आला. अब्दुलचे फोटो अगोदरच वाईवरून मिळाले होते. त्यामुळे त्याला ओळखणे सहज शक्य झाले. तसेच कुणाच्या व्यंगावर बोलू नये असे म्हणतात. परंतु वाई आणि मांढरदेव यात्रेत मोठा धुमाकुळ घालुन, भाविकांची लुटमारी केल्याने अशा धुर्त व लबाड इसमाबाबत जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. 

अब्दुलच्या शेजारी पोलीस अंमलदार येऊन थांबला, जुगार अड्डा नव्हे सरळ सरळ दरोडा-
अहमदनगर, (औरंगाबाद) छ. संभाजीनगर, जालना व नागपुरकडे जाणाऱ्या प्रवाशांना ज्यादा पैशांचे आमिष दाखवुन, लाल – काळा बस्टर, आणि तीन पत्तीत जिंकल्याचा आभास निर्माण करून, पुन्हा त्याच्या खिशावर दरोडा टाकत होते. सुमारे दीड ते दोन तास थांबुन त्याचे सर्व गैरकृत्य कॅमेऱ्यात कैद केले. त्याच वेळी तेथे एक पोलीस अंमलदार येवून अब्दुलच्या शेजारीच येवून बसला. 30 ते 35 पंटर आवाज देवून प्रवाशी ग्राहकांना लुटत होते. आणि अब्दुल व पोलीस अंमलदार जवळ थांबुन धंदा किती होतोय, आजु-बाजुला झाडी मारत लक्ष ठेवून होते. पुन्हा एक दोन पोलीस अंमलदार दुचाकी वाहनावर आले आणि गांधीबाबा हातात घेवून तेथून निघुन गेले.

शंभरचे दोनशे, पाचशे चे एक हजार, दोन हजाराचे चार हजार… ऑव… ऑव…
भाई जित गया, भाई जित गया, मुबारक हो, मुबारक हो….

मराठी माणसांना फुकटच्या पैशांची एक्सट्रा गोडी आहे. एकादया बिस्कीट पुड्यात 25 टक्के एक्सट्रा म्हटलं तर लाईन लावुन ती बिस्कीट खरेदी करतील इतके एक्सट्रासाठी उताविळ असतात. देशात कुठेही आर्थिक घोटाळे होत नाहीत. तेवढे घोटाळे महाराष्ट्रात होतात. चिटफंड घोटाळा, दुप्पट पैशांचे आमिषाला बळी पडणारांची संख्या देखील महाराष्ट्रातच अधिक आहे. त्याचा गैरफायदा इथल्या धंदेवाल्यांनी घेतला आहे. एकाच वेळी 15 ते 20 पंटर आपआपसात चिल्लापुकार करून ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. एक पंटर शंभरचे 200, पाचशेचे एक हजार, दोन हजाराचे चार हजार… ऑव ऑव म्हणून पुकारा करतात, तर मध्येच पाच सहा पंटर दुसऱ्या एका पंटरला मध्येच मोठ्याने ओरडून म्हणतो. भाई जित गया, भाई जित गया, मुबारक हो, मुबारक हो… अस ओरडल्यामुळे तर बसची वाट पाहणारे देखील खिशात हात घालुन तीन पत्ती आणि लाल काळावर लावतात. चांगला हजार दोन हजाराला त्याला फाडल्यानंतर, खिसा रिकामा झाल्यानंतर त्याला लगेच बाजुला काढतात. हीच या धंदयाची थेअरी आहे. परंतु बक्षीस ही खुप मोठी नशा आहे. त्याच नशेला बळी ठरत आहेत.

जुगारात हरला, पंटरने हाताचा कोपरा मारून हुसकावुन लावले-
दरम्यान दीड ते दोन तास पाहत असलेल्या, काय-द्याच्या चित्रपटाने वेगळाच रंग बदलला. एक ग्राहक इसम जुगारात हरला. परंतु त्याच्याकडे तेवढेच पैसे होते की, काय, तो रडू लागला, ओरडू लागला. परंतु तेथे असलेल्या पंटरने, त्या ग्राहक इसमाला हाताचा कोपरा रप्पक्कन मारून, त्याला गलिच्छ शिवीगाळ करून हुसकावून लावले. त्याच्या गळ्यात असलेला गमजा, मफलरला हिसका मारून दोन फुट लांब ढकलले. तो गयावया करीत होता. पोलीस अंमलदारही धंदेवाल्याच्या शेजारीच बसला होता. जवळ थांबुन ते सर्व पाहत होते. मला मात्र असह्य झाले. मी रात्रौ 10.30 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला कळवुन, याबाबत हकीकत कळविली. तसेच यावेळी मार्शल येतील अशी अपेक्षा होती. परंतु 11.30 झाले तरी पोलीस आले नाहीत. पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस नियंत्रण कक्षात असणाऱ्यांच्या भावना देखील किती बोथट झाल्या आहेत, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. भावना राहू दया मात्र कायदयाचे काय, त्याची तरी अंमलबजावणी करणार आहात की नाही… हा देखील प्रश्न उभा राहत आहे.

गुन्हे पथक ही वसुली पथक-
स्थानिक पोलीसांच्या आशिर्वादाशिवाय हद्दीत कोणताही धंदा करणे शक्य नाही. चायनिजची गाडी तर सोडा परंतु साधी वडा-पावाची गाडी देखील लावु शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे. त्यातच जुगार अड्डे तर पोलीसांशिवाय सुरूच होवू शकत नाहीत हे आता पुन्हा सिद्ध झाले आहे. काळा बाजार आणि जुगाराच्या अड्डयांना पोलीसांचे आशिर्वाद असतात असा आता नागरीकांमध्ये समज पसरला आहे. दरम्यान पुणे शहरात कधी नव्हे इतके जुगार अड्डे वाढले आहेत. त्यात सामाजिक सुरक्षा विभागासह इतर गुन्हे शाखा देखील कारवाईसाठी बाहेर येत नाहीत. मध्येच एखादी कारवाईची बातमी आली तर त्यातही त्याने हप्ता थकविल्याने किंवा वाढवुन न दिल्याने कारवाई झाल्याचे कानावर येते. त्यामुळे दोन/तीन डझन गुन्हे पथक आहेत की, वसुली पथक याचा निश्चित बोध होणे आवश्यक ठरत आहे.

आज पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली मोक्का आणि एमपीडीए व तडीपारीचे सत्र सुरू आहे. बहुतांश 15 ते 25 वयोगटातील तरूण आहेत. ह्याच्यावर मोक्का, त्याच्यावर मोक्का, ह्याच्यावर एमपीडीए, त्याच्यावर एमपीडीए, हा तडीपार, तो तडीपार एवढच दिसून येत आहे. तरी देखील पुण्यात पहिल्यापेक्षा अधिक गुन्हेगारी वाढली असल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने केलेला कायदा पहिल्यापेक्षा अधिक बोथट होतो की काय अशीही शक्यता वाटत आहे. 45 वी मोक्काची कारवाई होतांना मीच त्याबाबत भाष्य केले होते. आता वर्षाच्या आत मोक्का शंभरी गाठणार म्हटले होते. डिसेंबर पूर्ण होण्याच्या आतच 94 वी मोक्काची कारवाई झाली आहे. 
गुन्हेगारांना कडक शासन झाले पाहिजे. पोलीस आणि कायदयाचा धाक नागरीकांसह गुन्हेगारांच्या  मनांत असणे आवश्यक आहे. त्यात कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. परंतु मोक्काचे आरोपी जामीनावर सुटण्याचे प्रमाण देखील अधिक वाढत आहे. ही एक चिंतेची बाब आहे.