Tuesday, October 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

तळेगाव दाभाडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा उद्या वर्धापन दिन, बाबासाहेबांनी 1947 साली 41 एकर जमीन विद्यापीठ स्थापन करण्यासाठी खरेदी केली होती

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1947 साली वडगाव मावळ व कातवी या ठिकाणी एक मोठे शैक्षणिक संकुल, विद्यापीठ स्थापन करण्यासाठी 41 एकर जागा बंगल्यासह खरेदी केली होती. परंतु भारतीय राज्यघटनेची महत्वाची जबाबदारी बाबासाहेबांवर येवून ठेपल्याने त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. परंतु 26 एप्रिल 2012 रोजी तळेगाव दाभाडे येथील रंजनाताई भोसले, माजी नगराध्यक्षा व ज्येष्ठ विधिज्ञ, मुंबई उच्च न्यायालय यांनी अथक प्रयत्न करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तळेगाव दाभाडे येथील बंगला शोधुन काढला आणि तो सर्वांसाठी खुला केला. आज त्या घटनेला 12 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याचा 13 वा वर्धापन दिन उद्या तळेगाव दाभाडे, ता. मावळ जि. पुणे येथे संपन्न होत असल्याची माहिती ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. सुरेंद्र जानराव यांनी नॅशनल फोरमला दिली आहे.

याबाबत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव दाभाडे यांच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत नमूद केले आहे की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव दाभाडे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाचा वर्धापन दिन शुक्रवार दि. 26 एप्रिल 2024 रोजी साजरा करीत आहोत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या आठ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर हे स्मारक सर्वांसाठी 26 एप्रिल 2012 रोजी खुले झाले आहे. 

हा ऐतिहासिक दिवस स्मारक समिती दरवर्षी वर्धापन दिन म्हणून उत्साहात साजरा करत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वडगाव मावळ व कातवी या ठिकाणी जागतिक दर्जाचे शैक्षणिक संकुल अर्थात विद्यापीठ स्थापन करण्याच्या उद्देशाने 41 एकर जागा बंगल्यासह सन 1947 साली खरेदी केली होती. परंतु भारतीय संविधान लिहण्याचे प्रचंड कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येऊन ठेपल्याने त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वास जावू शकले नाही. 

दरम्यान विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सनदशीर मार्गाने केलेल्या प्रयत्नातून हे स्मारक सर्वांसाठी खुले झाले आहे. बाबासाहेबांचे स्वप्न काही अंशी का होईना पूर्ण करण्याचा प्रयत्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती करीत आहे. आपण भीम अनुयायांचे सहकार्य अपेक्षित आहे. आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहून वर्धापन दिनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी योगदान दयावेत असे आवाहन करण्यात आले आहे. 
यात शुक्रवार दि. 26 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुत्तपठन, 7 वाजता अभिवादन सभा व रात्री 9 वाजता भिम गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.