
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात मागील 12 ते 15 वर्षात 20 हजार कोटींचा गार्बेज स्कॅम घडला व आजही घडत आहे. कचरा म्हंटल की, सगळेच नाक मुरडतात त्यामुळे कचराच असल्यामुळे सहज कुणाचेही लक्ष जात नाही. त्याच कचऱ्याने आता पेट घेतला असून, हा वणवा 20 हजार कोटीपर्यंत गेला आहे. तेलगी स्कॅम हा 30 हजार कोटींचा, तो देखील पुण्यात उघडकीस आला, तसाच पुण्यातही गार्बेज स्कॅम घडला आहे. बारामतीतील नेतृत्वाच्या छत्रछायेखाली असलेल्या नेत्यांनी कचऱ्याचे महत्व ओळखले आणि पटापट सगळे प्रकल्प गिळंकृत केले. (ज्यांनी धरणातील आणि कॅनॉलमधील गाळही सोडला नाही, ते कचरा तरी कसे सोडतील..) कचरा वाहतुकीत पुणे मनपाची वाहने कमी परंतु खाजगी कंत्राटदारांचीच जास्त वाहने अभिलेखावर आढळुन येतील. त्यांच्या कचऱ्याच्या फेऱ्याही पुणे मनपापेक्षा तीनपट अधिक असल्याचे अभिलेख्यावरून दिसून येते. गार्डन कटींग मध्ये तर एकाच वाहनाचे दोन ते तीन वेळा वजन केले जाते. सीसीटीव्ही निव्वळ नावाला आहेत, मोकादम आणि आरोग्य निरीक्षकांना दरमहिन्याला पॅकेट, वर्षातून एकदा पॅकेज मिळत असल्यामुळे सीसीटीव्हीला कुणी कुत्रही विचारत नाही. कचरा प्रकल्पांवर क्षमतेएवढ्या कचऱ्याचे वजन होते, तरी देखील बहुतांश कचरा उरूळी-फुरसुंगी येथे जात आहे हे कसे काय… मुळात घनकचरा विभागात प्रत्येक प्रकरणांची एवढी गुंतागुंत आहे की, घनकचरा या विभागाचे कामकाज सहजा सहजी कुणाच्याही लक्षात येत नाही. नव्या उपआयुक्तांनाही लवकर समजत नाही. मात्र कचरा प्रकल्पाचे मास्टर मांईंड तळमजल्यावर आयुक्त आणि उपआयुक्तांच्या त्रेधातिरपिटाची मजा पाहत व ऐकत बसलेले असतात. मुळात झाडणकाम, कचरा वाहतुक, कचरा संकलन, बीडब्ल्युजी, कचरा प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, बायोमायनिंग इत्यादी… इत्यादी… आणि त्यातही मोकादम, आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि त्यांचे हद्दीतील मायाजालाचे साम्राज्य वेगळेच आहे. घनकचरा विभागातील गुंतागुंतीचा मास्टर मांईंडने चांगलेच हात धुवून घेतले आहेत. एवढेच कशाला कचरा- कचरा म्हणून पुणेकारांच्या खिशावरही दरमहिन्याला दरोडा टाकला जात आहे. पुणे महापालिकेच्या तिजोरीवर हात साफ करतात ते वेगळेच… एवढा मोठा स्कॅम झालेला असतांना, पुणे महापालिकेने घनकचरा विभागाचे आजपर्यंत ऑडीट केले नाही हे विशेष आहे. 15 क्षेत्रिय कार्यालये, मुख्य कार्यालयासह प्रत्येक प्रकरणांच्या शेकडो फाईल्स आजमितीस आमच्याकडे उपलब्ध आहेत. गार्बेज स्कॅमचे प्रकरण कोणत्या विषयापासून सुरू करायचे, याच्या विचारात असतांनाच, घनकचरा विभागाचे उपआयुक्त संतोत वारूळे यांनी, जनगणना व स्वच्छ सर्व्हेक्षण काळात 4 डिएसआय व 6 एसआयच्या बदल्या केल्यामुळे, माझी वाट वारूळे यांनीच मोकळी करून दिली आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गापासून आज तोच स्कॅम पुणेकरांपुढे उघड करीत आहोत.
डिएसआय माने आणि नाईक यांची 2 वर्षात 3 वेळा बदली…
पुणे शहरात स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान व राष्ट्रीय जनगणनेचे काम सुरू असतांना, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. प्रजित नायर यांनी शुक्रवार दि. 5 जुन 2026 रोजी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात एकुण 4 वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यात 1. धनकवडी आंबेगाव क्षेत्रिय कार्यालयाचे श्री. श्रीपाद नाईक, 2. वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे श्री. संदिप चव्हाण 3. घनकचरा व्यवस्थापन कार्यालयातील सुनिल तंवर व 4. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे श्री. मंगलदास माने यांच्या बदल्या केल्या आहेत. पैकी सुनिल तंवर हे 8 महिन्यांपूर्वी ढोलेपाटील रोड क्षेत्रिय कार्यालयात होते. ते पुन्हा ढोले पाटील कार्यालयातच गेले आहेत. श्रीपाद नाईक व मंगलदास माने रोटी-बेटी व्यवहार सांभाळत नसल्यामुळे ते अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर आले होते. त्यामुळे त्यांच्या दोन वर्षात 3 वेळा बदल्या केल्या आहेत. घनकचरा विभागात मासिक पाकीट व पॅकेज न देणाऱ्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जाते. नाईक व माने यांना बदली (शिक्षाबंदी) आदेशानुसार येरवडा व हडपसर येथील खुल्या कारागृहात बंदिस्त करण्यात आले आहे. चव्हाण हे पायमोकळे करण्यासाठी सिंहगड मध्ये गेले आहेत तर तंवर हे पुन्हा स्वगृही परतले आहेत. पुढील चार/ पाच वर्षे त्यांना आता बदलीचा धोका नाही.
सुपणार यांची 15 वर्षात एकदाही बदली नाही –
माहे सन 2011 रोजी आशिष माणिक सुपणार पुणे महापालिकेत आरोग्य निरीक्षक म्हणून रुजु झाले. विश्रामबागवाडा व प्रत्यक्ष कामास तत्कालिन टिळक रोड क्षेत्रिय कार्यालयात रुजु झाले. त्यावेळी सिंहगड रोड येथील आरोग्य कोठीवर आरोग्य निरीक्षक म्हणून काम पाहत होते. पुढे 2018 मध्ये पुणे महापालिकेत गावे समाविष्ठ झाल्यामुळे, टिळक रोड क्षेत्रिय कार्यालयाचे नामांतर झाले. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयत शुक्रवार पेठेतून वडगाव धायरी येथे आणण्यात आले. 2019 रोजी प्रभारी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2011 ते 2023 तब्बल 12 वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत होते.
त्यानंतर त्यांच्या विरूद्ध अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आल्यामुळे त्यांची बदली 5/10/2023 रोजी धनकवडी क्षेत्रिय कार्यालयात करण्यात आली. तथापी सुपणार हे धनकवडी येथे रुजु झाले नाहीत. तब्बल दोन महिन्यांची रजा टाकुन ते बदली रद्द करण्याच्या मागे धावत सुटले होते. त्यानंतर 2/12/2023 रोजी धनकवडी क्षेत्रिय कार्यालयात रुजु झाले आणि दि. 18/12/2023 रोजी (अति. महा. आयुक्त इ यांचे आज्ञापत्र जावक क्र. 5811 ) नुसार पुन्हा सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय येथे रुजु झाले.
माहे 2011 ते 2026 या 15 वर्षांच्या कालावधीत एक/दोन बदल्या आहेत. परंतु बदलीच्या ठिकाणी त्यांनी कधीच काम केले नाही. निव्वळ नावाला बदल्या दाखविण्यात आल्या. सुमारे 15 वर्ष एकाच सिंहगड रोड येथे कार्यरत आहेत.
सुपणार हे उपआयुक्तांचे लाडके आहेत काय-
पुणे महापालिकेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा एका पदावर 3 वर्षांचा पदावधी संपल्यानंतर, समुपदेशनाने बदल्या केल्या जातात. आशिष सुपणार यांची बदलीच केली गेली नाही. बदली केली तरी ते बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत व कामही केले नाही. बदली अधिनियमानुसार श्री. सुपणार यांची मागील 15 वर्षात 5 बदल्या होणे अपेक्षित होते. परंतु त्यांची बदली केली जात नाही. सुपणार हे पुणे महापालिकेचे जावई आहेत की लाडके आहेत, म्हणून त्यांची बदली केली जात नाही… कारण काय आहे… याबाबत सुमारे 8 तक्रार अर्ज आयुक्त कार्यालयाकडे दिल्यानंतर, उपआयुक्त घनकचरा व उपआयुक्त परिमंडळ क्र. 3 यांनी मूग गिळून बसले आहेत. सुपणार यांची बदली करतांना दोन्ही उपआयुक्तांचे हात थरथर कापतात, त्यांचे हात थरथर का कापतात, याचा पुढे प्रकाशित होणाऱ्या प्रकरणांतून उलगडा केला जाणार आहे. दरम्यान सुपणार यांच्या गैरकृत्याची चौकशी होवून, त्यांची सिंहगड रोड येथुन बदली करून, त्यांना धनकवडी, वारजे कर्वेनगर, कोंढवा येवलेवाडी व बिबवेवाडी वगळुन अन्य ठिकाणी बदली करण्याची मागणी केली होती. परंतु सुपणार यांना राज्य शासनाचा कोणताही कायदा लागु नाही. त्यामुळे त्यांची बदलीही होत नाही आणि गैरकृत्यांचीही चौकशी होत नाही.
सुपणारांचा डान्सबार आणि थैलीशाहीच्या ओझ्याखाली दोन्ही उपआयुक्त दबले…
आशिष सुपणार यांची 15 वर्षात बदली नाही, झाडणकामांमध्ये कंत्राटी सेवक भरती, सुमारे 70 पेक्षा अधिक बंद घरे, रुपाली चाकणकर यांचे पत्र, बीडब्ल्युजी प्रकल्पातील खाजगी व्यक्ती व संस्था, कचरा वाहतुक, स्टार्टर अशी अनेक प्रकरणे असून त्यावर तक्रार अर्ज सादर केले आहेत. परंतु मागील दोन वर्षात उपआयुक्त घनकचरा व उपआयुक्त परिमंडळ क्र. 03 यांनी कुठलिही कार्यवाही केली नाही. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्तही तोंडात गुटख्याचा तोबरा भरून बसले आहेत. सुपणार यांच्यावर कारवाई का होत नाही, अर्जांची चौकशी का केली जात नाही, याचा बारकाइने विचार करीत असतांना, तेथे कार्यरत असलेल्या एका आरोग्य निरीक्षकाने सांगितले की, आशिष सुपणार हे मुख्य कार्यालयात कोणतेही कारण नसतांना, अधिकाऱ्यांना मुजरा करण्यासाठी येतात, हांजी हांजी करतात, अधिकाऱ्यांना मिठा-पिठाची विचारणा करतात, पाकीट आणि पॅकेज वेळेवर सादर करतात. सुपणार यांच्या थैलीशाहीपुढे दोन्ही उपआयुक्त आणि सहायक महापालिका आयुक्त दबले आहेत. त्यामुळेच की काय, सर्व अधिकाऱ्यांना सुपणार हे हवेहवेसे वाटतात असेही त्यांनी सांगितले आहे. आता मंगलदास माने आणि श्रीपाद नाईक हे नकोसे का वाटतात त्याचे कारण आपल्यास समजले आहेच.
संबंधित आरोग्य निरीक्षक व त्याच्या जोडीला एक बिगारी कर्मचाऱ्याने संबंधित जागेवर जावून आमच्या प्रतिनिधीला दाखविले की, सिंहगड कॉलेजच्या अलिकडील पहिल्याच गल्लीत श्री. सुपणार यांची जेव्ही मधील इमारत आहे. जागा एकाची, इमारत दुसऱ्याची, विक्री तिसऱ्यांना... पैसे सुपणारांना असे हे सुत्र आहे. सुपणार यांच्या नावावर काहीच नाही, तरी सर्व सुपणार यांचे आहे. 8 व्या / 9 व्या इमारतीच्या गच्चीवर सुपणार यांचा खाजगी डान्सबार आहे. या डान्सबार मध्ये पुणे महापालिकेसह विविध कार्यालयात थकलेल्या अधिकाऱ्यांना जलपाल, सोमरसाचे वाटप केले जाते. बैठका झडतात. दोन व्हिडीओ तसेही माझ्या पाहण्यात आले आहेत. त्यातील एक अधिकारी आता सहायक महापालिका आयुक्त झाले आहेत, सोमरसासोबत त्यांचे नृत्य, भांडणे करतांनाचा व्हीडीओ व दुसऱ्या व्हिडीओत एक दिव्यांगजन अधिकारी दिसत आहे. सैराटच्या गाण्यावर चांगलाच ठेका धरल्याचे दिसत आहे. त्यामुळे असे कोण कोण थकले-भागलेले अधिकारी येत असतील देव जाणो.

उद्योगमंत्री आशिष सुपणार-
मोकादम पात्रता यादीत ज्यांचे नाव आले परंतु पदोन्नती दिली नाही, त्या कायम बिगारी सेवकाने नवले ब्रिज जवळील बैलगाडा येथे आमच्या प्रतिनिधीला घेवून गेले. तेथे सुपणार यांनी एक खाजगी कार्यालय थाटले आहे. तेथून पुढे सर्व प्रकरणांचा लेखा-जोखा व अर्थसंकल्प तयार केला जातो. तेथील एक कर्मचारी आरोग्य निरीक्षकाच्या चांगले संपर्कात असायचे. बंद घरांची वसुली, हॉटेलची वसुली, नवीन कंत्राटी भरतीपूर्व प्रत्येकी दोन/दोन लाखांची वसुली, बीडब्ल्युजीची खाजगी इसमाकडून वसुली हे सर्व याच कार्यालयातून होते.
श्री. सुपणार यांना पुणे मनपा जेवढा पगार/ वेतन देते त्याच्या कित्येक पट दरमहिन्याला सुपणार यांचा बिजनेस सुरू आहे. याबाबतचे अनेक अर्ज घनकचरा विभाग, उपआयुक्त परिमंडळ क्र. 3 सह सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय येथे धुळखात पडून आहेत. दोन्ही उपआयुक्त कायदयातील तरतुदींचे पालन करून सुपणार यांची बदली करीत नाहीत, तेथे तक्रार अर्जांवर कार्यवाही कशी करणार असाही प्रश्न मला मागील दोन वर्षांपासून पडलेला आहे. पुणे मनपाचे प्रत्येक मोकादम, प्रत्येक आरोग्य निरीक्षक व प्रत्येक वरिष्ठ आरोग्य निरीक्षक पुणेकरांसह पुणे महापालिकेच्या तिजोरीवर कसा दरमहा डल्ला मारत आहेत, 20 हजार कोटीचा स्कॅम कसा हे दाखविण्यासाठी आजचा ट्रेलर आहे. तुर्तास इतकेच.
