Friday, April 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेत बदली, पदोन्नती व पदस्थापनेच्या घोडेबाजारात, उपकामगार अधिकारी पदाची लॉटरी कुणा-कुणाला लागणार… सवाल 25 लाखाचा

शिवाजी दौंडकर यांनी गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करून आर्थिक गैरव्यवहार केला – अेसीबी
पुणे/दि/नॅशनल फोरम/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे महापालिकेतील मुख्य कामगार अधिकारी श्री. शिवाजी दौंडकर यांनी शिक्षण मंडळ प्रमुख असतांना गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करून, त्यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याची दाट शक्यता असल्याचा अहवाल ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे यांनी 2018 मध्ये देण्यात आला होता. तथापी पुणे महापालिकेने पुणे शहर पोलीस आणि ॲन्टी करप्शनच्या अहवालावर कारवाई करण्याऐवजी, अपचारी श्री. शिवाजी दौंडकर यांना पुणे महापालिकेतील विविध खात्यांच्या अतिरिक्त पदभारांची खैरात करण्यात आली. मुख्य कामगार अधिकारी या मुळ पदासोबतच, शिक्षण प्रमुख, सुरक्षा सहनियंत्रक, नगरसचिव पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. तथापी श्री. शिवाजी दौंडकर वगळता, पुणे महापालिकेतील इतर कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अशा प्रकारचा अहवाल दिला असता तर आत्तापर्यंत संबंधित कर्मचाऱ्याला बडतर्फ करून, त्यांच्या संपूर्ण कार्यालयातील स्टाफ बदलला असता. थोडक्यात श्री. दौंडकर यांना एक न्याय आणि पुणे महापालिकेतील 20 हजार कर्मचाऱ्यांना दुसरा न्याय या तत्वावर सध्या पुणे महापालिकेतील कामकाज सुरू असल्याचे ॲन्टी करप्शन ब्युरो, सामान्य प्रशासन विभाग यांच्या 2017 ते 2022 रोजीच्या अहवाल आणि पदोन्नती (अतिरिक्त/ प्रभारी) पदभाराच्या कार्यालयीन परिपत्र दस्तऐवजांवरून दिसून येत आहे.

ॲन्टी करप्शनच्या रेकॉर्डमधील शिवाजी दौंडकरांच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या वर्तनाचे बिंग अशा प्रकारे फुटले –
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.रविंद्र बिनवडे यांनी मुख्य कामगार अधिकारी कार्यालयातील उपकामगार अधिकारी वर्ग – 3 या पदावर पदोन्नतीने नियुक्ती देणेकामी कार्यालयीन परिपत्रक जुलै 2022 मध्ये काढण्यात आले. तथापी पुणे महापालिकेचा मुळ आकृतीबंध व सुधारित आकृतीबंधात ज्या शैक्षणिक अर्हता व नेमणूकीच्या तरतुदी नाहीत, त्या तरतुदी पदोन्नती देण्याच्या अटी व शर्तीमध्ये नमुद केल्याने संशय बळावला होता. अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी काढलेल्या कार्यालयीन परिपत्रकाबाबत पुणे महापालितील अनेक कर्मचाऱ्यांनी तीव्र स्वरूपाची नापसंती व्यक्त केली होती. त्यातच टेलिफोन ऑपरेटर या तांत्रिक मूळ पदावरील व सध्या मुख्य कामगार अधिकारी यांच्या कार्यालयात सन 2016 पासून प्रशासकीय सुविधेकरीता कार्यरत असलेले प्रभारी उपकामगार अधिकारी श्री. अमित चव्हाण यांनी उपकामगार अधिकारी पदासाठी 25 लाख रुपयांचे बिंग फोडले आहे.
या शिवाय खातेप्रमुख श्री. शिवाजी दौंडकर यांनी शिक्षण प्रमुख यांनी शिक्षण मंडळात काय केले याच्याशी आमचा संबंध नसल्याचे नमूद केले. त्यामुळे हे प्रकरण नेमके काय आहे, याचा शोध घेत असतांना, पुणे महापालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांनी शिवाजी दौंडकर यांच्याबाबतच्या अनेक अहवालांच्या प्रती नॅशनल फोरम वृत्तपत्राच्या कार्यालयात दिल्या. त्यातील सर्व दस्तऐवज पडताळणी करीत असतांना, प्रभारी उपकामगार अधिकारी श्री. अमित चव्हाण यांनी आमच्या कार्यालयात येवून, मी स्वतः खात्याच्या वतीने आलो आहे, हे सांगण्यामागील हेतू मागाहून स्पष्ट झाला आहे.
तसेच ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे यांनी शिवाजी दौंडकर यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याची दाट शक्यता वाटत असून श्री. शिवाजी दौंडकर यांनी गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन केल्याने त्यांच्याविरूद्ध भारती दंड विधानानुसार कारवाई करणे उचित होईल असे ॲन्टी करप्शन ब्युरो यांच्या 21/3/2018 रोजीच्या जा.क्र. डीसीपी/एसपी/एसीबी/पुणे/392 वरील पोलीस उपआयुक्त/ पोलीस अधीक्षक श्री. संदीप दिवाण यांच्या स्वाक्षरीनिशी असलेल्या अहवालात नमूद आहे. पुणे महापालिकेत एवढा मोठा भ्रष्टाचार व गैरव्यवहार होत असल्याचे महाराष्ट्र शासनाचे पोलीस नमूद करीत असतांना, पुणे महापालिकेत सुरळीत कामकाजासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आलेले भारतीय प्रशासकीय सेवेतील वरीष्ठ आयएएस व आयआरएस या अधिकाऱ्यांनी का डोळेझाक केली ह्याचे कोडे अजून उमगलेले नाही.
दरम्यान प्र. कामगार अधिकारी श्री. अमित चव्हाण यांनी थेट माहिती दिल्यानंतर, श्री. शिवाजी दौंडकर यांचे भ्रष्टाचार व गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर आली. पुणे महापालिका व शिक्षण मंडळातील इतर अधिकारी व कर्मचारी देखील बोलते झाले एवढे मात्र नक्की. श्री. चव्हाण यांनी खात्याची माहिती दिली तर इतर कर्मचाऱ्यांनी चव्हाण यांच्यासहित पदोन्नतीच्या घोडेबाजारात उतरलेल्या सेवकांची माहिती दिली आहे.
दरम्यान श्री. शिवाजी दौंडकर यांनी केलेल्या कामकाजाचा अहवाल पुढील काळात पाहणार असलो तरी, ज्या प्रभारी उपकामार अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा शासकीय देखावा निर्माण केला आहे, त्या प्रभारी उपकामार अधिकाऱ्यांची ओळख महापालिकेतील इतर कर्मचाऱ्यांना होण्यासाठी खालील प्रमाणे त्यांच्या कार्याची ओळख दिली आहे.

श्री. नितीन बाजीराव केंजळे (कामगार कल्याण अधिकारी)
श्री. नितीन केंजळे यांची पुणे महापालिकेत शिपाई पदावर नियुक्ती झाली. शिपाई पदावर कार्यरत असतांना, लिपिक पदावर व पुढे लघुटंकलेखक पदावर नियुक्ती देण्यात आली. लेखी परीक्षत सपशेल नापास झालेल्या केंजळेंना तोडी परिक्षेत भरभरून मार्क्स देण्यात आले.
तत्कालिन सामान्य प्रशासन श्री. के.सी. कारकर यांनी श्री. केंजळे यांना सर्व उमेदवारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आणून ठेवले. दरम्यान श्री. केंजळे यांची पुणे महापालिकेतील शिपाई पदावरील प्रवेश व नियुक्तीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे त्यांचे सहकारी नमूद करीत आहेत. तसेच श्री. केंजळे यांना देण्यात आलेल्या सर्व पदोन्नती तसेच प्रभारी व अतिरिक्त पदभारांची माहिती घेतल्यास, नितीन केंजळेंवर सामान्य प्रशासन विभाग किती मेहेरबान आहे याची प्रचित त्यांच्या सेवापुस्तकावरून दिसून येते.

श्री. अमित अरविंद चव्हाण (प्रभारी उपकामगार अधिकारी )
श्री. अमित चव्हाण माहे 2006 मध्ये पुणे महापालिकेतील तांत्रिक पदावरील टेलिफोन ऑपरेटर या पदावर नियुक्त करण्यात आले. आज रोजी प्रभारी उप कामगार अधिकारी म्हणून कार्यरत असले तरी सेवापुस्तकानुसार त्यांची नियुक्ती ही आरोग्य विभागात आहे. परंतु प्रत्यक्ष काम कामगार कल्याण विभागात कार्यरत आहेत. पुणे महापालिकेचा मूळ आकृतीबंध 2004 म्हणजेच, शासन आदेशानुसार तांत्रिक पदांना अतांत्रिक पदांवर पदोन्नती देता येणार नाही असे शासन आदेशात नमूद असतानाही श्री. चव्हाण यांना प्रभारी पदावर नेमणूक दिलेली आहे.
तसेच श्री. चव्हाण यांच्या पुणे महापालितील सेवा प्रवेश व नियुक्तीमध्ये भ्रष्टाचार झालेला असल्याची शक्यता अधिक असून, टेलिफोन ऑपरेटर ही पदवी चव्हाण यांनी कोहिनूर इन्स्टिट्यूट येथून आणलेली आहे. म्हणजेच ही संस्था शासनमान्य संस्था आहे काय तसेच ही पदवी मान्यताप्राप्त आहे काय की बोगस टेलिफोन ऑपरेटर ची पदवी आणून यांनी पुणे महानगरपालिकेत पदस्थापना मिळवलेली आहे हे पाहणे गरजेचे आहे. दरम्यान श्री. चव्हाण यांची पत्नी देखील पुणे महापालिकेतील भवन रचना विभागात वर्ग तीन पदावर कार्यरत आहेत. कुटूंबातील प्रत्येकाला महापालिकेत नोकरी कशी मिळू शकते हे चव्हाण यांच्या कार्यावरून दिसून येत आहे.

श्री. प्रविण गायकवाड (प्रभारी उप कामगार अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांत्रिकी विभाग)
श्री. प्रविण गायकवाड यांची पुणे महापालिकेतील सेवा प्रवेश व नियुक्ती देखील तांत्रिक पदांवर करण्यात आली आहे. एकाच वेळी दोन /दोन पदे एकाच वेळेस हे भूषवणारे पुणे महानगरपालिकेचे अतिशय निष्ठावान सेवक आहेत. श्री. प्रविण गायकवाड यांच्यावर आम आदमी पक्षाचे डॉ. मोरे यांनी जीआयएस मॅपिंग मधील भ्रष्टाचाराची पोलखोल केलेली आहे. याच बाबतीत यांच्यावर दोनशे कामगार कामावर असताना दोन हजार कामगारांचे बिल मंजुर केले म्हणून सर्वत्र गोंधळ उडालेला आहे.
यामध्ये पुणे महानगरपालिकेची खूप मोठी बदनामी झालेली होती व आहे. श्री. प्रविण गायकवाड यांची कारकीर्द पाहता हे पुणे महानगरपालिकेमध्ये निदेशक म्हणून पदस्थापना मिळविली. परंतु त्यानंतर कनिष्ठ अधिव्याख्याता व त्यानंतर यांनी प्रभारी उप कामगार अधिकारी या पदावर स्वतःची नियुक्ती केली गेली. यानंतर श्री. हेंद्रे, मुख्याध्यापक आयटीआय पुणे महानगरपालिका यांनी गायकवाड यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे, श्री. प्रविण गायकवाड यांनी पुणे महानगरपालिकेत नोकरीस लागताना दिलेले अनुभवाचे दाखले हे खोटे व बोगस असून तसेच ओबीसी चे रोस्टर नाही.त्यामुळेच श्री. हेंद्रे हे पुणे महापालिकेत दिवाणी दावा दाखल केला.
पुणे महापालिका न्यायालयाने इतरत्र शिक्षणानुसार नियुक्ती देण्यात यावी असे आदेशात नमुद केलं आहे. तथापी त्यांना कार्यमुक्त आजपावेतो केले नाही. दरम्यान श्री. गायकवाड यांच्या बरोबर असलेले श्री. सातव यांना सेवेतून कमी केले आहे हे ज्ञात असतांना देखील गायकवाड यांना कायम ठेवले आहे. श्री. प्रविण गायकवाड यांनी कंत्राटी कामगारांच्या अभिप्रायांमध्ये गैरव्यवहार केला असल्याच्या अनेक तक्रारी पुणे महापालिकेत दाखल आहेत.

श्री. बुगप्पा किष्टप्पा कोळी (प्रभारी उप कामगार अधिकारी) सेविकेचा मानसपुत्र –
श्री. बुगप्पा किस्टप्पा कोळी यांची पुणे महापालिकेच्या सेवांमध्ये शिपाई या पदावंर नियुक्ती मिळविली आहे. पुणे महापालिकेतील नियुक्ती ही मुळातच वादातीत असल्याचे अनेक कर्मचाऱ्यांचे मत आहे. श्री. बुगप्पा कोळी हे पुणे महापालिकेत घनकचरा विभागात कार्यरत असलेल्या सेविकेचा मानसपुत्र असल्याचे दाखविण्यात देवुन पुणे महापालिकेतील नोकरी मिळविली आहे. तसेच विधीचे कोणतेही शिक्षण घेतले नसतांना, केवळ कामगार कायदयाची पदवी प्राप्त केली आहे. श्री. बुगप्पा कोळी हे पुणे महापालिकेतील सेवक वर्ग विभागात कार्यरत होते. मानसपुत्राला नोकरी देण्याचा हा पहिलाच प्रकार पुणे महापालिकेत घडला आहे. याबाबतचे काही पुरावे हाती आले असून, श्री. बुगप्पा उर्फ अमर कोळी यांनी केलेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांची मालिकाच सुरू ठेवली आहे.

श्रीमती सुमेधा प्रविण सुपेकर (प्रभारी उपकामगार अधिकारी )
श्रीमती सुमेधा प्रविण सुपेकर ह्या पुणे महापालिकेच्या सेवेमध्ये लिपिक पदावर नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान लिपिक पदाच्या भरतीच्या परीक्षेच्या वेळी त्यांना उत्तर पत्रिका मिळाली होती असा त्यांच्यावर आजही आरोप होत आहेत. दरम्यान श्रीमती सुपेकर ह्या एका क्षेत्रिय कार्यालयात कार्यरत असतांना, महापालिका सहायक आयुक्त श्री. सोमनाथ बनकर यांच्या सेवापुस्तकाचे पान फाडले असा त्यांच्यावर गंभिर आरोप आहे.

श्री. सुरेश काशिनाथ दिघे (प्रभारी उपकामगार अधिकारी)
पुणे महापालिकेत प्रभारी उपकामगार अधिकारी पदावर कार्यरत असलेले श्री. सुरेश काशिनाथ दिघे यांचा इतिहास भुगोल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना ज्ञात आहे. सध्या तुर्तातूर्त प्रभारी उपकामगार अधिकारी या पदावरील पदोन्नतीचा विचार करता, श्री. दिघे यांच्याकडे केवळ कायद्याची पदवी असल्याचे सर्वांना ज्ञात आहे. तथापी श्री. दिघे यांनी कामगार कायद्याची पदवी कधी घेतली हे पाहणे गरजेचे आहे. तसेच यांची नियुक्ती ही प्रभारी उप कामगार अधिकारी म्हणून कशी झाली हेही पाहणे गरजेचे आहे.ते पुढे पाहूयात.

श्री. लोकेश विनोद लोहोट (प्रभारी उपकामगार अधिकारी)
श्री. लोकेश विनोद लोहोट हे पुणे महापालिकेत घनकचरा विभागात कचरा मोटार बिगारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पदोन्नतीन त्यांना लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली. तथापी लिपिक टंकलेखक पदावर पदावर नियुक्ती झाली होती, तरी देखील श्री. लोहोट यांना येरवड्यातील खाबुगिरीचे टेबल सोडण्याची मनःस्थिती नव्हती. दरम्यान पुणे महापालिकेत बोंबाबोंब झाल्यानंतर त्यांनी हे पद रिक्त केले. दरम्यान प्रभारी उपकामगार अधिकारी या पदावर पूर्णवेळ कामकाज करण्याचे आदेश निघाल्यानंतर देखील त्यांना येरवड्याचा नाद सुटत नसल्याचे मत अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

श्रीमती माधवी सोपान ताठे (प्रभारी उप कामगार अधिकारी)
श्रीमती माधवी सोपान ताठे ह्या पुणे महापालिकेत कंत्राटी तत्वावर कार्यरत होत्या. तथापी पुणे महापालिकेतील कोणतीही नोकर भरती, नोकर भरती परिक्षा असे काहीही नसतांना त्यांची पुणे महापालिकेत नियुक्ती झाली तरी कशी हा संशोधनाचा विषय आहे. एका कंत्राटी कामगाराला पुणे महापालिकेच्या सेवेत सामावुन घेण्याचा निर्णय नेमका कुणी घेतला… अशा प्रकारे नियुक्ती देता येते काय… असे प्रश्न महापालिकेतील सेवकांना पडलेले आहेत. दरम्यान कंत्राटी कामगार अशी नोंद असतांना, त्या कामावर कुठे व कधी हजर होत्या हा प्रश्न देखील अनुत्तरीत असल्याचे पालिका कर्मचाऱ्यांचे मत आहे. त्यांनी आता पदोन्नतीसाठी अर्ज केलेला आहे.

श्रीमती चंद्रलेखा प्रकाश गडाळे (प्रभारी उपकामगार अधिकारी)
श्रीमती चंद्रलेखा प्रकाश गडाळे या पुणे महानगरपालिकेमध्ये उपाधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. तसेच श्रीमती गडाळे यांनी कामागार कल्याण विभागात प्रभारी उपकामगार अधिकारी म्हणून नेमकी कोणती कामगिरी केली आहे याची चौकशी होणे आवश्यक आहे. चौकशीमुळे तरी श्रीमती गडाळे यांच्या कार्याचाी माहिती इतर कर्मचाऱ्यांना होईल यात शंकाच नाही.

श्री. आदर्श गुरूपाद गायकवाड (प्रभारी उपकामगार अधिकारी)
श्री. आदर्श गुरूपाद गायकवाड हे पुणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये कार्यरत असून यांना कलाकारीची खूप आवड आहे. अनेक चित्रपटांमध्ये व नाटकांमध्ये यांचा जास्त वावर असल्याचे त्यांचे सहकारी आवर्जून सांगतात. त्यांच्या आवडी-निवडीमुळे श्री. आदर्श गायकवाड हे पुणे महापालिकेच्या सेवेत हजर नसतातच, ते केवळ चित्रपट, संगित, नाटक यामध्ये अधिक कार्यरत असतात. सुरक्षा विभागामध्ये मध्यंतरी भ्रष्टाचाराची काही प्रकरणे बाहेर आली, त्यामध्ये श्री. आदर्श गायकवाड यांचे नाव आहे.कामगार कल्याण, विधी विभाग व सामान्य प्रशासन विभागात ते स्वतःच्या मनमानीपणे काम करीत असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मत आहे.

सध्या प्रभारी उपकामगार अधिकारी यांच्याबाबत मिळालेल्या माहिती व दस्तऐवजानुसार नोंदी घेतलेल्या आहेत. आता मुख्य कामगार अधिकारी व बदली- पदोन्नतीचे मास्टर मांईंड यांचा आढावा पुढील काळात घेऊयात. दरम्यान पुणे महापालिकेतील उपकामगार अधिकारी या पदाची पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. 22 पैकी अनेक अर्ज अपात्र केले असल्याची माहिती आहे. पात्र व अपात्र कसे ठरविले हे आता श्री. दौंडकरांनाच माहित आहे. निवड घोषित होणे अद्याप बाकी आहे त्यामुळे आता या विषयी आत्ताच बोलणे उचित नाही. श्री. दौंडकरांच्या नियुक्ती पासून ते सह महापालिका आयुक्त व त्यांच्याकडील अतिरिक्त पदांवरील कामकाज, ॲन्टी करप्शन कारवाई याबाबतची माहिती पुढील अंकात पाहूयात..
दरम्यान उपकामगार अधिकारी पदाची आवश्यकता काय आहे, माहे 2016 च्या एका अहवालात काय नोंदी आहेत त्याचाही उलगडा होणे आवश्यक आहे.