Saturday, April 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पोलीसांकडून पुण्यात गैरकायदयाचा कारभार… गुन्हेगारीला जात-धर्म नसतो, परंतु पकडलेले सर्व गुन्हेगार हे एस.सी,एस.टी ओबीसीचे कसे

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीसांकडून गुन्हेगारीचे उदात्तिकरण सुरू आहे काय, पुणे शहर पोलीस हे गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय, गुन्हेगारीला जात किंवा धर्म नसतो, परंतु पकडण्यात आलेले, तडीपार केलेले, मोक्का व एमपीडीए सर्वाधिक संख्येने लावलेले आरोपी गुन्हेगार हे दलित, आदिवासींसह ओबीसी समाजाचेच कसे… त्यातल्या त्यात अनु.जातीतील बौद्ध, मातंग व पारधी समाजाची संख्या अधिक कशी होत आहे, असे प्रश्न घेवून 2 ऑक्टोंबर ( म. गांधी जयंतीपासून) अभियान सुरू केले आहे. तसेच इजी अर्थात सहज पैसे मिळणारे अवैध व बेकायदेशिर धंदयाबाबत उघडपणे आवाज उठविल्यानंतर, त्यात स्वारगेट, पर्वती व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गैरकायदयाच्या कृत्यांची बाजू मांडण्यात आली आहे. तथापी मागील 10 दिवसात दोन्ही पोलीस स्टेशन मधील एकाही मटका जुगार अड्डे, रमीचे क्लब, खाजगी सावकारी, देहव्यापार, बिल्डर लॉबीसह गोल्ड माफिया, गुटख्यासह अमली पदार्थ माफियांविरूद्ध कुठेही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. स्थानिक पोलीस स्टेशन कारवाई करीत नाहीत, तर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभागासह दोन डझन क्राईम युनिट यांच्याकडून कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु तसे होतांना दिसत नाही. स्वारगेट पोलीस स्टेशन मधील अर्धा डझन क्लब सह दीड डझन मटका जुगार अड्डे, पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील दोन क्बलसह एक डझन मटका जुगार अड्डे, सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील हातभट्टी, मटका-जुगार अड्ड्यांसह देहव्यापार आजही सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे शहर पोलीस या गैरकायदयाच्या मंडळींना संरक्षण देत आहेत काय असाही प्रश्न पुनः निर्माण झाला आहे.

पुणे शहर पोलीसांचे गुन्हेगारी टोळ्यांबाबची भूमिका –
पुणे शहरातील गुन्हेगार हे बेकायदेशिर मार्गाने स्वतःसाठी आणि अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून, हिंसाचाराची धमकी देऊन, धाकदपटशहा दाखवुन, जुलूम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैध मार्गाने आपले बेकायदेशीर कृत्य चालु ठेवून गुन्हेगारी कृत्य करीत असल्याची भूमिका पुणे शहर पोलीसांनी जाहीर केली आहे. तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केलेले असते. परंतु वास्तवात पोलीस स्टेशन व दोन डझन क्राईम युनिट यांनाच त्याचा विसर पडला आहे असे दिसून येत आहे.

गुन्हेगारीला जात-धर्म नसतो, परंतु पकडलेले सर्व गुन्हेगार हे एस.सी,एस.टी ओबीसीचे कसे –
गुन्हेगारी कृत्यांना कुठल्याही प्रकारची जात व धर्म नसतो. परंतु पुणे शहर पोलीसांनी मागील दोन ते अडीज वर्षात मोक्का व एमपीडीएच्या करण्यात आलेल्या कारवाया, तडीपार कारवाया यामध्ये अनु. जाती, अनु. जमाती अर्थात दलित व आदिवासी समाजातील तरूणांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यातल्या त्यात ओबीसी समुहांवर देखील कारवाई झाली झाली आहे.

परंतु त्यातील महत्वाची बाब म्हणजे अनु. जाती अर्थात दलितांमधील बौद्ध व मातंग समाजातील 15 ते 25 वयोगटातील तरूणांवर अधिक संख्येने गुन्हे दाखल आहेत. ह्या समाजात एवढी गुन्हेगारी का वाढली आहे, यामागचे कारण आम्ही शोधत आहोत. हाताला काम नाही, नोकरी नाही, बेरोजगार आहे म्हणून गुन्हेगारीकडे वळला हे कारण होऊ शकत नाही. मग कोणत्या कारणाने बौद्ध, मातंग व पारधी समाजातील तरूणांमध्ये गुन्हेगारी वाढली हा एक गहन प्रश्न आहे. वरवर हा प्रश्न जातीय व उथळ स्वरूपाचा वाटत असला तरी त्याचे सामाजिक परिणाम भयंकर स्वरूपाचे आहेत. 

दलितांमधील बौद्ध व मातंग समाज रडावर आहे-
दरम्यान दलितांमधील बौद्ध व मातंग समाजातील 15 ते 25 वयोगटातील तरूणांना पुढे करून त्यांच्याकडून गुन्हे करवुन घेतले जात आहेत काय याचाही शोध घेणे महत्वाचे ठरत आहे. कमालिची बेरोजगारी, झोपडपट्टी व चाळीतील लहानशा घरात 7 ते 8 लोक, शिक्षणाचा अभाव, अर्थव्यवस्थेकडे पाहण्याची कोणतीही दृष्टी नाही, उद्योग धंदयाचे कोणतेही कौटूंबिक व सामाजिक वारसा नाही, त्यामुळे इजी मनी किंवा रोजगार मिळविण्याच्या दृष्टीकोनातून ह्या समाजाचा अधिक कल वाढत आहे काय असाही एक मतप्रवाह नॅशनल फोरमच्या सामाजिक संघटनांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आलेला आहे.

 त्यातल्या त्यात राग लवकर येतो, रागराग करतात, हाणामारीला सतत पुढे असतात, त्यामुळे त्यांच्या तीव्र रागाचा वापर अवैध धंदेवाल्यांकडून स्वतःच्या फायदयाकरीता करवुन घेतला जात आहे काय असाही एक सवाल निर्माण होत आहे. कायदा आमच्या बापाने लिहला आहे असे छातीठोकपणे सांगणाऱ्या ह्या जमाती कायदा कितपत वाचतात हाही संशोधनाचा विषय आहे. ते काहीही असले तरी हा एक कटाचा भाग असू शकतो असाही एक मतप्रवाह निर्माण झाला आहे. 

महाराष्ट्र पोलीस नियमन तरतुदी अर्थात मुंबई पोलीस अधिनियम –
एखादया राज्यातील लोकांचे हित, आरोग्य व शांतता हे त्या राज्यातील पोलीस तसेच कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेचे सामर्थ्य तसेच शिस्त यावर अवलंबून असते. शिस्तपालनाची सवय झाल्यास अव्यवस्था व कामचुकारपणा वगैरे दोष नाहीसे होऊन कर्तव्य बजावण्याच्या कामात सुसंगतता निर्माझ होते व संबंधित राज्यातील नागरिकांना व समाजाला संरक्षा मिळते. हाच मुद्दा घेवून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मुंबई पोलीस अधिनियम 1951 तयार करण्यात आला आहे.
हा कायदा राज्यातील विविध पोलीस प्रशिक्षण केंद्र तसेच राज्य पोलीस अकादमी येथे प्रशिक्षणासाठी गेलेले पोलीस कॉन्स्टेबल ते पीएसआय, डीवायएसपी तसेच आयपीएस प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना शिकविला जातो. यात महाराष्ट्र पोलीस दलाचे नियमन, नियंत्रण, रचना, अधिकार व जबाबदाऱ्या याबाबत सर्वंकष तरतुदी असलेला कायदा आहे. यात एकुण 8 प्रकरणे, 4 अनुसूची आणि 168 कलमे आहेत. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता, पुराव्याचा कायदा व सर्व फौजदारी व गैरकायदयाविरूद्ध असलेल्या गुन्ह्यांसाठी सर्वंकष पोलीस मॅन्यूअल तयार करण्यात आले आहे.

कायदयाची सर्व पुस्तके कुठेही उपलब्ध होतात. परंतु पोलीस मॅन्यूअल कुणालाही उपलब्ध होत नसते. पुण्यातील काही कर्तव्यदक्ष व अभ्यासू अधिकाऱ्यांमुळे मला हे वाचण्यास व अभ्यास करण्यास मिळाले आहे. त्यात दिसून आले की कायदा खुप सुंदर आहे, कायदा मोडणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाईच्या तरतुदी आहेत. परंतु पुणे शहर पोलीसांकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही असेच या अभ्यासातून मला दिसून येत आहे. कोठोकाट नियमांवर बोट ठेवा असे माझे म्हणणे नाही, परंतु तरतुदीनुसार अंमलबजावणी देखील तितकीच महत्वाची आहे. एखादया गुन्हेगाराचा शोध जगाच्या कानाकोपऱ्यान नव्हे तर जमिनी लपला असला तरी त्याला हुडकून काढण्याची क्षमता महाराष्ट्र पोलीस व पुणे पोलीसांची आहे. असे असतांना बेकायदेशिर गैरकृत्य करणारे इसम, अवैध धंदे करणारा, धंदयाचा मालक पोलीसांना शोधूनही सापडत नाही असे ऐकल्यास, हसाव की रडाव असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

स्वारगेट, पर्वती व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई का होत नाही –
पुन्हा प्रश्न अनुत्तरी राहतो की, स्वारगेट, पर्वती व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व बेकादेशिर धंदयाची बातमी प्रसारित झाली आहे. याचा अर्थ पोलीसांना कुठून तरी खबर मिळाली आहे एवढे तरी निश्चित आहे. परंतु इथे पोलीस नियंत्रण कक्षाला कळवुन देखील कारवाई होत नाही, तिथे बातमी प्रसारित केल्यानंतर, तर कुठे कारवाई होते हा एक गहन मुद्दा आहे. पोलीस गैरकायदयाच्या मंडळीविरूद्ध विशेतः अवैध धंदयाच्या मालकाविरूद्ध कठोर कारवाई का करीत नाहीत, ते कोण आहेत याचा तपास पोलीसांना लागत नाहीये काय, अशा प्रश्नांची सरबत्ती करीत असतांना, वास्तव समोर येते.

आज पुणे शहरात चहा वडापाची हातगाडी, टपरी तर सोडाच परंतु साधी तरकारी भाजीपाल्याचीही हातगाडी पोलीसांच्या परवानगीशिवाय लावु शकत नाही. तिथे हातभट्टी विक्री, मटका जुगार अड्डे, रमीचे क्लब, मसाज पार्लरच्या नावाने सुरू असलेले देहव्यापाराचे गैरअड्डे, खुलेआम गांजासह अंमली पदार्थांची विक्री करणे शक्यच नाही. त्यामुळे या सर्वांमध्ये पुन्हा पोलीस दिसून येत आहेत. थोडक्यात पुण्यातील पोलीस गैरकायदयाचा कारभार पुण्यात करीत आहेत काय हा प्रश्न पुन्हा अनुत्तरीत राहिला आहे.