Saturday, April 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

श्रीमती आशा राऊत यांच्यावर पुणे महापालिकेची एवढी मेहेरबानी कशासाठी… प्रतिनियुक्तीचा कालावधी संपुष्टात आला तरी परतपाठवणी का नाही…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
राज्य शासनाच्या सेवेतील गट अ मधील अधिकारी श्रीमती आशा राऊत यांची प्रतिनियुक्ती 8 सप्टेंबर 2021 रोजी पुणे महापालिकेत करण्यात आली. तथापी त्यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी संपुष्टात आला तरी त्यांची पाठवणी करण्यात आली नाही. उलट प्रतिनियुक्तीचा कालावधी संपुष्टात आला असतांना देखील त्यांना नवीन पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच त्यांचा पगार देखील पुणे महापालिकेच्या तिजोरीतून देण्यात येत आहे. त्यामुळे श्रीमती आशा राऊत यांची राज्य शासनाकडे परतपाठवणी करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटनांनी पुणे महापालिकेचे आयुक्त व प्रशासक श्री. विक्रम कुमार यांच्यासह शासनाकडे केली आहे.

शासनाचे आदेश काय आहेत-
महाराष्ट्र शासनाने दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी मुख्याधिकारी गट – अ संवर्गातील श्रीमती आशा राऊत, सहायक आयुक्त, गट अ नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांची उपआयुक्त पुणे महानगरपालिका या रिक्त पदावर पुणे महापालिकेकडील पात्र अधिकारी (सरळसेवा) उपलब्ध होईपर्यंत अथवा प्रथमतः 2 वर्ष यापैकी अगोदर जे घडेल तो पर्यंत अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच श्रीमती आशा राऊत यांना दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले होते. दरम्यान महाराष्ट्र नागरी सेवा ( पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढुन टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम 1981 मधील अटी व शर्ती यांच्या अधीन राहून करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात नमूद आहे.

आशा राऊत यांच्यावर मेहेरबानीचा वर्षाव –
पुणे महापालिकेत उपआयुक्त या पदावरील कार्यरत श्रीमती आशा राऊत यांना कायमच उपआयुक्त संवर्गातील क्रिमी पोस्टवर नियुक्ती देण्यात आली आहे. दरम्यान त्यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर देखील त्यांना उपआयुक्त या पदावर कायम ठेवण्यात आले आहे. याबाबत श्री. अनिरूद्ध चव्हाण यांना माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. विक्रम कुमार यांनी श्रीमती आशा राऊत यांचा कालावधी वाढवुन देण्याकरीता शासनाकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती देण्यात आली आहे. मागील चार महिन्यापूर्वी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. तथापी शासनाने त्याबाबत काहीच कळविलेले नाही. त्यामुळे श्रीमती आशा राऊत यांची तत्काळ शासनाच्या सेवेत पाठविणे आवश्यक होते. तसेच श्रीमती आशा राऊत ह्या देखील मुख्याधिकारी गट अ मधील अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी देखील पदाचा व अधिकारांचा विचार करता, कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर, पदमुक्त होणे आवश्यक होते. परंतु तसे काहीच झाले नाही.

श्रीमती आशा राऊत यांच्या कामकाजाबाबत पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांसह नागरीक देखील दुखावले गेले आहेत. अतिशय मनमानीपणे कारभार करीत असल्याने त्यांच्याविरूद्ध रोष वाढत आहे. त्यामुळेच काही सामाजिक संघटनांनी व माहिती अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या विरोधात शासनाकडे पत्रव्यवहार केला असून, त्याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यांच्याकडे वारंवार विचारणा केली जात आहे. 

पदाची प्रतिष्ठा ठेवून श्रीमती आशा राऊत यांनी पुणे महापालिकेतून सेवामूक्त होवून पदभार सोडणेच योग्य होईल असे अनेक संघटनांनी मते व्यक्त केली आहेत.