Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेत बदली,पदोन्नतीचा दर 30 लाख रुपये, पुणे महापालिकेच्या कामकाजाचा दर्जा ग्रामपंचायतीच्याही खाली घसरला…

pmcpune

बदली घोटाळा रोखण्यासाठी काँग्रेस शहर अध्यक्षांचे नगरविकास मंत्र्यांकडे निवेदन

नॅशनल फोरम /पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेत वर्ग 1 मधील अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी 20 लाख रुपये, वर्ग 2 व 3 साठी 10 लाख रुपये तर अपेक्षित विभागात बदली करून घ्यायची असेल तर 10 लाख रुपये असा बाजार पुणे महापालिकेत भरला असून, पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून महापालिकेचा कामकाजाचा दर्जा ग्रामपंचायती पेक्षा खाली घसरलेला असल्याचे निवेदन काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नगरविकासमंत्र्याकडे पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान आधी काम केलेल्या मलईदार विभागात काम करायची तीव्र इच्छा असल्यास वर्ग कोणताही असला तरी बदलाचा भाव 30 लाख रुपये असल्याची चर्चा पुणे पुणे महापालिकेत आहे. भावाबद्दल कोणतीही घासाघिस करू नये. आम्हाला उत्पन्नाचा काही भाग वरिष्ठांना दयावा लागतो असे अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर खाजगीत सांगत असल्याचे देखील अरविंद शिंदे यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.

पुणे महापालिकेतील सेवक वर्ग विभागाकडून अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणांतील भ्रष्टाचाराबाबतचे निवेदन देवून त्यात नमूद केले आहे की, पुणे मनपातील वर्ग 1,2 व 3 मधील कोणत्याही अधिकाऱ्याची त्याच्या अधिपत्याखालील विभागात एकाधिकारशाही, मक्तेदारी तयार होऊ नये यासाठी तीन वर्ष कालवधी पूर्ण झाल्यानंतर अन्य विभागात बदली होण्याबाबत कायदे, शासकीय नियमावली अर्थात महाराष्ट्र बदलीचा अधिनियम 2006 आहे.सद्यःस्थितीत प्रशासक कालावधी मध्ये कायदयाची अंमलबजावणी करण्यास पूर्ण संधी व जबाबदारी महापालिका आयुक्त व प्रशासकांना मिळाल्याने मागील वर्षभरात पुणेकर नागरिकांना सकारात्मक बदल घडण्याची आशा होती. मात्र दुर्देवाने प्रशासक कालावधीत महापालिकेतील सर्वच विभागातील भ्रष्टाचार पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढला असल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण हे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक रोखून ठेवलेली सेवक बदली प्रक्रिया हेच त्याचे मूळ कारण असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. 

दरम्यान दुसरकडे स्वच्छ प्रामाणिक अधिकाऱ्यांना मात्र गुणवत्ता असतांनाही आर्थिक तडजोड न करता आल्याने बिनमहत्वाच्या खात्यात काम करणे भाग पडत आहे. पैसे फेकुन नेमणूक करून घैतल्यामुळे आलेल्या मिजासेतून माझे कोणीही वाकडे करू शकत नाही अशा उद्दाम मानसिकतेच्या अभियंत्यामुळे नागरिकांची कामे रखडली जावून भिक नको पण कुत्रे आवर अशी अवस्था पुणेकरांची झालेली असल्याची शोकांतिका देखील श्री. शिंदे यांनी नमूद केली आहे. तसेच महत्वाच्या पत्रांना खोटी उत्तरे देणे, भ्रष्टाचार संबंधित तक्रारी जाणिवपूर्वक दाबुन ठेवणे, वारंवार निदर्शनास आणून देखील लेखी उत्तरे न देणे असे सेवाहमी कायदयाचे सर्रास उल्लंघन करण्याचे प्रकार चालू आहेत. दुर्देवाने मी स्वतः सुद्धा याचा अनुभव घेतला असल्याचे माजी नगरसेवक व काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे. 

पुणे महापालिकेतील बांधकाम विभाग याचे एक उत्तम उदाहरण ठरावे अशी वस्तुस्थिती आहे. अनेक कनिष्ठ अभियंता, सहायक अभिरूंता, कार्यकारी अभियंता इत्यादी अधिकारी 3 वर्ष पूर्ण होऊन देखील तेथेच कार्यरत असून, काही नामचिन आणि विश्वासू मनसबदार तर खाते प्रमुखांच्या अधिपत्याखालील अनेक विभागात नाममात्र बदली दाखवुन प्रत्यक्ष कामाकाजास त्याच विभागात किंवा काही कमी कालावधीत परत वाजत गाजत घरवापसी कार्यक्रम करून पेढे वाटण्याचे उद्योग सुरू आहेत. मुळात जर खाते प्रमुखच जर नियम, कायदेभंग करून वर्षानुवर्षे एकाच खात्याचे प्रतिनिधीत्व करत असतील तर त्या खात्याकडून लोकाभिमुख प्रशासनाची कशी अपेक्षा करता येईल असा प्रश्नही उपस्थित केला आहे. या सर्व गदारोळात महापालिकेच्या कामकाजाचा दर्जा खालावला असून तो ग्रामपंचायतीच्याही खाली घसरला असल्याचे खेदाने नमूद करावे लागत असल्याचे नमूद आहे. 
महापालिकेचे प्रशासक यांनी गंभिरपणे विचार करून लाच देऊन बदल्या होऊ न देणारे अधिकारी व लाच घेऊन बदल्या रोखणारे अधिकरा यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. तसेच याबाबत येत्या 10 दिवसात महापालिकेतील भ्रष्टाचार व गैरप्रकार  न रोखल्यास पुणे शहर काँग्रेस पक्षातर्फे तीव्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.