Tuesday, October 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार, खडक पोलीसांची धडक कारवाई

khadak police pune

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
रेशनिंगचे सरकारी धान्य, रेशनदुकानदारांकडून काळ्या बाजारातून विकत घेवून त्याची विक्री दौंड तालुक्यात विक्रीसाठी घेवून जाणाऱ्या आरोपींवर खडक पोलीस स्टेशनने धडक कारवाई केली आहे. यात 54 पांढऱ्या पोत्यातील 40 हजार 500 रुपये किंमतीचा तांदळासह तीन लाख रुपयांचा मालवाहतुक टेम्पो जप्त करण्यात आला आहे. ही घटना राजीव गांधी सोसायटी समोर, कासेवाडी भवानी पेठ येथे दुपारी 12.30 वाजता घडली आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की, आरोपी 1. जावेद लालु शेख वय-35, रा. कासेवाडी, 2. अब्बास अब्दुल सरकावस वय 34, रा. अशोकनगर कॉलनी कासेवाडी, व 3. इम्रान अब्दुल शेख वय 30 वर्ष रा. गोल्डन ज्युबली कासेवाडी ह्या तीन आरोपींनी वेगवेगळ्या रेशनिंग दुकानदारांकडून माल काळ्या बाजारात विकत घेवून तो एकत्र केला. तो माल अशोक लेलंड कंपनीच्या मालवाहतुक टेम्पोमध्ये भरून केडगाव ता. दौंड जि. पुणे येथे बाजारात बेकायदेशिररित्या विक्री करीता घेवून जात होते. दरम्यान खडक पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार महेश जाधव यांना ही बाब कळल्यानंतर, त्यांनी लगेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता यादव व वरिष्ठांना कळविली असता, संबंधित आरोपींना मालासह अटक केली आहे. 

खडक पोलीसांनी केलेल्या कारवाईत सुमारे 54 पोती तांदूळ प्रत्येकी 50 किलो प्रमाणे सुमारे 2 हजार  700 किलोचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. तसेच तीन लाख रुपये किंमतीचा अशोक लेलंड कंपनीचा मालवाहतुक टेम्पो एमएच 12 पीक्यु 0582 ताब्यात घेण्यात आला आहे. याबाबत नितीनकुमार नाईक सहा. पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास एच.एमे. काळे सहा. पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन अधिक तपास करीत आहेत.