Tuesday, April 16 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यात आज गुन्हेगारीचा पाढा चढला…फरासखान्यात तुफान राडा, तर समर्थ मध्ये खंडणी,सिंहगड मध्ये खुनी हल्ला, खडकमध्ये पुर्ववैमनस्यातून दण्णादण्णी तर दत्तवाडी महिलेचा विनयभंग…

नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरात शनिवार, रविवार आणि आज सोमवारी देखील गुन्ह्याचा पारा चढलेला होता. फरासखान्यात तुफान राडा, तर समर्थ मध्ये खंडणी,सिंहगड मध्ये खुनी हल्ला, खडकमध्ये पुर्ववैमनस्यातून दण्णादण्णी तर दत्तवाडी मध्ये महिलेच्या विनयभंगाचे प्रकार घडले आहेत. पोलीस आणि कायदयाची भिती कुठच्या कुठे पळून गेली असुन सराईत गुन्हेगारासारखी हाणामारी सुरू होती. पोलीसांनी गुन्हे दाखल केले असले तरी, नागरीकांच्या मनांत पोलीस आणि कायदयाविषयी काही भिती का उरली नाही, यावर विचार मंथन होणे गरजेचे झाले आहे.

ऐऽऽ पुढं बघुन जा अस्सं म्हणाला अन्‌‍ कुंभारवाड्यात तुफानी राडा –
फरासखाना पोलीस स्टेशन पुणे/

फरासखाना पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील व कसबा पेठेतील कुंभारवेस परिसरात एकमेकांचे सख्या शेजाऱ्यात अगदी किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यवासन तुफान हाणामारीत झाले. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात दोघांनी एकमेकांच्या विरोधात फिर्याद दिली, आणि फरासखाना पोलीसांनी दोघांविरूद्धही गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व राड्यात सुमारे 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत,
सागर परदेशी आणि पारस परदेशी हे एकमेकांचे सख्ये शेजारी. सागर आणि त्यांचे मामा परशुराम परदेशी हे पीओपीची पोती गाडीतुन खाली करत होती. त्यावेळी पारस हा रोडच्या मध्ये उभा होता. सागरने त्याला रोडच्या बाजुला उभा रहा असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. शिवीगाळ करून पारस, अक्षय आणि सुरज एकत्र आले. अक्षय परदेशीने हातातील लोखंडी कोयत्याच्या उलटया बाजुने सागर परदेशी यांच्या डोक्यात व खांद्यावर, दंडावर मारहाण केली तसेच सागर यांचे मामास धक्काबुक्की केली.
दरम्यान पारस परदेशीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पारस हा रस्त्यावरून जात असताना सागरने त्याला धक्का दिला.तसेच समोर बघुन जा असे म्हणाला. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. सागर आणि परशुराम परदेशी यांनी पारसला मारहाण केली. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या नातेवाईक महिलेला आरोपींनी ढकलुन देवुन त्यांच्या पायावर लाथा मारून त्यांना फ्रॅक्चर केले.
याबाबत फरासखाना पोलीस स्टेशन येथे सागर हेमंत परदेशी (वय-30, रा. कुंभारवेस, कसबा पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पारस मनोज परदेशी, अक्षय मनोज परदेशी, सुरज संतोष परदेशी यांना अटक केली आहे तर पारस मनोज परदेशी (वय -28, रा. कुंभारवेस, कसबा पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सागर हेमंत परदेशी (30) आणि परशुराम ओंकारसिंग परदेशी (45) यांना अटक केली आहे.

खडकमध्ये पुर्ववैमनस्यातून दण्णादण्णी
खडक पोलीस स्टेशन /पुणे/

खडक पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील घोरपडे पेठ येथील ओम साई ज्वेलर्सचे दुकान. रविवार दुपारी दीड वाजण्याची घटना, पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळुन एकाला बेदम मारहाण करण्यात आली. खडक पोलिस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की,
रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बलराम परदेशी हे घोरपडे पेठेतील ओम साई ज्वेलर्सच्या समोरून दुचाकीवरून त्यांच्या मित्रासह कामानिमित्त जात होते.त्यावेळी अमन परदेशीने जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच्या हातातील लाकडी बॅट बलराम यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. आरोपी करण परदेशी आणि तुषार रजपुत यांनी बलराम यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी बलराम प्रताप परदेशी वय -40 वर्ष, रा. देवकी बार शेजारी, घोरपडे पेठ यांनी फिर्याद दिली आहे. यात अमन दिपक परदेशी, करण दिपक परदेशी, दिनेश परदेशी आणि तुषार रजपूत यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास धारूरकर करीत आहेत.


समर्थ पोलीस स्टेशनच्या रास्ता पेठेत खंडणीची घटना –
समर्थ पोलीस स्टेशन/ पुणे/

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील रास्ता पेठेतील दुकानदाराकडून खंडणी मागितल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईद साजरी करण्यासाठी गोव्याला जायचे आहे. त्यासाठी ते दुकानदारांकडून खंडणी मागत होते.
गुन्ह्याची हकीकत अशी की,
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नावेत अन्सारी वय- 24 रा.नाना पेठ यांचे रास्ता पेठेत उबेद मोबाईल शॉपी हे दुकान आहे. अन्सारी व त्यांचा भाऊ उबेद अन्सारी हे 15 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता दुकानात असतांना, आरोपी दुकानात आले व म्हणाले की, ईद मनाने को गोवा जाने का है, उसके लिए चंदा दो, नही दिया तो तुम्हारा मुँह फोड के, दुकान भी फोड देंगे, असे म्हणून खंडणी मागितली. तथापी फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने, हमजा शेख याने त्याच्याकडील काठीने व अमन खान याने त्यांच्याकडील लोखंडी पान्ह्याने फिर्यादीच्या डोक्यावर व हातावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यांच्या भावाला मारहाण करुन दुकानाचे नुकसान केले.
याप्रकरणी सराईत आरोपी अमन खान व हमजा खान याच्यासह हुजेफा शेख मोहम्मद शेख सर्व रा. रास्ता पेठ यांना अटक केली आहे. अधिक तपास सपोनिरीक्षक लोणारे करीत आहेत.

पर्स शोरूममध्ये आणल्याने 25 वर्षीय महिलेला चोर ठरवुन केला विनयभंग
दत्तवाडी पोलीस स्टेशन/पुणे/

दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील सिंहगड रोडवरील व्हॅन ह्युसेन शोरुम एक 25 वर्षीय महिलेने पर्स बाहेर न ठेवता आत प्रवेश केल्याने, मालक असलेल्या महिला व कामगारांनी त्या महिलेस चोर ठरवुन तीचा विनयभंग केल्याची धक्कादाय घटना घडली आहे.
गुन्ह्याची हकीकत अशी की,
रविवार सांयकाळी सहा साडेसहा वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी व त्यांचे पती कपडे खरेदी करण्यासाठी सिंहगड रोडवरील व्हॅन ह्युसेन शोरुममध्ये गेले होते. फिर्यादी यांनी त्यांच्याकडील पर्स शोरुमच्या पर्स ठेवण्याच्या जागेवर ठेवली नाही. त्या पर्स घेऊन आत आल्या. तेव्हा शोरुमची मालक असलेली महिला फिर्यादी जवळ आली. फिर्यादी यांच्याकडे पाहून ती म्हणाली की, तू तुझी पर्स आतमध्ये का घेऊन आलीस, तूला अक्कल नाही का, तू चोर आहेस, हीची पर्स चेक करा असे म्हणून ग्राहक व मालक महिलेमध्ये शाब्दिक वाद झाले. याच वेळी मालक असलेली महिला अंगावर धावन गेली.तसेच या शो रूम मधील कर्मचाऱ्यांनी फिर्यादीच्या मनांस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून त्यांच्या डाव्या खांदयाला हात लावुन मागे ढकलुन दिले.
या प्रकरणी पोलिसांनी सिंहगड रोडवरील व्हॅन ह्युसेन शोरुमच्या मालक असलेली महिला व एका कर्मचार्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

सिंहगडरोड वरील ग्रीनफिल्ड रेस्टोबारच्या कामगारांवर खुनी हल्ला
सिंहगडरोड पोलीस स्टेशन/ पुणे

सिंहगड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील वडगाव खुर्दच्या अग्निशमन केंद्राच्या जवळच असलेल्या ग्रीनफिल्ड रेस्टोबार व फॅमिली गार्डनच्या कामगारांवर गुंडांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला आहे. यातील तीघांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे 7 ते 8 जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,
सुहास सुभाषचंद्र हेगडे (वय -33वर्षे, रा. एन/6, सेक्करेड हॉटी टाऊन, जगताप चौक, वानवडी, पुणे) हे त्यांचे ग्रीनफिल्ड रेस्टोबार व फॅमिली गार्डन हे हॉटेल शनिवारी मध्यरात्री बंद करीत असतांना, आरोपी सुमित शेजवळ हा हॉटेलच्या बंद गेटवरून उडी मारून आत आला. त्याने हेगडे आणि मॅनेजर यशपाल तसेच वॉचमन माधव यांच्याशी वाद घालुन हेगडे यांनी त्याला प्रवेश दिला नाही म्हणुन सुमित शेजवळला राग आला. हेगडे हे त्यांच्या ओळखीचे रोहन शहा यांच्याशी हॉटेल समोर गप्पा मारत असताना सुमित शेजवळने पाठीमागुन येवुन अचानकपणे तुला आज जिवंत ठेवत नाही असे म्हणुन खुनी हल्ला चढविला. त्याने हेगडे यांच्या डोक्यावर, उजव्या कानाजवळ व पाठीवर धारदार हत्याराने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. इतर आरोपींनी देखील हेगडे यांच्यावर हल्ला चढविला.
हॉटेलमधील वेटर आसीक मंडल याच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात हेगडे आणि हॉटेलमधील वेटर गंभीर जखमी झाले आहेत.या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सुमित शेजवळ, मदनराज गेटयाल, यश शेजवळ यांना ताब्यात घेतले आहे तर त्यांचे इतर 7 ते 8 साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक चंदनशिव करीत आहेत.