Sunday, April 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

“दिवाळीनंतर देशात कत्तल की रात”, बाळासाहेब आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या सर्व 48 जागा लढवणार आहे. पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, वंचितने निवडणुकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केली आहे. तसेच राज्यभरात पक्षाची मोर्चेबांधणी केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर युती केली आहे. अद्याप या दोन्ही पक्षांमध्ये किंवा महाविकास आघाडीतही (ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग आहे) जागा वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात अराजकता वाढेल असं वक्तव्य ॲड. आंबेडकर यांनी केलं आहे.

बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, मी या अगोदरही म्हटलं आहे की इथे दिवाळीनंतर कत्तल की रात होईल. सगळीकडे पूर्णपणे अराजकता माजलेली असेल. या देशात निवडणुकीच्या अगोदर जी परिस्थिती याआधी कधीच झाली नाही, तशी परिस्थिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व भारतीयांना माझा आग्रह आहे की, कितीही स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तरी मतदान होईपर्यंत सर्वांनी शांतता राखा. मी आधीच सर्वांना शांततेचं आवाहन करतोय. राज्यात आरक्षणाची मागणी करणारी आंदोलनं स्फोटक होत आहेत. त्यामुळे ‘कब है दिवाली?' असं म्हणायची वेळ आली आहे.

वंचितचा इंडिया आघाडीत समावेश होणार का?
वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश व्हावा यासाठी बाळासाहेब आंबेडकर प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याबाबत पत्र देऊनही त्यावर अद्याप उत्तर आलेलं नाही. लोकसभा निवडणुका कधीही होण्याची शक्यता असल्याचे गृहीत धरून वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागा लढवणार असल्याची घोषणा वचितचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.