Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सहकारनगर पोलीस स्टेशन, कारभारी बदलला तरी कारभार सुधारण्याचे नावही नाही

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
सर्वाधिक शांत असलेले पोलीस स्टेशन म्हणून सहकारनगर पोलीस स्टेशनची ओळख होती. मोठ्या झोपडपट्टया असल्यातरी गुन्हेगारी किरकोळ स्वरूपाची होती. परंतु काळाच्या ओघात शांत असणारे पोलीस स्टेशन गुन्हेगारी कारवायांनी पुरते बदलुन गेले आहे. चार आत आणि 40 बाहेर अशी ख्याती सध्या सहकारनगर पोलीस स्टेशनची झाली आहे. तळजाई वसाहत, अरण्येश्वर, शंकर महाराज मठ, पद्मावती वसाहत सह सिद्धार्थ नगर दातेस्टॉप सारख्या मोठ्या झोपडपट्टया सहकारनगरकडे आहेत. परंतु लोकसंख्येची अधिक घनता असलेले धनकवडी, आंबेगाव सारख्या गावांसह पूर्वीच्या मिळकतींवर आता मोठी लोकसंख्या वाढली आहे. त्यात लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांसाठी लपण्यासाठी जागा असल्याने देखील हद्दीत गुन्हेगारी वाढली. गुन्हेगारांची आर्थिक ठिकाण देखील सहकारनगर भागात वाढली आहेत, मटका जुगार अड्डे, हातभट्टी ही मोठी ओळख निर्माण झाली आहे.वाहनांची जाळपोळ झाली, कोयते हल्ले झाले… कारभारी बदलला पण कारभार बदलला नाही असेच काहीसे चित्र सध्या सहकारनगर पोलीस स्टेशनचे दिसत आहे.

पानशेत धरणफुटीच्या 1962 नंतर मध्यवर्ती पेठेतील मंडळींनी  स्वारगेटच्या पुढे व पद्मावती परिसरात पुरग्रस्तांचे पुर्नवसन करण्यात आले. तर बहुतांश जणांनी पर्वती रमणा येथे म्हाडाच्या बांधकामानंतर मोठ्या संख्येने स्थलांतर केले. त्यात सहकारनगर क्र.1 व सहकारनगर क्र. 2 निर्माण झाली. सर्व सुशिक्षित व उच्चशिक्षित कुटूंबे असल्यामुळे, लगत मोठ्या आकाराच्या झोडपडपट्टया असल्या तरीही त्यांनी देखील पुरग्रस्त नागरीक व मध्यवर्ती शहरातील नागरीकांचे अनुकरण केले. त्यामुळे झोपडपट्टयांमध्ये शिक्षणाचे प्रचंड प्रमाण वाढले. 2005 पर्यंत सगळे सुरळीत होते. परंतु नव नवीन गावे शहरात समाविष्ठ झाल्यानंतर, लोकसंख्या वाढू लागली. जागोजाग अपार्टमेंट,बंगले व इमारतींची संख्या वाढू लागली. गावातील गावगुंडकी शहरात आली. त्याच बरोबर हातभट्टी, देशी विदेशी दारू, मटका जुगार अड्डयांचे पेव फुटले. धंदेवाईक स्पर्धा सुरू झाली. 

त्यात नवीन येणारी पिढी वाहत गेली. गुन्हेगारी वाढत गेली. लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांनी सहकारनगरमध्ये येवुन गुन्हेगारी वाढविली असे म्हणण्यास जागा आहे. 

पोलीसांची जुगार अड्डयातील भागीदारी –
पुणे शहरात प्रथमच सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीसांच्या भागीदारीतील मटका जुगार अड्डे, रमी,पत्ताचे क्लब सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. त्यातच बालाजीनगर कात्रज रस्त्यावरील बहुतांश स्पा, मसाज पार्लर हे पोलीस आणि पोलीसांच्या नातेवाईकांचे असल्याचे बोलले जाऊ लागले. मध्यंतरी धनकवडी येथील जुगार अड्डयावर कारवाई करतांना, तो जुगार अड्डा पोलीसाचा असल्याची माहिती पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभागाच्या लक्षात आली. त्यामुळे त्या धंदयावर सुमारे तीनवेळा कारवाई करण्यात आली.

सहकारनगर पोलीस स्टेशनने पुढचे पाऊलही टाकले. नवीनच पोलीस खात्यामध्ये भरती झालेल्या पोलीसांवर जुन्या पोलीसांनी ऐकत नाहीत म्हणून गुन्हेगारांकरवी मारहाण केल्याची बाबही समोर आली होती. त्यात एक पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आला होता. थोडक्यात रेकॉर्डब्रेक कामांची सुरवात सहकारनगर पोलीस स्टेशनपासून सुरू झाली असे म्हणणे योग्य ठरेल. दरम्यान यात काही बदल झाला नाही. आजही सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेले बहुतांश मटका जुगार अड्डे, रमी, अंदर बाहर, तीन पत्ती, बारा पत्ती सारखे जुगार, सोरट, ऑनलाईन लॉटरी यामध्ये पोलीस असल्याचे सांगितले जाते. संपूर्ण शहरात अवैध धंदे बंद असले तरी सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध मटका जुगार अड्डे बंद नसतात असा अनेकांना अनुभव आहे. 

पद्मावती पाण्याच्या टाकीपासून मटका अड्ड्याला सुरूवात होते, तिथपासून ते धनकवडी पर्यंत सर्वप्रकारचे मटका जुगार अड्डे, पत्ते क्लब सुरू आहेत. अहिल्यादेवी चौकातील स्पा, मसाज पार्लर देखील दिवस-रात्र सुरू असतात. के.के. मार्केट मध्ये तर जुगार अड्डयांचे पेव फुटलेले आहे. कितीही तक्रारी केल्या तरी कारवाई होत नाही, सामाजिक सुरक्षा किंवा गुन्हे शाखेने कारवाई केली तर केवळ जु.प्र.का चे 12 अ नुसार तोडदेखीलेपणाची कारवाई केली जाते असेच आजवरच्या कारवाईवरून दिसून येत आहे. तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी केलेल्या कारवाईचा अपवाद वगळता सर्वांनी नामधारी कारवाया केल्या आहेत. 

मुंबई पोलीस अधिनियम आणि भाग 3 चे नियम 209 व 210 नुसार चौकशी केल्यास ह्या सर्व बाबी उघड होतील. परंतु आजपर्यंत कुणीच धाडस दाखविले नाही. नवीन येणाऱ्या व आलेल्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी दखलपात्र गुन्ह्याची नोंद आणि तपास स्वतःकडे ठेवून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना तपासावर पाठवुन दैनंदिन अहवाल मागविणे अपेक्षित आहे. तसेच हद्दीतील गुन्हेगारी कोणत्या कारणामुळे वाढली आहे, यासाठी नेमके कोण जबाबदार आहे याबाबत योग्य त्या तपासाच्या बाबींची पडताळणी करणे आवश्यक आहे. परंतु ते काहीच होतांना दिसत नाही. त्यामुळे सहकारनगर पोलीस स्टेशनचे कितीही कारभारी बदलले तरी कारभारात सुधारणा होणे शक्य नाही. प्रथम अवैध धंदयावर कारवाई करून ते बंद पाडणे आवश्यक आहे. परंतु त्यातही कारवाई होत नाही. (क्रमशः)