Friday, April 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

दलितांवरील अत्याचाराबाबत पुणे शहर पोलीसांचे कर्मठ जातीयवादयांसोबत संगनमत, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात दलित- पिडीतांना न्यायासाठी आंदोलन करावे लागत असल्याची दुर्देवी बाब…

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देखील अनु. जाती, जमाती, अर्थात दलित व आदिवासी पिडीतांना पोलीस न्याय देत नाहीत. उलटपक्षी कर्मठ जातीयवादयांबरोबर संगनमत करून, अत्याचाराला उत्तेजना देण्याचे काम केले जात आहे. पुणे शहर पोलीस दलातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दोन जातीय अत्याचाराच्या घटना घडलेल्या असतांना देखील पोलीस त्यांचे कायदेशिर कर्तव्य पार पाडत नाहीत. शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे कर्मठ जातीयवादी श्री. रमेश खामकर याचे विरूद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होवून, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळुन देखील श्री. खामकर यांना सपोआ विश्रामबाग अटक करीत नाहीत. तर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे श्री. राकेश विटकर यांच्या विरूद्ध ॲट्रॉसिटीची फिर्याद दाखल होवूनही गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. थोडक्यात पोलीस त्यांचे कायदेशिर कर्तव्य बजावित नसल्याने, आजही आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयावर न्यायासाठी आंदोलन करावे लागत असल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास, राज्य विधीमंडळाच्या अधिवेश नागपुर येथे आंदोलन करावे लागेल असा इशारा संविधान परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरील आयोजित धरणे आंदोलनात देण्यात आला आहे.


दि. 15 डिसेंबर 2022 रोजी हे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर घेण्यात आले होते. यावेळी आंदोलनातील दोन मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच पिडीत फिर्यादिंच्या वतीने त्यांची भूमिका मांडण्यात आली आहे. दरम्यान पिडीत फिर्यादी श्री. सुनिल चऱ्हाटे गटई कामगार यांना पुणे मनपाच्या बाहेर जुन्या चप्पल बुट दुरूस्ती कामासाठी मज्जाव करून, गटई काम करायचे असेल तर दरमहा दोन हजार रुपयांची मागणी करून, ती न दिल्यामुळे श्री. चऱ्हाटे यांच्या चांभार जातीविषयी गलिच्छ शिवीगाळ करून त्यांचा छळ केल्याप्रकरणी श्री. रमेश विष्णु खामकर या जातीयवादयाविरूद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गु.दा. 101/2022 नुसार करण्यात आलेला आहे. तथापी आज गुन्हा दाखल होवून पाच महिने झाले तरी श्री. खामकर या जातीयवादयाला अटक करण्यात आली नाही. दरम्यान श्री. खामकर यांनी पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिन अर्ज केला होता. तथापी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे.
असे असतांना देखील सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग हे जातीयवादयाला अटक करण्यात टाळाटाळ करीत आहेत. तसेच मा. जिल्हाधिकारी साहेब, मा. पोलीस आयुक्त साहेब यांना यापूर्वी निवेदने देण्यात आलेली होती. तथापी कार्यवाही करण्यात आली नाही.
तसेच पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर 1 नोव्हेंबर 2022 रोजीपासून बेमूदत धरणे आंदोलन सुरू आहे. पुणे महापालिकेत श्री. माधव जगताप, श्री. शिवाजी दौंडकर, श्रीमती निशा चव्हाण यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहाराची चौकशी मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य सरन्यायाधिशांमार्फत करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. तथापी पुणे महापालिकेतील सुरक्षा कर्मचारी श्री. राकेश विटकर यांनी आमचे पुणे महापालिकेबाहेर सुरू असलेल्या आंदोलनावर अचानकपणे हल्ला करून, अतिशय जातीय भावनने आमचे भाषण बंद पाडून संविधानातील असलेल्या तरतुदींना हरताळ फासण्यात आलेला आहे. आमचे मायक्रोफोन लहान स्पीकर बॉक्स, ऑटो रिक्षा साहित्य देखील बेकायदेशिररित्या उचलुन नेले आहे. तसेच जाणिवपूर्वक आमचे आंदोलनाचे ठिकाणी लावण्यात आलेले निळे ध्वज देखील आम्हाला कोणतीही पूर्वसुचना न देता काढुन टाकण्यात आले आहेत. या बाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करून आमचे जाब जबाब घेण्यात आले आहेत.
तथापी गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. याबाबत आम्ही गुरूवार दि. 8/12/2022 रोजी मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 यांचे कार्यालयावर याच विषयावर धरणे आंदोलन करण्यात येणार होते. तथापी दि. 8/12/2022 रोजी मा. महामहिम राज्यपाल महोदय पुणे शहरात येत असल्याने तसेच पोलीसांवर अधिक ताण असल्याचे आमचे संघटनेच्या निदर्शनास स्थानिक पोलीसांनी आणून दिल्यामुळे आम्ही गुरूवार दि. 8/12/2022 रोजीचे आंदोलन स्थगित करून संबंधितांना अटक करण्याची मागणी केली होती तथापी आजपर्यंत मागणी मान्य न झाल्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून आमचेवर होत असलेल्या जातीय अत्याचार प्रकरणी न्याय मिळणे याचना करावी लागत आहे.
तरी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे मागण्या केल्या असून यामध्ये 1. श्री. रमेश खामकर यांचेपासून पिडीत फिर्यादी श्री. सुनिल चऱ्हाटे यांना आजही त्रास होत आहे. तरी श्री. खामकर यांना तातडीने अटक करण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच 2. पुणे महापालिकेतील श्री. माधव जगताप, श्री. शिवाजी दौंडकर यांचे सुचनेवरून श्री. राकेश विटकर यांनी आमचे निळे ध्वज काढुन, आमचा लहान साऊंड बॉक्स, ऑटो रिक्षा बेकायदा घैवून जावून आम्हाला सार्वजनिक ठिकाणी जातीयभावनेने अतिशय तुच्छतेने चेहरे व हातवारे करून अपमान केलेप्रकरणी श्री. राकेश विटकर यांचेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा करण्याचे आदेश करण्यात यावेत अशा मागण्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष श्री. विजय लोणके श्री. अनिरूद्ध शालन चव्हाण, रिपब्लिकन चर्मकार संघटनेचे अध्यक्ष संजु बनसोड, पिडीत फिर्यादी श्री. सुनिल चऱ्हाटे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आघाडीचे श्री.सलिम बागबान, श्री. सलिम घोलप, श्री. राजु लोणके, श्री. प्रियांशु लोणके, श्री. अनमोल गाजी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.