Saturday, September 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

वाई परिसरात गावठी पिस्टल मिरवुन, दहशत माजविणाऱ्या दोन आरोपींना पोलीसांनी केले गजाआड, दीड लाखांच्या देशी बनावटीच्या दोन गावठी पिस्टलसह 5 जीवंत काडतुसे जप्त

नॅशनल फोरम/वाई (सातारा)/ दि/प्रतिनिधी/
हातात पिस्टल घेवून वाईमध्ये मिरविणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या वाई पोलीसांनी आवळल्या आहेत. सुदेश दिपक पाटणे व अक्षय विलास देसाई या दोन आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदरील गावठी पिस्टल ह्या स्वप्निल ऊर्फ सोन्या प्रदीप जगताप याच्याकडुन घेतल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली आहे. दोन्ही आरोपींकडील दोन गावठी पिस्टल व 5 जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 22 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की,
साताऱ्याच्या वाई तालुक्यातील मौजे शेंदुरजणे गावच्या हद्दीतील वाई ते सुरूर रोडवरील कॅनॉलजवळ एक युवक हातात गावठी पिस्टल मिरवुन दहशत माजवित असल्याची खबर वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप सुर्यवंशी यांना समजल्यानंतर, त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक श्री. अमित सुर्वे यांच्या नेतृत्वात एक पथक नेमून दोन पंचासह सदर ठिकाणी रवाना होण्याचा व छापा कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानुसार शेंदूरजणे हद्दीतील कॅनॉलच्या परिसरात दुपारी साडेबारा ते सांयकाळी साडेपाच वाजेपर्यंत सापळा लावल्यानंतर, बरोबर साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुदेश दीपक पाटणे हा कॅनॉलजवळ संशयास्पदरित्या फिरतांना आढळुन आला. दि. 17 सप्टेंबर रोजी अमित सुर्वे व त्यांच्या टीमने अतिशय हुशारीने पाटणे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची अंगझडती घेण्यात आली. त्यात एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल मिळाल्याने जप्त करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे व त्यांच्या टिमने आरोपीला विश्वासात घेवुन पिस्टलबाबत विचारपुस केली असता, त्याने सदर पिस्टल हे स्वप्निल ऊर्फ सोन्या प्रदीप जगताप याचेकडुन घेतल्याचे कबुल केले. त्याचेप्रमाणेच अक्षय विलास देसाई याने देखील स्वप्निल ऊर्फ सोन्या प्रदीप जगताप याचेकडुन एक पिस्टल घेतल्याची माहिती दिली.

आरोपी सुदेश दिपक पाटणे याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय विलास देसाई याचा वाई परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली असता, रात्री उशिरा अक्षय विलास देसाई हा परखंदी रोडच्या चौकात दिसला. पोलीसांना पाहताच अक्षय देसाई याने पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता, त्याला धाडसाने व शिताफीने ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता, अक्षय विलास देसाई याच्याकडुन एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व 5 जिवंत काडतुसे मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहे. 

सदर छापा कारवाईबाबत वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपी नामे सुदेश दिपक पाटणे व आरोपी नामे अक्षय विलास देसाई यांना अटक करण्यात आली असुन त्यांचे सोबत एकुण 1,40,250/- रुपये किंमतीचे देशी बनावटीचे दोन गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत.

दरम्यान दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दि. 22 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे करीत आहेत.

सदरची धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी,  वाई विभाग, सुनील साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली 

वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पो. कॉ हेमंत शिंदे, पोकॉ 1211 सोमनाथ टिके, पो. कॉ विक्रम धोत्रे, पो. कॉ विशाल शिंदे, पोकॉ 1302 नितीन कदम, पोकॉ 105 हणमंत गाडे, महिला पोलीस नाईक 2171 प्रियांका कदम यांच्या पथकाने केली आहे.