Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही- आंबेडकर

नॅशनल फोरम/अकोला/दि/ वृत्त/
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत समूहांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याबाबत व्यापक भूमिका मांडली. भेदाभेद संपवून सर्वांना समतेची वागणूक मिळावी असे अपेक्षित होते. पण आजही प्रस्थापितांच्या डोक्यातील बहिष्काराची भावना संपलेली नाही, असेच दिसते. महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही आणि यावर प्रसार माध्यमे देखील गप्प का आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीने अद्याप एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. महाविकास आघाडीला भाजपप्रमाणे मुस्लिमांना वगळायचे असेल, तर दोघांमध्ये काय फरक आहे? प्रस्थापित राजकीय पक्ष मुस्लिमांना निवडणुकीच्या राजकारणात प्रतिनिधित्व देत नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार घालतात याबाबत प्रसार माध्यमे गप्प का? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडी आणि भाजपला मुस्लिमांची केवळ मते हवी आहेत, पण त्यांनी मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिलेले नाही, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे नकली खोटे मुस्लीम प्रेम- वंचित बहुजन आघाडीचा काँगेसवर हल्लाबोल
मुंबई : काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात सीएए-एनआरसी बाबत कोणताही उल्लेख नाही. युएपीए कायदा ज्याचा वापर निष्पाप मुस्लिमांवर, आदिवासींवर आणि दलितांवर केला जातो, त्याबाबत कोणताही उल्लेख नाही. काँगेसनेच कायदा आणला होता असा आरोप करीत काँग्रेसचे नकली आणि खोटे मुस्लिम प्रेम असल्याचा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसकडून एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही याकडे वंचित बहुजन आघाडीने लक्ष वेधले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकाला उमेदवारी दिली आहे, ज्याचा आरएसएस आणि मुस्लीम विरोधकांसोबत मजबूत नाते आहे आणि यामुळे काँग्रेस बेवफा असल्याचे यात म्हटले आहे.