Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे मनपातील नोकर भरती, पदोन्नतीतील निकष बदल प्रकरणी विक्रम कुमार आणि रविंद्र बिनवडे यांची सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी करा

पुणे महापालिकेतील नोकर भरती आणि पदोन्नती….

आयुक्त विक्रम कुमार आणि अति. आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडून…
पुणे मनपा आकृतीबंधातील बदल, लाखोंची बोली आणि कोट्यवधी रुपयांचे व्यवहार….
नोकर भरती आणि पदोन्नतीचे निकष का बदलत आहेत, जो पैसे देईल त्याची भरती आणि त्यालाच पदोन्नती, जो पैसे देणार नाही, त्याच्या भरती आणि पदोन्नतीमध्ये बदल केले…

पुणे महापालिकेतील नोकर भरती आणि पदोन्नतीतील खाबुगिरी…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेच्या मागील 25 वर्षाच्या कालावधीत आजपर्यंत कधीच मेगा नोकर भरती झाली नाही किंवा 2014 रोजी पुणे महापालिकेचा आकृतीबंध मंजुर झाल्यानंतर देखील त्यात फारसा बदल केला गेला नाही. परंतु पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून, धडाधड नोकर भरती सुरू आहे, पैसे मिळवुन देणाऱ्या अर्थातच महसुली खात्यातील आकृतीबंधामध्ये कमालिच्या दुरूस्त्या केल्या जात आहेत. पदोन्नतीबाबत देखिल धडसोड वृत्ती ठेवली जात आहे. कोणत्या सेवकाला पदोन्नती द्यायची आणि कोणत्या सेवकाला पदोन्नती दयायची नाही, सेवाज्येष्ठता पायदळी तुडवून, शासनाचे नियम निकषांची फाशीवर चढवुन, पुणे महापालिकेत बदली,पदोन्नतीचा बाजार भरला गेला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील नोकर भरती, आकृतीबंधातील बदल, पदोन्नतीतील पदस्थापना प्रकरणी, पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार आणि अति. आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांची सीबीआय आणि ईडी मार्फत संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी पुणे महापालिकेत जोर धरत आहे.

पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून नोकर भरती आणि पदोन्नती मध्ये पैसे घेतल्याशिवाय कामे होत नसल्याची तक्रार वाढत आहे. त्यातच पदोन्नतीसाठी लाखो रुपये मोजुन देखील पदोन्नती दिली जात नसल्याने लाखोंची बोली आणि कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार आणि अति. आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी होत आहे. पुणे महापालिकेच्या संपूर्ण इमारतीमधील कोणत्याही मजल्यावर बदली, पदोन्नती, नोकर भरती या खेरीज दुसरी काहीच चर्चा दिसत नाहीये. दरम्यान पुणे महापालिकेच्या सेवकांनी काही गंभिर बाबी नमुद केल्या आहेत, त्याबाबत पाहुयात-

सर्वच खात्यातील पदोन्नतीची प्र्रक्रिया रखडली –
पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक पदांच्या पदोन्नत्या रखडलेल्या आहेत अथवा त्या जाणीवपूर्वक पदोन्नती दिली जात नाहीये. त्याच्या मुळाशी गेल्यानंतर, पुणे महापालिकेच्या प्रशासकाकडून, सेवकांचा छळ केला जात असल्याचे दिसून येत आहे. सद्या सेवाज्येष्ठता व सर्व निकषांस पात्र ठरलेले व पदोन्नतीसाठी पात्र असलेले अभियंता संवर्गातील 1.कनिष्ठ अभियंता, 2.शाखा अभियंता, 3.उपअभियंता, 4.कार्यकारी अभियंता लेखनिकी संवर्गातरील 1.लिपिक, वरिष्ठ लिपिक, उपाधीक्षक, अधीक्षक, प्रशासन अधिकारी, सहायक महापालिका आयुक्त, उपनगरसचिव, नगरसचिव अशी मोठी साखळी दिसून येत आहे. सेवकांकडे सेवाज्येष्ठता आणि पात्रता असतांना देखील पदोन्नती आणि पदोन्नतीतील पदस्थापना दिली जात नाहीये.पदोन्नती रखडवून ठेवली असल्याची सेवकांची भावना झाली आहे. त्यातच पदोन्नतीसाठी सेवकवर्गात जाणाऱ्या सेवकांना आकडा सांगितला जात आहे, त्या आकड्यांची पुर्तता केली तरी त्यात त्रुटी काढुन वेळकाढुपणा केला जात असल्याचे अनुभव अनेक सेवकांनी नमुद केले आहेत.

तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर सुड कसा उगविला जातो –
प्रत्येक पदोन्नती प्रकरणांमध्ये काही ना काही त्रुटी व उणिवा काढुन जाणिवपूर्वक महापालिका सेवकांची छळवणूक केली जात आहे.याबाबत काही सेवकांकडून तक्रारी दिलेल्या आहेत, तक्रारी दिल्यास त्यांच्या कठोर कारवाई केली जात आहे, त्यांना टार्गेट करून हालहाल केले जात आहे. त्यात मनमानी बदल्यांचे हत्यार उपसले जात आहे. हडपसर येथे राहत असलेल्या सेवकांना थेटच औंध, वारजेमाळवाडी दाखविली जात आहे. कात्रज, धनकवडी,वारजे येथील सेवकांना थेटच हडपसर, नगररोड दाखविला जात आहे. काही प्रकरणांत अनेक कर्मचारी निलंबित केले आहेत, काहींना नाहक ज्ञापन कारणे दाखवा नोटीसा देवून जर्रजर्र केले जात आहे. दरम्यान अशा प्रकारच्या क्रुर बदल्या व निलंबल करून, आवाज उठविणाऱ्या सेवकांचे आवाज दाबले जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सेवकवर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रशासकीय राजवटीत आज रोजी पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षानंतर मेगा भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये आत्ताच एवढ्या जोरात भरती करण्याचे कारण काय तसेच अनेक वर्षांपासून भरती थांबलेली होती, ती नोकर भरती आयबीपीएस याच कंपनीमार्फत भरती करण्यात येत आहे. टीसीएस व इतर कंपन्यांमार्फत भरती प्रक्रिया का करण्यात येत नाहीये, याचे गौडबंगाल सेवकांना समजण्यापलिकडे गेले आहे. 

महाराष्ट्र शासनाने 2014 साली पुणे मनपा सेवा प्रवेश नियमावलीस मंजुरी दिली आहे. दरम्यान काही अपवाद वगळता आकृतीबंधातील बहुतांश बदल हे प्रशासकीय राजवटीत केले गेले आहेत. थोडक्यात मनमानीपणे बदल केले गेले आहेत, त्यात पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, तसेच त्यांच्या कामगार संघटना यांचे मत विचारात घेतले गेले नाही. मनमानीपणे स्वतःचा फायदा समोर ठेवूनच आकृतीबंधामध्ये व त्यातील निकषांमध्ये बदल केले गेले आहेत. त्यात काही ठराविक सेवक नजरेसमोर ठेवून त्यांनाच कशी संधी मिळेल याकडे बारकाईने लक्ष ठेवले आहे. तसेच इतर पात्र उमेदवार अपात्र कसे होतील व परीक्षेच्या प्रक्रियेतून बाहेर कसे पडतील हेच पाहिले गेले आहे.  यामधील एखादे उदाहरण आपण पाहूयात-

पैसे दया बदली आणि पदोन्नती घ्या-
उपकामगार अधिकारी, सहाय्यक विधी अधिकारी, विधी विभागातील वकील पॅनलेची निवड, उपमुख्य व लेखा वित्त अधिकारी, नगरसचिव यांची नेमणूक, उपनगर सचिव यांची नेमणूक तसेच पदोन्नती मधील वर्ग चार ते वर्ग तीन मधील लिपिक इंजिनिअर व इतर पदांमधील ज्या कार्यरत सेवकांमधून पदोन्नती देण्यात येते, सध्याच्या आकृतीबंधामील पदोन्नतीची टक्केवारी आहे कमी केलेली आहे तसेच काही पदांसाठी परीक्षा घेण्याचे ठरविलेले आहे. तसेच काही पदांना मोठ्या रकमा स्वीकारून थेट नियुक्त्या देण्यात आलेल्या असल्याचे सेवकांचे म्हणणे आहे.दरम्यान थेट नियुक्त दिलेल्या सेवकांची सेवाज्येष्ठता, शैक्षणिक पात्रता, अनुभव, तसेच शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी केलेली नसतांनाही नियुक्त्या दिलेल्या आहेत. यातही काही उदाहरणे आहेत.
कामगार विभाग- भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि छळछावणी-
पुणे महानगरपालिकेतील कामगार कल्याण विभागातील दहा हजार कंत्राटी कामगारांसाठी इएसआय, किमान वेतन, ईपीएफ तसेच कामगार कायदयानुसार कामगारांना सुविधा देण्यात येतात की नाही हे पाहण्यासाठी उपकामगार अधीकारी या पदाची नव्याने निर्मिती करण्यात आली. मुळ आकृतीबंधामध्ये 15 जागांची तरतुद करण्यात आली. तसेच सर्व पदे सरळसेवेने भरण्याची तरतुद करण्यात आली. तसेच या पदासाठी एल. एल. बी. किंवा डी. एल. एल. अशी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली होती. त्यानंतर या पदांवर प्रभारी स्वरूपात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यात कोणतीही सेवाज्येष्ठता पाहण्यात आली नाही.
प्रभारी उपकामगार अधिकारी या पदासाठी कामगार कल्याण अधिकारी श्री. नितीन केंजळे व श्री. मुख्य कामगार अधिकारी, प्रभारी सुरक्षा अधिकारी, प्र. नगसचिव या सर्व पदांचा पदभार असलेले व सध्या सेवानिवृत्त असलेले शिवाजी दौंडकर (सेवानिवृत्त) यांनी प्रभारी उपकामगार अधिकारी पदभरतीमध्ये मनमानीपणे भरती केली. त्यात कुठल्याही प्रकारचे नियम पाळण्यात आले नाहीत. तसेच सेवाज्येष्ठता डावलुन 1. अमित अरविंद चव्हा, 2. आदर्श गुरूपाद गायकवाड, 3. प्रविण वसंत गायकवाड 4. माधवी सोपान ताठे 5. लोकेश लोहोट, 6. चंद्रलेखा गडाळे 7. सुरेश दिघे 8. बुगप्पा किस्टप्पा कोळी यांची 2016 मध्ये नियुक्ती केली.

धंदा है पर गंदा है –
पुणे महापालिकेकडील कंत्राटी कामगारांच्या हितासाठी प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली परंतु, त्या नियुक्त्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण करण्यात आल्याची चर्चा होती. कंत्राटी कामगार आणि निविदा कामे यातही मोठा गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्या प्रकरणी पुणे महापालिकेवर 2016 ते 2023 या 8 वर्षांच्या कालावधीत सुमारे 200 पेक्षा जास्त आंदोलने झाली आहेत. दरम्यान कंत्राटी कामांच्या प्रकरणांमध्ये स्वतः श्री. केंजळे व दौंडकर हे सहीमध्ये कुठेही अडकु नये म्हणून प्रभारी उपकामगार अधिकारी यांची नेमणूक करून, वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांची कंत्राटी कामांच्या देयक अदा करण्याच्या प्रकरणांवर सह्या करण्यात आल्या आहेत. तसेच मुख्यलेखापाल यांनी देखील आजपर्यंत त्यावर आक्षेप घेतलेला नाहीये.

वास्तविक पाहता, आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी खेरीज देयके अदा केली जात नाही असा शासन नियम आहे, परंतु मुख्य कामगार अधिकारी व कामगार कल्याण अधिकारी यांच्या सहमतीने असा शेरा शिक्का मारून त्यावर प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांनी धडाधड सह्या केल्या आहेत, ज्या परिणाम आज पुणे महापालिकेतील 10 हजार कंत्राटी कामगार सहन करीत आहेत.

आकृतीबंधातील मनमानी बदल-
दरम्यान 2016 पासून आजपर्यंत प्रभारी उपकामगार अधिकारी सह्या करीत आहेत. यात आयुक्त श्री. विक्रम कुमार व अति. आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी हस्तक्षेप केला नाही, जाब विचारला नाही. असे असतांनाही याच प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांना कामयस्वरूपी या पदांवर बसविण्यासाठी पुणे महापालिकेच्या मुळ आकृतीबंधामध्ये बदल करण्यात आले. मुळ आकृतीबंधामध्ये उपकामगार अधिकारी या पदाचीएकुण 15 पदे आहेत, तसेच सर्व पदे सरळ सेवेने भरण्याचे निकष असतांना देखील, त्यात 50 टक्के पदे पदोन्नतीने व 50 टक्के पदे सरळसेवेने करण्याबाबत आकृतीबंधामध्ये बदल करण्यात आले आहेत.

दरम्यान आकृतीबंधातील शैक्षणिक पात्रता व अनुभव यात बदल करण्यात आले आहेत. सध्या कार्यरत असलेले 1. अमित अरविंद चव्हा, 2. आदर्श गुरूपाद गायकवाड, 3. प्रविण वसंत गायकवाड 4. माधवी सोपान ताठे 5. लोकेश लोहोट, 6. चंद्रलेखा गडाळे 7. सुरेश दिघे 8. बुगप्पा किस्टप्पा कोळी यांची शैक्षणिक पात्रता व अनुभवानुसार आकृतीबंधामध्ये बदल करण्यात आले आहेत.  एलएलबी, डीएलएल तसेच प्रशासकीय कामाचा 5 वर्षांचा अनुभव अशी पात्रता व निकष करण्यात आले. मुळ आकृतीबंधामध्ये अशा तरतुदी नसतांना, त्यात या आठ प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांसाठी ही तरतुद करण्यात आली. 

पदोन्नतीमध्ये परीक्षा आणि मुलाखती हा निकष का लावला –
परंतु अशा पात्रतेचे निकष का लावले गेले, ते कोणत्या नियमाने निकष लावले गेले याबाबत कोणासही काहीही माहिती नाही.परंतु पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार व अति. आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी देखील भरती प्रक्रिया सुरू केली. दरम्यान वरील आठही सेवक पात्र ठरत नसतांना देखील सेवापुस्तकातील नोंदीनुसार अशा प्रकारच्या नोंदी ठेवून, पदोन्नतीतील पदस्थापनेची प्रक्रिया पुढे रेटण्यात आली. यावर अनेक संघटनांनी आंदोलने केली. तसेच पदोन्नतीच्या निकषातील बारकावे प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत उपकामगार अधिकारी पदोन्नतीची प्रक्रिया संथगतिने सुरू आहे.

उपकामगार अधिकारी पदाची मुलाखत घेणारे सदस्य पहा –
यात आता मागील महिन्यात मुलाखतीचे सोंग घेण्यात आले. या मुलाखती घेण्याच्या समितीमध्ये मुख्य लेखापरीक्षक श्री. अंबरीश गालिंदे, मुख्य विधि अधीकारी श्रीमती निशा चव्हाण, श्री. अरुण खिल्लारी, मुख्य कामगार अधिकारी यांची समिती नियुक्त करण्यात आली. परंतु या अगोदर पदोन्नती देताना अशी कुठलीही परीक्षा अथवा मुलाखत घेण्याची प्रथा यापूर्वी पूर्वी महानगरपालिकेमध्ये नव्हती. याच प्रक्रियेमध्ये ही प्रथा सुरू झालेली आहे. तसेच सेवक निवड समिती व सेवक पदोन्नती समिती यांनी निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्र शासनाच्या आदेशामध्ये अशी कुठेही नमूद नाही की, पदोन्नतीने देताना अशी प्रक्रिया पार पाडावी. या प्रक्रियेमध्ये पात्र, अपात्र यांची यादी जाहीर केलेली नाहीये.

दरम्यान आत्ताच आरोग्य विभागामध्ये सेवकांकडून जे सेवक रिटायर झालेले आहेत, त्यांच्याकडून पेन्शन मिळण्यासाठी एका सेवकाने एक लाख रुपयांची मागणी केलेली आहे. त्याच विभागाचे प्रमुख अंबरिष गालिंदे आहेत. कामगार विभागाकडून अरूण खिलारी हे पेन्शनची प्रकरणे पाहतात. तसेच शासनाच्या आदेशाचे व न्यायालयाच्या आदेशांची पालन होते की नाही हे पाहणे विभागाचे काम आहे, त्यामध्ये श्रीमती निशा  चव्हाण, मुख्य विधी अधिकारी पदावर काम करत आहे. यांची समिती उपकामगार अधिकारी या पदाच्या पदोन्नती व मुलाखतीसाठी नियुक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये किती टक्के भ्रष्टाचार व गैरव्यवहार झालेला आहे हे सांगण्याची गरज नाहीये. 
उपकामगार अधिकारी या पदासाठी सरळसेवेने पदभरती करतांना, अनुभवाची अट तीन वर्ष आहे व पुणे महापालिकेतील सेवकांना पदोन्नती देतांना अनुभवाची अट 5 वर्ष करण्यात आली आहे. असा भेदभाव का करण्यात आला. कशाच्या आधारे ह्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. याबाबत पुणे महापालिकेतील सेवकांमध्ये तिव्र भावना आहेत. तसेच 2014 ते 2023 या कालावधीमध्ये या पदांच्या भरतीची गरज का भासली नाही, आत्ताच गरज काय भासत आहे याचीही पुणे महापालिकेत जोरदार चर्चा आहे. 

बदली, पदोन्नतीचा घोडाबाजार –
आज पुणे महापालिकेतील 10 हजार कंत्राटी कामगारांच्या हितासाठी उपकामगार अधिकारी हे पद महत्वाचे आहे. परंतु 2016 ते 2023 या 8 वर्षांच्या कालावधीत प्रभारी 8 उपकामगार अधिकाऱ्यांसह कामगार अधिकारी श्री. नितीन केंजळे व सेवानिवृत्त कर्मचारी श्री. शिवाजी दौंडकर यांच्या गैरकृत्यांमध्ये आजपर्यंत पुणे महापालिकेवर सुमारे 200 पेक्षा अधिक आंदोलने विविध राजकीय पक्ष संघटना, कामगार संघटनांनी केली आहेत. त्यांनी केलेल्या आंदोलनातील मागण्यांवर, तक्रार अर्जांवर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याबाबत करण्यात आलेले सर्व पत्रव्यहारांचे पुढे काय झाले याबाबत आयुक्त कार्यालय, कामगार विभागावर जबाबदारी ढकलत आहे तर कामगार विभाग उपआयुक्त व अति. आयुक्त कार्यालयाकडे बोट दाखवित आहे. थोडक्यात पैसा फेको तमाशा देखो अशीच आजची पुणे महापालिकेची सद्यःस्थिती दिसत आहे. याबाबत पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी नुकतेच याबाबत नगरविकास मंत्रालयाकडे पत्रव्यहार करून पुणे महापालिकेतील बदली, पदोन्नतीच्या घोडाबाजाराबाबत आवाज उठविला होता.

या सर्व भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांना पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार आणि अति. आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे हेच जबाबदार असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी सीबीआय व ईडी मार्फत करण्याची मागणी होत आहे. तसेच विक्रम कुमार यांची पुण्यामध्ये सनदी सेवा 6 वर्ष झाली आहे. तरी देखील त्यांची बदली केली जात नाहीये. त्यामुळे श्री. विक्रम कुमार यांची चौकशी करून त्यांची पुणे महापालिकेतून तातडीने बदली करण्याची मागणी होत आहे.तसेच रविंद्र बिनवडे यांची देखील पुणे विभागात सहा वर्ष सेवा झाली असल्याने त्यांच्याच्या बदलीची मागणी होत आहे. 

दरम्यान विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे या दोन सनदी अधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेतील बदली, पदोन्नती प्रक्रियेत कमालीचे स्वारस्य दाखवुन पुनः नोकर भरतीचा सपाटा सुरू ठेवला आहे. आकृतीबंधामध्ये मनमानी बदल केले आहेत. याबाबत विचारणा केली तर खातेप्रमुखांना विचारा अशी उत्तरे दिली जात आहेत, खातेप्रमुख अति. आयुक्तांकडे बोट दाखवितात, अति. आयुक्त हे आयुक्त व उपआयुक्तांकडे बोट दाखवितात. सगळा पैशांचा बाजार मांडला गेला आहे. मेरिट पेक्षा पैसा झाला मोठा अशी आजच्या पुणे महापालिकेची अवस्था झाली असल्याची भावना पुणे महापालिकेतील बहुतांश अधिकारी कर्मचारी मान्य करीत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांची चौकशीची मागणी होत आहे.