नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीसांकडून गुन्हेगारीचे उदात्तिकरण सुरू आहे काय, पुणे शहर पोलीस हे गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय, गुन्हेगारीला जात किंवा धर्म नसतो, परंतु पकडण्यात आलेले, तडीपार केलेले, मोक्का व एमपीडीए सर्वाधिक संख्येने लावलेले आरोपी गुन्हेगार हे दलित, आदिवासींसह ओबीसी समाजाचेच कसे… त्यातल्या त्यात अनु.जातीतील बौद्ध, मातंग व पारधी समाजाची संख्या अधिक कशी होत आहे, असे प्रश्न घेवून 2 ऑक्टोंबर ( म. गांधी जयंतीपासून) अभियान सुरू केले आहे. तसेच इजी अर्थात सहज पैसे मिळणारे अवैध व बेकायदेशिर धंदयाबाबत बातमी प्रकाशित केल्यानंतर, त्यात स्वारगेट व पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील गैरकायदयाच्या कृत्यांचा पंचनामा प्रसारित करण्यात आला. तथापी मागील 10 दिवसात दोन्ही पोलीस स्टेशन मधील एकही मटका जुगार अड्डा, रमीचे क्लब, खाजगी सावकारी, देहव्यापार, बिल्डर लॉबीसह गोल्ड माफिया, गुटख्यासह अंमली पदार्थ माफियांविरूद्ध कुठेही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. स्थानिक पोलीस स्टेशन कारवाई करीत नाहीत, तर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभागासह दोन डझन क्राईम युनिट यांच्याकडून कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु तसे होतांना दिसत नाही. स्वारगेट पोलीस स्टेशन मधील अर्धा डझन क्लब सह दीड डझन मटका जुगार अड्डे, पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील दोन क्बलसह एक डझन मटका जुगार अड्डे, आजही सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे शहर पोलीस या गैरकायदयाच्या मंडळींना संरक्षण देत आहेत काय असाही प्रश्न पुनः निर्माण झाला आहे.
स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत अंडरवर्ल्डच्या नावाने रमीचे क्लब स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुरू आहेत. त्यातच दुसऱ्या इसमाचे एकुण 15 मटका जुगार अड्डे व 2 क्लब बेकादेशिररित्या सुरू आहेत. याबाबत पोलीस नियंत्रण कक्षासह पोलीस आयुक्त कार्यालयाकडे कळविण्यात आल्यानंतर देखील आजपर्यंत कारवाई झाली नाही.
पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार अड्डे, हातभट्टीची निर्मिती व विक्री बाबत बातमी प्रसारीत केली आहे. तत्पूर्वी दांडेकर पुलावरील सामाजिक कार्यकर्त्यांनी मागील दोन दिवसात पोलीस नियंत्रण कक्षाकडे तक्रार करूनही कारवाई झाली नाही. तसेच पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील गांजाची तस्करी हा गंभिर विषय असतांना देखील, आजमितीस कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही.
स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल झावरे व पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयराम पायगुडे यांना वेळ मिळाला नाही असे एक वेळेस गृहित धरले तर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभाग, इतर क्राईम ब्रँच यांनी तरी कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु पोलीस स्टेशनसह, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील एकाही क्राईम ब्रँचने कारवाई केली नाही.
आता देखील स्वारगेट येथील 15 मटका जुगार अड्डे नेहमीप्रमाणे सुरू आहेत. तसेच दांडेकर पुल, मांगिरबाबा चौक, पर्वती दर्शन पोलीस चौकी व पर्वती पोलीस स्टेशनच्या लगतच मटक्याचे एकुण 7 धंदे सुरू असल्याचे दिसून आले आहे. तारवे कॉलनीसह सहकारनगर दोन मधील जुगाराचे क्लब देखील सुरू असल्याचे बातमी अंतिम होत असताना समोर आले आहे.
त्यामुळे या सर्व धंदयांना पोलीस आयुक्तालयातून बळ मिळत आहे असेच दिसून येत आहे. पोलीस नियंत्रण कक्षाकडे तक्रार दिली तरी कारवाई होत नाही, वेळेवर पोलीसही येत नाहीत याचा अर्थ पोलीस आयुक्त कार्यालयातूनच ह्या बेकायदेशिर गैरकृत्यांना पाठींबा असल्याने कारवाई होत नाही असे दिसून येत आहे. परंतु काहीही असले तरी आज नाहीतर उदया पुणे शहरातील गुन्हेगारी कृत्यांना पायबंद घालण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल एवढे मात्र निश्चित. दरम्यान कायदयाने प्रतिबंधित असलेले अवैध धंदे, खाजगी सावकारी, देहव्यापारासह शासनाने बंदी घातलेला गुटखा, अंमली पदार्थांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु पोलीस कारवाई करीत नाही हेच समोर येत आहे.