Thursday, May 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हतबलता… साहेबांचा क्बल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुगार अड्डयावर कारवाई करतांना होतेय पोलीसांची दमछाक

21 वेळा नियंत्रण कक्षाला दुरध्वनी तरी कारवाई होत नाही, खरे कारण आज समजले
आज 22 व 23 ऑगस्टच्या मटका जुगाराच्या चिठ्ठया सादर करीत आहे…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांनी अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी इतर फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्वासाठी व नागरीकांमध्ये दहशत कायम ठेवण्यासाठी संघटीत गुन्हेगारी कार्यरत आहे, तसेच वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याने त्या गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून प्रसिद्ध केले जात आहे. परंतु गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करीत असतांना, मात्र त्याच गुन्हेगारी टोळ्यांनी खडकी, विश्रांतवाडी नंतर आता शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्वतःचे आर्थिक हिताकरीता अवैध मार्गाने जुगार अड्डे सुरू केले आहेत, त्याबाबत वारंवार पोलीस नियंत्रण कक्षाला कळवुन देखील त्यावर अद्याप पर्यंत कारवाई झाली नाही, यामागे या अवैध धंदयावर मोठ्या साहेबांचा आशिर्वाद असल्याने त्यावर कारवाई करण्यात शिवाजीनगर पोलीसांची हतबलता समोर आली आहे. त्यामागे कोणते वरीष्ठ पोलीस अधिकारी आहेत याबाबत माहिती मिळत नसली तरी मोठ्या साहेबांमुळेच कारवाई करता येत नसल्याचे दिसून येत आहे.

राज्याच्या गृहमंत्र्यांनी कॅसिनोला बंदी आणली-
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1923 च्या कायदयातील तरतुदी नुसार कॅसिनो व सोशल क्बल सारख्या माध्यमातून सुरू असलेले जुगार बंद करण्याचा आदेश 2017 व 2023 च्या पावसाळी अधिवेशनात जाहीर केले आहे. त्याबाबतचे शासन निर्णय 2017 व 2023 रोजी प्रसिद्ध केले आहेत. आता 1960 च्या कायदयानुसार, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या ऐवजी थेट पोलीस आयुक्त कार्यालये व जीएसटीच्या कक्षेत काही मनोरंजनाचे कार्यक्रम अंतर्भाव करण्यात आला आहे. थोडक्यात छुप्या मार्गाने सुरू असलेला जुगार कायदयानेच बंद केला आहे.

आयपीसी-सीआरपीसीनुसार कारवाई नाही-
जुगार प्रतिबंध कायदयासह आयपीसी व सीआरपीसी नुसार जुगार धंदे बेकायदेशिर ठरविण्यात आले आहेत. कायदयाने प्रतिबंधित असल्याने त्यावर कारवाई करण्याचे अधिकार पोलीसांना आहेत. तसेच जुगारा सोबतच हातभट्टीचे उत्पादन, विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. असे असतांना देखील कायदयाला बगल देऊन पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात जुगार अड्डे व हातभट्टीची विक्री वेगाने वाढली आहे. कायदयाने प्रतिबंधीत असतांना देखील जुगार अड्डे गल्लीबोळात सहजपणे उपलब्ध होत आहेत. हातभट्टीची दारू सहजपणे उपलब्ध होत आहे. याचा अर्थ पोलीस कायदयातील तरतुदी नुसार कारवाई करीत नाहीत किंवा कायदयातील तरतुदी नुसार त्यांचे कर्तव्य पार पाडत नाहीत असाच त्याचा अर्थ होत असल्याचे दिसून येत आहे.

मु. पो. भैय्यावाडी (शिवाजीनगर) सकाळी 7 ते रात्रौ 11.30-
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भैय्यावाडी या नाल्यातील अवैध जुगार अड्डयाबाबत 21 वेळा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधुन अवैध बाबींची माहिती कळविली आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून हा जुगार अड्डा सुरू आहे. शिवाजीनगर पोलीस कारवाई का करीत नाहीत, सामाजिक सुरक्षा विभाग, इतर गुन्हे शाखा कारवाई का करीत नाहीत असाही प्रश्न सहजपणे निर्माण होत असतांनाच, भैय्यावाडी येथे दोन महिन्यानंतर आता एक पत्ता जुगार क्लब सुरू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई बाजार, कल्याण बाजार, मिलन बाजार सारखा मटका जुगार खेळण्यासाठी सकाळी 8 ते रात्रौ 11.30 वाजेपर्यंत सुमारे 50 ते 60 इसम कायम असतात. आता तर जुगार क्लब सुरू केला असल्यामुळे प्रत्येक डावासाठी प्रत्येकी 60 ते 80 जुगारी एकत्र असतात. थोडक्यात एकाच वेळी 150 ते 200 इसम जुगार खेळत असतांना, पोलीसांना माहितीच नाही, असे होऊ शकत नाही. दरम्यान पोलीस नियंत्रण कक्षाला कळवुन देखील कारवाई होत नाही. ही हतबलता, कायदयाच्या तरतुदींकडे अक्षम्य दुर्लक्षपणा का होत आहे याबाबत विचार होत असतनांच, हा जुगार अड्डा पोलीस आयुक्तालयातील मोठ्या साहेबांचा आहे. त्यामुळे कारवाई होत नसल्याचे समजते.

कायदयाच्या राज्यासाठीचे प्रयत्न –
सोमवार दि. 21 ऑगस्ट रोजी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर, एक मिनटासाठी देखील जुगार अड्डा बंद झाला नाही. आता देखील सुरू आहे. त्यामुळे काल 22 व आज 23 ऑगस्ट 2023 रोजी सुरू असलेल्या मटका जुगार अड्डयांच्या चिठ्ठया पुणेकरांसमोर सादर करीत आहोत. थोडक्यात तडीपारी भोगुन आलेल्या, जबरी गुन्ह्यात नेहमी सहभाग असलेल्या गुन्हेगारांवर पोलीस मेहेरबान असतील तर जगात या गुन्हेगारांचे कुणीच काही करू शकत नसल्याची हतबलता व्यक्त होत आहे. आजही सकाळी 23/8 रोजीच्या मटका चिठ्ठया प्राप्त झाल्या असून, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय, पोलीस महासंचालक यांचे कार्यालय व तत्संबंधित कार्यालयाच्या सोशल मिडीयासाठी पुराव्या दाखल सादर करीत आहोत. जेंव्हा कायदयातील तरतुदींची अंमलबजावणी करायची असतील तेंव्हा करा. आम्ही आमच्याकडून सादरीकरण करीत आहोत.