Thursday, May 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील मोक्का, एमपीडीए व तडीपारीतील गुन्हेगारांना पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डयांची खिरापत

खडकी पोलीस आणि पाटील इस्टेट झोपडपट्टी म्हणजे मटका, जुगार अड्डे आणि अंमली पदार्थांची बाजारपेठ…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/(वृत्तविश्लेषण)
पुणे शहरात सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्याच्या प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने काल खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील अजमेर शेख वय 22 वर्ष रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी शिवाजीनगर पुणे येथील गुन्हेगारावर 78 वी एमपीडीए कायदयानुसार कारवाई करण्यात आली आहे. अजमेर शेख याच्या विरूद्ध मागील 5 वर्षात एकुण 4 गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच त्याने त्याच्या साथीदारांसह खूनाचा प्रयत्न, घातक हत्याराने दुखापतीसह जबरी चोरी, गंभीर दुखापत, खंडणी, दंगा, बेकायदेशिर हत्यार बाळगणे या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले असल्याने त्याच्यावर एमपीडीए नुसार कारवाई करून त्याची रवानगी नागपुर कारागृहात केल्याचे पुणे शहर पोलीसांकडून 2 जानेवारीच्या प्रसिद्धी पत्राव्दारे कळविले आहे. दरम्यान सराईत गुन्हेगार जामिनावर किंवा कारागृहातून शिक्षा भोगुन बाहेर आल्यानंतर, त्याच सराईत गुन्हेगारांना पुणे शहर पोलीसांकडून मटका, जुगार अड्डे, देशी विदेशी दारूविक्री सारख्या धंदयांची खिरापत वाटत असल्याचे खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील साखळी घटनांवरून दिसून आले आहे.

पुणे शहर पोलीसांकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकातच नमूद केले आहे की, संबंधित सराईत गुन्हेगाराच्या कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीने नागरीक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते असेही नमूद आहे. दरम्यान अशा घातक व सराईत गुन्हेगारांवर कारवाई केल्यानंतर, व कादयातील तरतुदीनुसार शिक्षा भोगुन बाहेर आल्यानंतर, किंवा जामिनावर बाहेर आल्यानंतर मात्र त्याच्या मटका, जुगार अड्डयांवर कारवाई केली जात नसल्याचेही दिसून येत आहे. 

खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील पाटील इस्टेट झोपडपट्टी –
जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरील पाटील इस्टेट झोपडपट्टी म्हणजे मटका, जुगार अड्डे, देशी विदेशी दारूची बेकायदा विक्री यासह अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीची मोठी बाजार पेठ निर्माण झाल्याची सर्वत्र चर्चा आहे. रोज रात्री अनेक अलिशान गाड्या पाटील इस्टेट झोपडपट्टी पुलाखाली थांबलेल्या असतात. त्यात अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठीच येत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.

पाटील इस्टेट झोपडपट्टीतील नुराणी – इराणी-
संबधित सराईत गुन्हेगार व त्याच्या 10 ते 15 साथीदारावर मकोका, एमपीडीए नुसार व काही जणांविरूद्ध तडीपारीची कारवाई मागील तीन ते चार वर्षात करण्यात आली होती. त्यातील काही सराईत गुन्हेगार हे शिक्षा भोगुन व काही सराईत गुन्हेगार जामिनावर बाहेर आले आहेत. याच सराईत गुन्हेगारांनी पुनः पाटील इस्टेट मध्ये मटका, जुगाराचे अड्डे सुरू केले आहेत. अवैध व बेकायदेशिर धंदे सुरू करून देखील आज पाच सहा महिने झाले असतील. परंतु पोलीस तक्रार करूनही कारवाई करीत नसल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याचा अर्थ सराईत गुन्हेगारांचे पुनर्वसन पोलीसच करीत आहेत काय अशीही पुणेकर नागरीकांमध्ये चर्चा आहे.

महिलांच्या देखरेखी खाली मटका अड्डा –
मोक्काची कारवाई करू नये, म्हणून हाच इराणी मागील दीड एक वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालगत बेमूदत आंदोलन करीत होता. पोलीसांविरूद्ध अनेक तक्रार अर्ज देखील याच इराण्याने दिले असल्याची माहिती आहे. तथापी त्याचे इतर साथीदार कारागृहातून बाहेर आल्यानंतर, मात्र त्याने लगेच मटका जुगार अड्डे सुरू केले आहेत. तसेच मटका जुगार अड्डे, पणती पाकोळी सोरट या अवैध व बेकादेशिर धंदयावर पाच /सहा महिलांना ठेवण्यात आले आहे. त्यात त्याच्या पत्नीचाही समावेश असल्याचे समजते.

सराईत गुन्हेगारांवर पोलीसांची एवढी मेहेरबानी का-
ज्या इराणी टोळीवर खूनाचा प्रयत्न, घातक हत्याराने दुखापतीसह जबरी चोरी, गंभीर दुखापत, खंडणी, दंगा, बेकायदेशिर हत्यार बाळगणे या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले असल्याने तसेच संबंधित सराईत गुन्हेगाराच्या कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीने नागरीक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते. आज त्याच सराईत गुन्हेगारांनी सुरू केलेल्या मटका जुगार अड्डंयावर खडकी पोलीस स्टेशन किंवा पुणे शहर पोलीसांकडील इतर क्राईम युनिट कारवाई का करीत नाहीत असाही सवाल निर्माण होत आहे. सराईत गुन्हेगारांवर पोलीस मेहेरबान आहेत काय असाही सवाल निर्माण होत आहे.

खडकी पोलीस स्टेशन म्हणजे काळ्या धंदयाचे माहेरघर –
दरम्यान खडकी पोलीस स्टेशन हद्दीत केवळ पाटील इस्टेट हेच उदाहरण नाही तर खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील पाण्याच्या टाकीजवळ नवीन बांधकामाजवळ मळकटलेल्या कपड्यांच्या मांडवात पुराणीकाचा भाचा असो की, खडकी रेल्वे स्टेशन, महाराजा वाईन्स सह हॅरीस ब्रिज जवळील बबल्या असो सर्वत्र सार्वत्रिक गुन्हेगारांनी मटका जुगार अड्डे, रमीचे क्लब, देशी विदेशी दारूची विक्री, अंमली पदार्थांची विक्री तेजित आहे. कुठेही कारवाई होत नाही. कारवाई केली तरी अज्ञात गुन्हेगारांविरूद्ध 12 अ नुसार कारवाई करून, सराईत गुन्हेगारांना पोलीस संरक्षण दिले जात असल्याचेही दिसून येत आहे.