Tuesday, December 17 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सत्ताधारी पक्षाला झुकते माप दिल्याने, शहराचे विद्रुपिकरण वाढले – अतिक्रमण निरीक्षक वसुलीवर मग कारवाई करणार कोण…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/
पुणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाने सत्ताधारी भाजपा-शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला झुकते माप दिले असल्याने पुणे शहरात फ्लेसबाजीला उधाण आले आहे. संपूर्ण शहराचे विद्रुपिकरण होत आहे. परंतु दुसऱ्या बाजुला विरोधी पक्ष किंवा सामाजिक संघटनांचे बॅनर मात्र रात्रोरात काढले जात आहेत, त्यांच्यावर दंडही आकारला जात आहे. यामुळे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त श्री. माधव जगताप हे सत्ताधारी पक्षाला झुकते माप देत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. दरम्यान सत्ताधारी पक्षांकडून दरदिवशी पुणे शहरात फ्लेक्सबाजी वाढत चालली असल्याने पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 पुणे महापालिका हद्दीत फ्लेक्स किंवा होर्डींग उभे करण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून शुल्क भरून घेवून परवानगी दिली जाते, मात्र, महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पुणे शहरातील राजकीय पक्ष, स्थानिक नेते, कार्यकर्ते-पदाधिकारी बिनदिक्कत जाहीरातबाजी करीत आहेत. त्यातच नेत्यांचे पुण्यात दौरे वाढल्यामुळे तर जागोजाग फ्लेक्सबाजीला उधाण आले आहे.  यामुळे पुणे महापालिकेचे आर्थिक नुकसान व शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने सर्वच राजकीय व सामाजिक संघटनांच्या फ्लेबाजीविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे. 

कारवाईचा बडगा परंतु आदेश कुणीच पाळत नाही-
पुणे शहरातील चौका-चौकात अनाधिकृत फ्लेक्स आणि अनधिकृत पथारी व्यवसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर कारवाईमध्ये कुचराई करणाऱ्या अतिक्रमण निरीक्षकावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पहिल्यांदा टप्प्यात एक हजार रुपयाचा दंड, तर दुस-यांदा दोषी आढळल्यास वेतनवाढ रोखण्याचा इशारा अधिका-यांनी दिला आहे. तथापी ह्या आदेशाला अतिक्रमण निरीक्षकांनी ठेंगा दाखविला असून, असा आदेश केवळ कागदवरच असल्याचे दिसून येत आहे.

अतिक्रमण निरीक्षक वसुलीच्या कामावर, मग कारवाई कधी करणार-
सध्या पुणे महापालिकेतील बहुतांश सहायक अतिक्रमण निरीक्षक व अतिक्रमण निरीक्षक अधिकृत व अनाधिकृत पथारी व्यावसायिकांकडे वसुलीला असल्याचे दिसून येत आहे. अधिकृत पथारी व्यावसायिक त्याला नेमूण दिलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक जागेचा वापर करतो. त्याचे दुकानातील साहित्य दुकानाबाहेर ठेवतो. त्यामुळे कारवाई करू नये यासाठी दरमहा हप्ता ठरवुन दिलेला आहे. तसेच अनाधिकृत पथारी व्यावसायिक देखील कारवाई करू नये म्हणून दरमहा हप्ते ठरवुन दिले आहेत. एका एका क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत शेकडोंनी पथारी व्यावसायिक व दुकानदार आहेत. त्यामुळे दर महिन्याच्या एक तारखेपासून ते महिना अखेरपर्यंत वसुलीचे काम सुरू असते. त्यात बहुतांश अतिक्रमण निरीक्षक याच कामावर असतात. त्यामुळे फ्लेक्सवर कारवाई करण्यासाठी यांच्याकडे वेळच राहत नसल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

अतिक्रमण व आकाशचिन्ह विभागाला स्वतंत्रपणे कर्मचारी वर्ग नियुक्त आहे. ठेकेदाराकडील बिगारी हाताशी असतात. असे असतांना देखील कुठेही कारवाई केली जात नाही. अतिक्रमण खाते हे मिळकत कर खात्यासारखे महसुली खाते असल्यानेच अतिक्रमण विभागात काम करण्यासाठी कर्मचारी इच्छुक असतात असेही सांगितले जात आहे.