Wednesday, November 13 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे पोलीसांच्या 206 वर्षाच्या काळात प्रथम, पुण्यातील कुख्यात गुन्हेगारी टोळ्या समोरासमोर,मारणे, बोडके, घायवळ ते आंदेकरसह सुमारे 15 टोळ्या आणि 50 उपटोळ्यांसह 267 गुन्हेगारांची पुणे पोलीस आयुक्तालयात परेड

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे पोलीस दलाची स्थापना ब्रिटीश राजवटीत 1818 रोजी झाली. तर महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 रोजी करण्यात आली. ब्रिटीश राजवटीपासून ते महाराष्ट्र राज्य निर्मितीपर्यंत आणि त्यापासून आज 2024 पर्यंत गुन्हेगारी टोळ्यांची आजपर्यंत कुणीच ओळखपरेड काढली नव्हती. पुण्याचे नव नियुक्त पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी, पुणे पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील सुमारे 15 मुख्य, 50 उपमुख्य टोळ्यांसह सुमारे 267 गुन्हेगारांची ओळख परेड पोलीस आयुक्तालयात काढण्यात आली आहे. पुण्याच्या इतिहासात प्रथमच गुन्हेगारांची अशी ओळख परेड काढण्यात आली आहे. तसेच गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे व्हिडीओ, रिल्स बनवल्यास काय कारवाई केली जाईल याचा अजेंड यावेळी वाचुन दाखविण्यात आला आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच पुण्यातील कुख्यात गुन्हेगारांना हा पहिलाच दणका दिलाय. पुणे पोलीस आयुक्तालयात जवळपास दोनशे ते तीनशे गुन्हेगारांची परेड करत आयुक्तांकडून सर्वांना तंबी देण्यात आली. दरम्यान पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नव नियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार ॲक्शन मोडवर आले आहेत.  कुख्यात गुंड गजा मारणे, बंडू आंदेकर, निलेश घायवळसह पुण्यातल्या इतर गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांची पोलिसांनी ओळख परेड काढली.

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या देखील टोळी युद्धातून झाली आहे. त्यामुळे पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता, नवनियुक्त पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं. समोर समोर सर्व गुन्हेगारांना बोलावून त्यांना चांगलाच दणका दिला आहे. 

कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, कंचीले, टिपू पठाण अशा एकुण प्रमुख 15 गुन्हेगारी टोळ्यांसह नवीन उभरत्या 50 टोळ्यांतील सुमारे 267 सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलीस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलाविले होते. सर्व टोळ्या आज एकमेकांसमोर होत्या. यावेळी डोझिअर अर्थात गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पुणे पोलीसांनी तयार केलेल्या नियमावलीची माहिती देणारा फॉर्म त्यांच्याकडून भरून घेण्यात आला. 

यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त श्री. अमोल झेंडे यांनी सांगितले की, आम्ही प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पावले उचलली होती. त्यांच्या प्लॅनिंगनुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार किंवा आरोपींना कॉल करून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्यात आला आहे. आज रेकॉर्डवरील 267 गुन्हेगारांना बोलाविण्यात आले होते. तसेच गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या रिल्स बनविणाऱ्यांविरोधात सुमारे 24 गुन्हे दाखल केले असल्याची माहिती दिली आहे. 

दरम्यान यावेळी सर्व गुन्हेगारी टोळ्यांना सक्त सुचना दिल्या असून इथुन पुढे कोणताही गुन्हा करायचा नाही, कुठल्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी व्हायचे नाही, तसेच गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे व्हिडीओ, रिल्स करायचे नाहीत, मोबाईलवर स्टेटस ठेवायचे नाहीत. अन्यथा नियमभंग करणाऱ्यांविरोधात सीआरपीसी 107 व 110 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना तडीपार करण्यात येईल. तसेच ह्या सुचना परत दिल्या जाणार नाहीत अशीही तंबी देण्यात आली आहे.