Friday, January 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

खडक पोलीस स्टेशनची पाचही बोटं तुपात, मटका-जुगार अड्ड्यांचा बाजार सुसाट ऽऽऽ

खडक पोलीस स्टेशनची पाचही बोटं तुपात, मटका-जुगार अड्ड्यांचा बाजार सुसाट ऽऽऽ

पुणे/दि/ नॅशनल फोरम प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट आणि सामाजिक सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांचे धाडस आणि कर्तृत्व- पाकीट आणि थैलीत अंक गणित झाल्यानंतर, अवैध धंदयावर कारवाई होणार नसल्याचा सुटका आणि सुरक्षेचा निःश्वास जुगार अड्डे चालकांनी सोडला आहे. त्यामुळे खडक पोलीस स्टेशन हद्दीतील मटका-जुगार अड्डे पूर्वीसारखेच भरभरून वाहत आहेत. मामलेदार कचेरीजवळ असलेल्या खडक पोलीस स्टेशन हद्दीच्या 360 अंश डिग्री मध्ये ऑनलाईन लॉटरी, मटका अड्डे, तीन पत्ती, 52 पत्यांचा जुगार, कागद व काचेवरील पणती -पाकोळी जुगार कुठे नाहीत असे विचारल्यास…. सगळीकडे आनंदी आनंद गडे… जिकडे – तिकडे मटके अड्डे… इकडे तिकडे जुगार अड्डे एवढच वर्णन करणं पुरेस ठरलं आहे.


पुण्यातील गुरूवार पेठ जुगार अड्ड्यांसाठी आंदण म्हणून देवून टाकलय –
सध्या राज्यात खरीपाची पिकं काढणीला आली आहेत. पिकातील दाणे टपोरं होवून बाहेर पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी दादा, शेतमजुरांना शेत अर्धाली, पावकीनं आंदण देवून करार करीत आहेत. पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच देखील तसंच आहे, संपूर्ण गुरूवार पेठ जुगार अड्डयासाठी आंदण दिलं असल्याचं चित्र दिसून येत आहे. फुलवाला चौकापासून ते अंबामाता- जैन मंदिर व्हाया डॉ. कोटणीस मनपा दवाखान्यापर्यंत सगळा भुभाग जुगार अड्डयांसाठी आंदण म्हणून देऊन टाकला आहे.
जुगाराचे सर्व प्रकार सुरू आहेत. ही बाब नागरीकांना दिसते, सामाजिक कार्यकर्ते, मंडळाचे पदाधिकाऱ्यांना दिसते… खडक पोलीस स्टेशन मधील न्याय हक्कांपासून वंचित पोलीसांना देखील दिसते, परंतु पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांसह गुन्हे युनिट आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या दृष्टीपथात आढळुन येत नाही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीपथात येण्यासाठी नागरीक आणि स्थानिक पोलीसांच्या मदतीने हे वृत्त प्रसारित करावे लागत आहे.


मंडई ते खडकमाळ- जुगार अड्डयासाठी चार मजली महाल बांधला –
मंडईपासून ते खडकमाळ आळीपर्यंत जुगार अड्डयातील जुना खिलाडी बंधूचं मोठं प्रस्थ आहे. एवढच कशाला… जुगार अड्ड्यासाठी चार मजली महाल बांधलेल्या बंधूच्या समोरच फडगेट पोलीस चौकी आहे. थोडक्यात जुगार अड्डयाच्या सुरक्षेसाठी फडगेट मधील पोलीसांना धारेवर धरले जाते इतकी त्याची ताकद आहे. हे देखील पोलीस आयुक्तालयाला दिसत नाहीये.


राजेवाडी- कासेवाडी- दोघ्या बहिणी… बहिणी…. जुगार अडडयाचा संसार मांडू गंजपेठ पोलीस चोकीपाशी –
खडक पोलीस स्टेशनच्या 360 अंश डिग्री मधील शेवटचा भाग ठरणाऱ्या मोठ्या स्लम विभागात प्रत्येक गल्ली बोळात मटका, जुगार अड्डा, पत्ता क्लब याशिवाय गांजा, मेफेड्रॉन सारखे अंमली पदार्थ सहजपणे रिचविले जात असल्याची माहिती समोर आली आहे. देशी विदेशी दारू- तर ड्राय डे ला देखील मिळते. हात भट्टीच्या पहिल्या धारेत न्हावुन निघणाऱ्यांची दैनंदिन संख्याही कमी नाही.
याच 360 अंश डिग्रीच्या खडक पोलीस स्टेशन हद्दीत धाडसी पोलीस अधिकारी श्री. राजेश पुराणिक यांनी अनेकदा कारवाई करून इथली सगळी अवैध व बेकायदा यंत्रणा मोडून काढली होती. परंतु स्थानिक पोलीसांच्या मदतीने आणि जोडीला गुन्हे शाखेच्या सहाय्याने अवैध धंदयाची साखळी पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. थोडक्यात खडक पोलीस स्टेशनची पाचही बोटे तुपात नसून संपूर्ण खडक पोलीस स्टेशनचे अधिकारीच तुपात डुंबले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरूच नये. तुर्तात इतकेच. पुढे गल्लीबोळ निहाय विवरण पुढे पाहूच.