
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरात स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान व राष्ट्रीय जनगणनेचे काम सुरू आहे. पुणे महापालिकेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला जनगणनेचे काम दिले आहे, तसेच घनकचरा विभागातील मोकादम, आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांना राष्ट्रीय जनगणना व स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान अशी दोन्ही कामे देण्यात आली आहे. त्यात पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. प्रजित नायर यांनी शुक्रवार दि. 5 जुन 2026 रोजी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान काळात कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे आदेश देण्यात आले होते. तसेच राज्य शासनाने देखील जनगणना काळात कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत अशा सुचना व शासन निर्णय जारी केलेला आहे. शासनाचे आदेश व आयुक्तांचे निर्णय असतांना देखील पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे खातेप्रमुख उपआयुक्त श्री. संतोष वारूळे यांचे मार्फत बदल्यांचे प्रकरण अति. आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आले. वस्तुतः अति. आयुक्त प्रजित नायर यांनी बदली करण्यास नकार देणे अपेक्षित असतांना देखील, कर्मचाऱ्यांवर जनगणना आणि स्वच्छ सर्व्हेक्षणाची टांगती तलावर असतानाही वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
अति. आयुक्त प्रजित नायर यांनी बदलीच्या आज्ञापत्रकात नमूद केले आहे की, पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार्यरत असलेले वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांची या आज्ञापत्रकाच्या दिनांकापासून प्रशासकीय सोयीनुसार बदली करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. यात एकुण 4 वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यात
- धनकवडी आंबेगाव क्षेत्रिय कार्यालयाचे श्री. श्रीपात नाईक यांची बदली येरवडा विमाननगर वाघोली क्षेत्रिय कार्यालयात करण्यात आली आहे.
- वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे श्री. संदिप चव्हाण यांची बदली सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय येथे करण्यात आली आहे.
- घनकचरा व्यवस्थापन कार्यालयातील सुनिल तंवर यांची बदली पुन्हा ढोले पाटीर्ल रोड क्षेत्रिय कार्यालयात करण्यात आली आहे.
- सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे श्री. मंगलदास माने यांची बदली हडपसर-मांजरी क्षेत्रिय कार्यालयात करण्यात आली आहे.
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. श्रीपाद नाईक –
दरम्यान श्रीपाद नाईक यांची बदली मागील दीड वर्षापूर्वी धनकवडी आंबेगाव क्षेत्रिय कार्यालयात करण्यात आली होती. त्यांनी एका पदावर तीन वर्षाचा अवधी पूर्ण केला नाही. तरी देखील बदली करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे श्रीपाद नाईक यांचे विरूद्ध एकही तक्रार अर्ज नाही, कोणतीही खातेनिहाय चौकशी नाही, तरी देखील बदली करण्यात आली आहे. नियुक्तीपासून आत्तापर्यंत तीन वेळा बदली केल्यामुळे श्रीपाद नाईक यांना तुकाराम मुंढे असे नाव देण्यात आल्याचे समजते.
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. मंगलदास माने-
श्री. मंगलदास माने यांना देखील सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात 3 वर्षांचा अवधी पूर्ण करू दिलेला नाही. दरम्यान ज्या हडपसर मांजरी क्षेत्रिय कार्यालयात त्यांचे विरूद्ध खातेनिहाय चौकशी झाली, त्याच कार्यालयात पुन्हा बदली केली आहे. महत्वाचे म्हणजे श्री. मंगलदास माने यांचे सेवानिवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. कायदयातील तरतुदीनुसार सेवानिवृत्ती जवळ आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची कायदयातच तरतुद नाही. तरी देखील बदली करण्यात आली आहे.
मंगलदास माने यांच्या विरूद्ध अनेक तक्रारी आहेत, कोणत्याही तक्रार अर्जांवर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता मूग गिळून गप्प बसतात असे त्यांच्याविषयी सांगितले जाते. कामचुकारी हा श्री. माने यांचा गुणधर्म आहे यात वाद नाही. तरी देखील सेवानिवृत्तीच्या लगतच्या काळात त्यांची बदली करणे योग्य नव्हते, त्यातच बदली करायचीच होती, तर हडपसर येथे बदली करणे अनुचित असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. सुनिल तंवर –
सुनिल तंवर यांची बदली मागील एक वर्षापूर्वी करण्यात आली होती. ढोलेपाटील रोड क्षेत्रिय कार्यालयातून त्यांची बदली घनकचरा व्यवस्थापन मुख्य कार्यालयात करण्यात आली होती. त्यांच्याही पदाचा 3 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला नव्हता. तरी देखील पुन्हा श्री. तंवर यांना ढोलेपाटील रोड क्षेत्रिय कार्यालय देण्यात आले आहे. यावरून अधिक शंका उपस्थित होत आहे. त्यातच संदीप चव्हाण यांच्या विषयी देखील फारशा तक्रारी नसतांना देखील त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे या बदल्या प्रशासकीय कारणांसाठी दाखविण्यात आल्या असल्या तरी यात आर्थिक देवाण-घेवाण यापेक्षा सुडाची भावना अधिक असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य निरीक्षकांच्याही बदल्या –
मूळात पुणे शहरात स्वच्छ सर्व्हेक्षण व राष्ट्रीय जनगणनेचे काम सुरू असतांना, सुमारे सहा आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नाव, सध्याचे ठिकाण व बदलीचे ठिकाण अनुक्रमे नमूद आहे.
- श्री. राहुल बाठे – धनकवडी आंबेगाव क्षेत्रिय कार्यालय ते – बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय
- शांताराम सोनावणे- येरवडा विमाननगर क्षे. कार्यालय ते – धनकवडी आंबेगाव क्षे. कार्यालय
- श्री. विशाल पाटसकर – येरवडा विमाननगर ते कसबा पेठ क्षे. कार्यालय
- श्री. योगेश जाधव – येरवडा विमाननगर ते कोथरूड बावधन क्षे. कार्यालय
- श्री. सचिन सावंत – कोथरूड बावधन ते वारजे कर्वेनगर क्षे. कार्यालय
- जगदीश साळवे- विश्रामबागवाडा ते हडपसर मांजरी क्षे. कार्यालय, अशा बदल्या करण्यात आल्या आहेत.
ज्यांनी बदली मागितली त्यांना बदली दिलीच नाही-
घनकचरा व्यवस्थापन कार्यालयाकडे एकुण चार ते पाच वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांनी विनंती बदल्या मागितल्या होत्या, यात राहुल राजगुलकर, सावंत, धनश्री जगदाळे, जालिंदर कदम यांची नावे आहेत. तथापी यांच्या बदल्या केल्या नाहीत हे विशेष.
राम सोनवणे व त्यांच्या चार आरोग्य निरीक्षकांनी आदेश धुडकावला, पुढे काय –
दरम्यान मागील एक वर्षापूर्वी कोथरूड क्षेत्रिय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. राम सोनवणे व त्यांच्या चार आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. परंतु राम सोनवणे व त्यांच्या एसआयनी बदलीचा आदेशही घेतला नाही आणि बदलीच्या ठिकाणीही गेले नाहीत. अति. आयुक्तांचा आदेश धुडकावून लावला तरी आजमितीस कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
थोडक्यात पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात अंधाधूंद कारभार सुरू आहे यात शंकाच नाही.
सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात मागील 15 वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असलेले आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार यांना पुणे महापालिकेने दत्तक घेतल आहे की काय… 15 वर्षात बदलीच नाही. बदली केली तरी 15 दिवसांत पून्हा सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात हजर………… (वाचा पुढील अंकात)
