
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पोलीसांनी मनांत आणल तर पाताळात लपलेल्या गुन्हेगाराला देखील जमीनीवर आणू शकतात.मेरी आवाज सुनो हे पृथ्वीवरील पडलेल्या प्रश्नांचे उत्तर असले तरी, तिन्ही लोकांत ( आकाश,जमीन व पाताळ) भ्रमंती करण्याचे कसब हे पुण्यातील पोलीसांकडे आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील मैफिल पान हाऊस मध्ये सापडलेल्या धाग्या-दोऱ्यातून थेट स्वर्गात प्रवेश करून आरोपींना बेड्या ठोकण्यात पुणे व पिंपरी चिंचवडच्या पोलीसांना यश आले आहे.
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की,
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत दि. 13 मार्च रोजी मैफिल पान हाऊसवर छापा कारवाई करण्यात आली. त्याच्यावर एनडीपीएस नुसार गुन्हेही दाखल केले. परंतु या गुन्ह्याचा तपास करता त्याचे धागेदोरे पिंपरी चिंचवड हद्दीपर्यंत येऊन पोहोचले. दरम्यान दि. 14 मार्च रोजी पिंपरी चिंचवड भागात गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 2 अधिक तपास करत असतांना, कैलास मांढरे हा अंमली पदार्थ मिश्रीत भुकटीचे उत्पादन व विक्री करीत असल्याची पोलीसांना खात्रीशीर माहिती प्राप्त झाली.
त्याच माहितीच्या आधारावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला असता. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील जांबेगाव ग्रामपंचायतीच्या पाठीमागे, चैतन्य फुड गोडाऊन येथे आरोपी
1) कैलास दत्तात्रय मांढरे, वय 54 वर्षे,
2) अनुराधा कैलास मांढरे, वय 54 वर्ष, दोघे (रा. माळसाकांत चौक, आकुर्डी, पुणे)
हे अंमली पदार्थ मिश्रित भुकटी तयार करीत असताना सर्व साधन सामग्रीसह रंगेहाथ मिळुन आला. या ठिकाणावरून सुमारे 6 लाख 63 हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ मिक्स पावडर व काळ्या रंगाचा अंमली पदार्थ मिश्रित पातळ पदार्थ, तीन मोबाईल, एक चार चाकी गाडी, वेगवेगळ्या मशीन जप्त करण्यात आल्या असुन वर नमूद आरोपीविरुद्ध हिंजवडी पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस क 8 (क), 17 (ब), 22 (ब), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्याचा पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशन करीत आहेत.
सदरची कारवाई अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 श्री. राजेंद्र मुळीक, यांचे विशेष मार्गदर्शनाखाली पंडीत रेजितवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंपविप 2. सपोनि नितीन नाईक व अंमली पदार्थ विरोधी पथक 2 कडील रार्व अंमलदार यांनी केली.
