Thursday, November 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

दोन वर्षात 200 मोक्का, 150 एमपीडीए …. अजुनही बरेच प्रस्ताव प्रलंबित… तरीह पुण्यात क्राईम वाढत आहे, चालु वर्षात मोक्क्याने शंभरी गाठली हो….

इमानतळ पुलिस हद्दीत पैशांचा निघतोय धूर…दिस गेला ढळुन-रात आली फुलून, डाव अर्ध्यावरी राहू दया, रात धुंदीत ही जागवा…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
देश विदेशातील महिला व मुलींचा देह व्यापार करणाऱ्यांना पोलीस व कायदयाचा धाक राहिला नाही…..। पोलीसांवर शासनकर्त्यांचा धाक राहिला नाही…..॥ शासनकर्त्यांवर सांविधानिक जबाबदाऱ्या व तरतुदींचा धाक राहिला नाही…..॥। त्यामुळे आज पुण्यात गैरकायदयाचे धंदे अधिक वाढले असल्याचे दिसून येत आहे. जेवढे गैरकायदयाचे धंदे त्याच्या 10 पट रॉ मटेरिअल अर्थात गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. मोक्का व एमपीडीए सारख्या कडक कायदयाने गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण आणण्याचे मागील दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु मागील दोन वर्षात मकोकाचे 200 तर एमपीडीए चे 150 च्या आसपास गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाया केल्या आहेत. मकोका व एमपीडीए चे आजही बरेच प्रस्ताव सहीसाठी प्रलंबित आहेत. दरम्यान पुण्यात आजमितीस गुन्हेगारी नियंत्रणात आली आहे असे कुणीही ठामपणे सांगु शकत नाही. पुण्यातील बहुताश पोलीस स्टेशन हद्दीत दरदिवशी कमालिचे क्राईम वाढत आहे.

गुन्हेगारांचे आर्थिक विश्व आणि कायदा-
पुणे शहरातील गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्या त्यांना अवैध मार्गाने आर्थिक लाभ मिळविण्याच्या किंवा स्वतःसाठी किंवा कोणत्याही अन्य व्यक्तींसाठी गैरवाजवी आर्थिक किंवा इतर फायदा मिळविण्याच्या किंवा उठाव करण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक तर संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा अशा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाकदपटशा किंवा जबरदस्ती करून किंवा अन्य बेकायदेशिर मार्गांनी चालु ठेवलेले असल्याचे दिसून येत आहे.
यात बेकायदेशिर व गैरकायदयाचे कृत्य करणाऱ्यांना पोलीस व कायदयाचा धाक का राहिला नाही यावर अन्वेषण होणे आवश्यक आहे. गुन्हा घडला तरच गुन्हे दाखल करण्याचे काम केले जाते. परंतु वारंवार एकाच प्रकारचे अनेकदा गुन्हे घडत असतील तर त्या मागे नेमके कोणते कारण आहे याचाही तपास किंवा अन्वेषण होणे आवश्यक आहे. मुळात गुन्हे घडूच नये यासाठी प्रत्येक कायदयात तरतुदी आहेत. परंतु सध्या मात्र गुन्हा घडला की गुन्हा दाखल करणे एवढेच काम होत असल्याचे दिसून येत आहे. आता गुन्हे अन्वेषण होणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

गुन्हेगारांना पोलीस व कायदयाची भिती का वाटत नाही-
पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशिर व गैरकायदयाचे शेकडे अवैध धंदे आज मोठ्या संख्येने कार्यरत झाले आहेत. 30/ 35 पोलीस स्टेशन व दोन /तीन डझन गुन्हे युनिटस कार्यरत आहेत. असे असतांना देखील पुणे शहरात एवढ्या मोठ्या संख्येने गुन्हेगारी व गुन्हेगारी टोळ्या सक्रिय संगनमताने अवैध धंदे चालवित असल्याचे दिसून येत आहे. आता याच्या मुळाशी गेल्यानंतर काही बाबी समोर आलेल्या आहेत. काही अवैध व बेकादेशिर धंदयात पोलीसांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पोलीसांच्या परवानगी खेरीज हद्दीत चायनिज तर सोडाच, परंतु साधी वडापावाची गाडी व पानटपरीही लावु शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे पोलीसांना माहिती न होता, गुपचुप जुगार अड्डा चालविणे हे तर दुरदुर पर्यंत शक्यच नाही. त्याची पुणे शहरात शेकडो उदाहरणे देता येऊ शकतील.

त्यामुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढते-
त्याचे कालपरवाचे उदाहरणच दयायचे तर, विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत, पुणे नगर रस्त्यावर खराडी बायपास येथे काही गुन्हेगारी इसम जुगार अड्डयाच्या नावाखाली नागरीक प्रवाशांना लुटत होते. शनिवारी तक्रार केल्यानंतर पुन्हा हा धंदा रविवारी देखील सुरू होता. रविवार मात्र मोठा गुन्हा घडला. लाल काळा, लाल-पिला अशा प्रकारचा कोणताही जुगार खेळला नसतांना देखील, तु जिंकला आहेस, पण तु जुगारावर पैसे लावले नाहीत, म्हणून आधी पैसे लाव म्हणून एका नागरीकाला बळजबरीने ओढुन, त्याच्या बँकेतील 35 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून त्याच्यावर दराडा टाकला आहे.

दरम्यान विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेला जुगार अड्डयाचा मालक हा मागील 30 ते 35 वर्षांपासून पुणे शहरासह विविध जिल्ह्यात अशा प्रकारचे जुगार लावुन नागरीकांना लुटत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे नाव अब्दुल असल्याचेही समोर आले आहे. तथापी विमानतळ पोलीसांत फिर्यादीने तक्रार दाखल केल्यानंतर, विमानतळ पोलीसांनी अज्ञात इसमावर भादवी कलम 392, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

वस्तुतः तो ज्या ठिकाणी जुगार अड्डा चालवित होता, त्याच्या पाच सहा दुकानांच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पुणे महापालिकेचे प्रखर दिवे आहेत. या शिवाय ट्रॅव्हल कंपन्यांनी त्यांच्या दुकानाबाहेर देखील मोठे विद्युत दिवे लागले आहेत. त्यामुळे गुन्हेगाराचा चेहरा दिसून आला नाही, किंवा ते कोण होते याचाही तपास विमानतळ पोलीसांनी केला नाही. केवळ संबंधित जुगार अड्डा चालविणाऱ्याला पोलीस संरक्षण देण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. 

पोलीसच जर अशा प्रकारे सराईत गुन्हेगाराला संरक्षण देत असतील तर गुन्हेगारी वाढणे हे साहजिकच आहे. याच प्रकारचे अनुकरण इतर गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्या करीत नसतील हे कशावरून समजायचे हा प्रश्नही निर्माण होतो. त्यामुळे नवीन गुन्हेगार तयार होत आहेत. पोलीस काहीच करणार नाहीत, अशी भावना गुन्हेगाराच्या मनात तयार होत आहे. मग त्याने गुन्हा केल्यानंतर, गुन्हे दाखल करण्याची लगबग सुरू होते. परंतु तेवढ्या वेळात असंख्य गुन्हेगार तयार होत आहेत. आत दुसरे उदहारण पाहूयात -

कोरेगाव पार्क, मुंढवा, भारती विदयापीठ पोलीस स्टेशन नंतर आता विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील देहव्यापार –
….नको परकेपणा मला तुमची म्हणा, घरच्यावाणी मला वागवा…. रात धुंदीत ही जागवा-

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील विख्यात ओशो आश्रमामुळे देश विदेशातील पर्यटक येथे येत असतात. अनेक वर्षांपासून पर्यटक येथे येतात. त्यामुळे कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत सेक्स टुरिझम अधिक वाढले होते व आजही ते कायम आहे. त्या धंदयात मुबलक पैसा मिळत असल्याने, त्याचा विस्तार अधिक वाढत गेला. पुढे कल्याणीनगर, मुंढव्यापर्यंत त्याचा विस्तार झाला.

दरम्यान मुंढवा, खराडी, कल्याणीनगर, विमाननगर आदि परिसरात कॉल सेंटरची संख्या वाढली. त्यामुळे देखील देश विदेशातील मनुष्यबळ पुण्यात कार्यरत झाले. थोडक्यात देश विदेशातील महिला व मुलींचा अपव्यापार अधिक वाढला असल्याचे दिसून येत आहे. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन नंतर, मुंढवा पोलीस स्टेशन व पुढे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत देहव्यापाराने उच्चांक गाठला आहे. आता पुढेचे पाऊल विमानतळ पोलीस स्टेशन यांनी टाकले आहे. विमानतळ पोलीस स्टेशन हद्दी लगत कोरेगाव पार्क व मुंढवा परिसर असल्याने, तसेच कॉल सेंटर असल्याने येथे देखील अजस्त्र शक्तीनिशी महिला व मुलींचा देह व्यापार सुरू आहे. पुणे नगर रस्त्याने दिवसा किंवा रात्री जात येत असतांना, ढाण ढाण डीजे सतत वाजत असतो. डान्सबार, पब दिवस-रात्र सुरू असतात. 

विमानतळ पोलीसांकडे तक्रारींचा पाऊस, तरीही कारवाई नाही-
देश विदेशातील तरूण तरूणींसह पुण्यात आलेल्या परराज्यातील तरूणांचा धिंगाणा सुरू असता. गलेलठ्ठ पगार व पॅकेज मिळत असल्याने पैशांचा धुर निघत असल्याने, पुण्यातील भांडवलदारांनी त्यांच्या चैनिच्या बाबी त्यांना देत आहेत. याचा दुष्पपरिणाम स्थानिक नागरीकांवर होत असल्याने अनेक संस्था व संघटनांनी विमानतळ पोलीसांना तक्रार अर्ज व निवेदने देवून, मसाज पार्लर, स्पा सह पब व डान्सबार सदृष्य बारमधुन दिवरात्र ढाण ढाण वाजणारा डीजे बंद करण्याची मागणी केली. तरी देखील विमानतळ पोलीस कायदयातील तरतुदीनुसार कार्यवाही करीत नाहीत. त्यामुळे अय्याशीसाठी अनेक गुन्हेगार मंडळी विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत आरामाला असतात असेही ऐकण्यात आले आहे. थोडक्यात रंगील अय्याशी, जुगाराचे माहेरघर म्हणून आज विमानतळ पोलीस स्टेशन नावलौकिक मिळवित आहे. परंतु गुन्हेगारी देखील तितकीच वाढत असतांना, पोलीस कायदयाचे राज्य प्रस्थापित करू शकत नाहीत त्यावर कार्यवाही करणार तरी कोण…

थोडक्यात देश विदेशातील महिला व मुलींचा देह व्यापार करणाऱ्यांना पोलीस व कायदयाचा धाक राहिला नाही.....। राज्य शासनाने कॅसिनोवर बंदी आणली असली तरीही पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत मिनी कॅसिनो कार्यरत आहेत, मटका जुगार अड्डे, रमीचे क्बल, तीन पत्ती, अंदर-बाहर, पणती पाकोळी सोरट, ऑनलाईन लॉटरी, व्हिडीओ गेम पार्लर सारख्या ठिकाणी जुगाराचे पाट वाहत आहेत....त्यांच्यावरही पोलीस व कायदयाचा धाक नाही.... ॥  पोलीसांवर शासनकर्त्यांचा धाक राहिला नाही.....॥ शासनकर्त्यांवर सांविधानिक जबाबदाऱ्या व तरतुदींचा धाक राहिला नाही.....॥।  त्यामुळे आज पुण्यात गैरकायदयाचे धंदे अधिक वाढले असल्याचे दिसून येत आहे. जेवढे गैरकायदयाचे धंदे त्याच्या 10 पट रॉ मटेरिअल अर्थात गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. कायदा राबविणारे व कायदयाची अंमलबजावणी करणारांनी याकडेही अधिक लक्ष देणे आवश्यक ठरते.