Tuesday, May 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

घरफोडी, दरोडा, सायबर क्राईम, संगनमताने लुट आणि फसवणूकीने पुणे शहर दणाणून गेले, जबरी दरोड्याने आठवडा गाजला

पुणे/दि/ प्रतिनिधी/
मोबाईलवरील व्हॉटसऍप, फेसबुक ची चॅटींग, सुशांतसिंह, कंगणाबाई काय म्हणाली, राऊत- फडणवीस भेटी, हाथरस मधील राजपुत्र व राजकन्येवरील पोलीसी वर्तणूक या सारख्या घटनांनी आठवडा गाजत असतांना, पुणे शहरातील जबरी दरोडे, सायबर क्राईम, घरफोडी, संगनमताने लुट व फसवणूकीने पुणे शहरातील आठवडा दणाणून गेला आहे. जबरी दरोड्याने संपूर्ण आठवडा गाजला आहे. आठवड्याची सुरूवातच फरासखाना पोलीस स्टेशनने सुरू केली. फरासखाना हद्दीतील कसबा पेठेत भर सोमवारी दरोड्याची बातमी आली. सोमवार ते रविवार पर्यंत शहरात दरोड्याशिवाय दुसरे काहीच नाही.


पुणे शहरात वास्तवात काय चालले आहे त्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न असतो. सर्वसामान्यांच्या जीवनाशी ज्यांचा कोणताही संबंध नाही त्या बातम्या प्रसारित करून, जनतेचे लक्ष विचलित करायला आमचा हा काही आयटी सेल नाही. किंवा भांडवलदारी वृत्तपत्र वा मिडीया नाही. जे भांडवलदार कंपन्यांना पाहिजे, त्याच बातम्या वृत्तपत्रे व खाजगी वृत्तवाहीन्या प्रसारित करीत असतात असा जनतेचा समज झाला आहे. आम्हीही त्याच्याशी सहमत असतोच. त्यामुळे जनतेच्या दृष्टीने, पुणेकरांच्या दृष्टीने जे आवश्यक आहे, जे घडत आहे, तेच त्यांच्या समोर मांडण्याचे आमचे काम आहे. यातून पुणेकरांनी काहीतरी धडा घ्यावा हा उद्देश असतो.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील एकही पोलीस स्टेशन नाही जिथे मागील आठवड्यात दरोडा, घरफोडी झाली नाही. सगळीकडे दरोडे आणि लुटालूटीचे सत्र सुरू आहे. पोलीस गुन्हा नोंद करून घेत आहेत, परंतु गुन्ह्याची उकल लवकर होत नसल्याने गुन्हेगार सोकावले आहेत. पोलीस स्टेशनच्या १० पावलांवर दरोडा आणि हत्याकांड होत असतांना देखील पोलीस वेळेवर बाहेर येवून गुन्हेगारांवर कारवाई करीत नाहीत असाही अनुभव आहे. त्यामुळे सावधानता, सुरक्षितता महत्वाची आहे.


कोथरूड पोलीस स्टेशन –


कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीत मनोजकुमार शहा वय ५७ वर्षे यांनी फिर्याद दिली आहे की, फिर्यादी हे लौकीत सोसायटी कोथरूड येथे रहावयास असून, ते सोसायटीचे चेअरमन आहे. त्यांच्या सोसायटीत राहणारे श्रीमती गिता चॅटर्जी यांचा राहता फ्लॅट बंद असतांना कुणीतरी घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून चोरी केली आहे. दरम्यान फ्लॅटचे मालकीण ह्या कोरोनाचे वाढत्या प्रादुर्भावामुळे येण्यास शक्य झाले नसल्यामुळे फिर्यादी यांनी तक्रार दिली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक पडवळे तपास करीत आहे.


सिंहगड रोड पोलीस स्टेशन –


सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत धायरी येथे फिर्यादी संग्राम थोपटे वय ४४ वर्षे रा. बारामती पुणे यांनी नमूद केले आहे की, आरोपी एक महिला व आठ पुरूष यांनी ओमसाई डेव्हलपर्स या फर्मचे भागीदार असतांना, यातील नमूद आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व साक्षीदार यांना धायरी येथील स.नं. ११७/ ३ क्षेत्र १ हेक्टर ८४ आर येथील प्रकल्पा मध्ये आर्थिक नुकसान होवून त्यांचे इतर भागीदार यांना आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने या आरोपींनी त्यांच्या परस्पर खोट्या सह्या करून फर्म मधील त्यांचा १५ टक्के हिस्सा ५ टक्के करून सोरटे यांची फसवणूक केली आहे. भागीदारी व समझोता करारनामा तयार केला. नोटरी समोर फिर्यादी हजर नसतांना देखील तो नोंदवून घेण्यात आला. बनावट दस्त खरा म्हणून तो वापरून फिर्यादी यांची फसवणूक केल्याचे नमूद आहे. अधिक तपास सहा. पो. निरी एस.व्ही. उमरे करीत आहेत.


हडपसर पोलीस स्टेशन –


हडपसर पोलीस स्टशेन हद्दीत सायबर दरोडा टाकण्यात आला आहे. हडपसर येथील एका ४३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे की, मोबाईल क्रमांक व बँक खाते धारक वापरकर्त्यांनी संगनमत करून श्रृती नायर, राहित गुप्ता, प्रतिक वर्मा, आनंद सुधांशु मिश्रा अशी खोटी नावे सांगून नोकरीला लावतो असे सांगून रिक्रुटमेंट एजन्सी कडून बोलत असल्याचे सांगुन असेंन्टर या कंपनीत जॉब देण्याचे आमिष दाखवुन वेगवेगळ्या प्रोसेसिंग फी म्हणून एकुण ११ लाख ९९ हजार ६११ रुपये त्यांचे वेबसाईटवरील लिंकवर ट्रान्सफर करण्या भाग पाडून त्यापैकी ३ लाख ३९ हजार १४ रुपये परत केली परंतु फिर्यादीस नोकरी व त्यांची रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. अधिक तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. एच.टी. कुंभार करीत आहेत.

स्वारगेट पोलीस स्टेशन –
शेअर रिक्षात बसवून, प्रवाशांची लुटमार


संतोष बंडगर वय २० वर्षे रा. कात्रज हे स्वारगेट एस.टी. स्ँड येथे रात्रौ १० वाजण्याच्या सुमारास कात्रज येथे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत थांबले असता, एका ऑटो रिक्षात तीन अनोळखी इसम बसलेले पाहून, इतर पॅसेंजर आहेत, शेअर रिक्षा असल्यामुळे त्याने देखील कात्रज येथे जाण्यासाठी नेहमी प्रमाणे प्रवेश केला.
तथापी रिक्षा चालक व इतर तीन अनोळखी इसम हे सहप्रवासी नसून दरोडेखोर असल्याचे समोर आले आहे. प्रवासाच्या नावाखाली प्रवाशांची लुट हे आता नेहमीचे झाले आहे. झालेही अगदी तसेच, संतोष बंडगर याला पर्वती येथील राजमाता हॉस्पीटलच्या बोळात रिक्षा नेवून, त्याच्या पोटाला चाकु लावून, त्याच्या पाकीटातील २ हजार रुपये व मोबाईल असा एकुण १४ हजार रुपये किमतीचा एैवज जबरदस्तीने काढुन घेवून रिक्षा मधुन पळून गेले. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक जायभाय करीत आहेत.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन २, सिंहगड पोलीस स्टेशन ४, कोथरूड ३, हडपसर ४, वारजे पोलीस- ५, फराखाना १, स्वारगेट पोलीस स्टेशन – ५, कोंढवा – ४, विमानतळ २, डेक्कन १, खडकी १ विश्रांतवाडी १, वानवडी २, चंदननगर २ या आठवड्यात एवढ्या घरफोडी, दरोडा, सायबर क्राईम, संगनमताने लुट आणि फसवणूकीने पुणे शहर दणाणून गेले, जबरी दरोड्याने आठवडा गाजला आहे. घरफोडी करण्याच तंत्र सर्वत्र सेम टू सेम आहे, सायबर क्राईम मध्ये तर लबाडीने पासवर्ड घेवून, आमिष दाखवुन, आर्थिक फसवूणक केली आहे. संगनमताने लुट, फसवणूकीचे तंत्र प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सेम टू समे आहे. आता खरे गुन्हेगार जेरबंद करणे आवश्यक आहे.

दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक ए.आर. कवठेकर व चिवडशेट्टी करीत आहे. सिंहगड पोलीस स्टेशन कडील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. घाटगे, सहा. पोलीस निरीक्षक एस.व्ही. उमरे व ए.के. बोदडे करीत आहे.  कोथरूड पोलीस स्टेशन येथील तपास पोलीस उप निरीक्षक पडवळे करीत आहेत.  हडपसर येथील तपास पो. हवा. पी.एच. गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे एच.टी. कुंभार करीत आहे.  वारजे पोलीस स्टेशन येथील तपास पोलीस उपनिरीक्षक येवले  फराखाना पोलीस स्टेशन कडील तपास एन.बी. पाटील करीत आहे. तसेच  स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास  जायभाय व इतर करीत आहे. कोंढवा  पोलीस स्टेशन कडील तपास सहा. पोलीस निरीक्षक स्वराज पाटील, सहा. पोलीस निरी. चेतन मोरे करीत आहेत तसेच  विमानतळ पोलीस स्टेशन कडीहल तपास पोलीस उप निरीक्षक गिरी करीत आहे. डेक्कन पोलीस स्टेशन कडील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे राजु चव्हाण,  खडकी  पोलीस स्टेशन कडील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शफिल पठाण करीत आहेत. तसेच विश्रांतवाडी पोलीस उपनिरीक्षक सातपुते तर वानवडी  सहा. पोलीस निरीक्षक कांबळे व  चंदननगर सहा.पो. निरीक्षक जाधव करीत आहेत.