Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मराठा कार्यकर्त्यांना नक्षलवादी बनवू नका

maratha kranti morcha

मुंबई/दि/ प्रतिनिधी/

                काश्मीरमध्ये दगडफेक करणार्या तरुणांवरील गुन्हे मागे घेतले जात असतील, तर महाराष्ट्र बंदमध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांवरील का नाही, असा सवाल उपस्थित करीत सकल मराठा समाजाच्या महिला कार्यकर्त्यांनी गुरुवारी आझाद मैदानात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.

                उमेदीच्या काळात गुन्हे दाखल करून मराठा कार्यकर्त्यांना नक्षलवादाकडे वळण्यास भाग पाडू नका, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.आंदोलनात विविध जिल्ह्यांतील महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या आहेत.

                रूपाली पाटील म्हणाल्या, न्यायप्रविष्ट मागण्यांवर ठिय्या आंदोलन नसून ज्या मागण्या मुख्यमंत्री पूर्ण करू शकतात, त्याचसंदर्भात आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. देशाच्या सैनिकांवर दगडफेक करणार्‍या काश्मीरमधील तरुणांवरील गुन्हे रद्द केले जातात. ते लहान असल्याचे कारण दिले जाते.

                मग राज्यात स्वत:च्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा तरुणांना वेगळा न्याय का लावला जात आहे? मुळात मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे मराठा कार्यकर्त्यांना जलसमाधी आणि आत्महत्यांसारख्या आंदोलनांसह रस्त्यावर उतरावे लागले. त्यामुळे मराठा तरुणांचे भवितव्य खराब करू नये.

                या मागणीत चाकण आणि वाळुज येथील घटनांचा समावेश नाही. मात्र राज्यात इतर भागात आंदोलन करणार्या तरुणांना आजही घरातून उचलून नेले जात आहे. पोलिसांकडून अमानुष मारहाण केली जात आहे. परभणीत तर महिला कार्यकर्त्यांनाही घरात घुसून पोलिसांनी मारहाण केली आहे, हे निषेधार्ह आहे.

                दोषी पोलिसांविरोधात मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.४ सप्टेंबरला मंत्रालयाला घेराव घालण्यात येईल. मात्र त्याआधी मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या नाही, तर मराठ्यांचा गनिमी कावाही मुख्यमंत्र्यांना पाहायला मिळेल, असा इशारा आंदोलक वैशाली जाधव यांनी दिला आहे.