Saturday, May 11 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

महिला शंकराचार्य बनू शकत नाही – स्वामी स्वरूपानंद

swami swaropanand

मथुरा/दि/ महिला राजकारणासह कोणत्याही इतर क्षेत्रात जाऊ शकतात, मात्र त्या शंकराचार्य बनू शकत नाहीत, असे वक्तव्य द्वारका-शारदापीठ आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले आहे.

                इतकेच नाही तर, नेपाळमधील प्रसिद्ध पशुपतिनाथ पीठाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी अखिल भारतीय विद्वत परिषदेवरही आक्षेप नोंदवले आहेत. अखिल भारतीय विद्वत परिषद या नावाने उभी करण्यात आलेली संस्था बनावट शंकराचार्य तयार करण्याचे काम करत आहे. या संस्थेने काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये पशुपतिनाथाच्या नावाने एक नवे पीठच निर्माण केले.

                मात्र अशाप्रकारचे कोणतेही पीठ असू शकत नाही, असे स्वामी स्वरूपानंद म्हणाले. या पीठाने महिलेला शंकराचार्य बनवल्याबाबत स्वामी स्वरूपानंद यांनी आक्षेप नोंदवला. कोणतीही महिला शंकराचार्याच्या पदावर बसू शकत नाही, असे खुद्द आदि शंकराचार्यांनीच ठरवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

                स्वामी स्वरूपानंद आपल्या वक्तव्याचे सर्मथन करताना पुढे म्हणाले की, देशातील महिला पंतप्रधान, राष्ट्रपती, खासदार, आमदार बनू शकतात, मात्र कमीतकमी धर्माचार्यांना तरी सोडा. धर्माचे हे पद महिलांसाठी नाही.

                आपल्या म्हणण्याच्या सर्मथनार्थ स्वामी स्वरूपानंद यांनी भारतीय राज्यघटनेचेच उदाहरण दिले. ते म्हणाले, राज्यघटना ही एकाच देशात लागू होऊ शकते, ती त्याच स्वरुपात दुसर्‍या देशात लागू होऊ शकत नाही. त्याच प्रमाणे, कोणालाही शंकराचार्य बनवण्याची व्यवस्था मान्य केली जाणार नाही. शनि मंदिरात महिलांना प्रवेश देण्यामुळे नुकसान होईल, असेही ते म्हणाले.

                शनि क्रूर ग्रह असल्यामुळे शनि मंदिरात महिलांना प्रवेश देण्यात येत नाही. त्याची दृष्टी स्त्रीवर पडली तर तिला नुकसान होऊ शकते. मात्र, समानतेच्या आधारे स्त्री देखील शनिची पूजा करू शकते, असे म्हटले जाते. यामुळे नुकसान होण्यापासून स्त्रीला कोण वाचवणार, असा सवालही स्वामी स्वरूपानंद यांनी उपस्थित केला.                           मथुरेतील वृंदावन येथील उडिया आर्शमातील चातुर्मास कार्यक्रमात अभिनेत्री आणि स्थानिक खासदार हेमा मालिनी सहभागी झाल्यानंतर स्वामी स्वरूपानंद यांनी हे वक्तव्य केले आहे. हेमा मालिनी यांनी स्वामी स्वरूपानंद यांच्या चरणांवर पुष्प अर्पण करून आशीर्वाद घेतले आणि आदि शंकराचार्यांनी रचना केलेले सौंदर्य लहरी स्तोत्र ऐकवले.