Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे पोलीस आणि पुणे महापालिकेची लॉकडाऊन काळातील अशी ही रोजगार हमी, अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही…

वरकमाई मात्र … टीटी- एमएम (तुझं तुझ्याकडे, माझं माझ्याकडे)
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुण्यात कोरोना महामारीचा प्रादूर्भाव मोठा असल्याचे पुणे महापालिकेच्या दैनंदिन अहवालावरून दिसून येत आहे. राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित करण्याआधीच पुणे महापालिकेने पुण्यात लॉकडाऊन लागु केले. एक हप्त्याने मागाहुन राज्य शासनाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागु करण्यात आले. सार्वजनिक वाहतुक बंद असल्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत. नोकरी असलेले कामगार घरीच आहेत, तर बेरोजगारांना नोकरी नसल्यामुळे ते देखील हालअपेष्टा सहन करीत आहेत. घरेलु कामगार, हातावरचे पोट असणारे नाक्यावरचे बिगारी महिला व पुरूष कामगार, सर्वच क्षेत्रातील असंघटीत कामगार सगळे हालाहाल झाले आहेत. कोरोनाने मरता मरता, आता उपासमारी आणि कुपोषणाने मरण्याची अधिक वेळ आली असल्याचे हजारोंचे मत आहे. ही वस्तुस्थिती असली तरी पुणे महापालिका आणि पुणे पोलीसांनी अशा संकटाच्या काळातही रोजगार हमी योजना सुरू केली आहे. रोजगार हमी म्हणजे- अर्धे पुणे मनपा आणि अर्धे पुणे पोलीस. कोरोना महामारी लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारची टीटी – एमएमची योजना मात्र सर्वसामान्यांचा जीव घेत आहे. ये पब्लिक है, ये सब जानती है.


पुणे महापालिका आणि पुणे पोलीसांची काय आहे की रोजगार हमी योजना –
लॉकडाऊन काळात पुणे महापालिकेच्या हद्दीत विनामास्क फिरणारे, विनाकारण मोकाट फिरणार्‍या नागरींकांना प्रतिबंध करण्यासाठी पुणे महापालिकेने ५००/- रुपये दंडाच्या पावतीचे पुस्तक पुणे शहर पोलीसांना दिले आहे. पुणे महापालिकेचे निरीक्षक व इतर कर्मचारी काम करीत असतांना, हे काम पुणे पोलीसांना दिले आहे. ५००/- रुपये दंड वसुलीतून २५०/- रुपये पुणे महापालिकेचे आणि २५०/- रुपये पुणे शहर पोलीसांचे. वसुलीचे मोठे टार्गेट ठेवण्यात आले आहे.
दरदिवशी पुणे शहर पोलीसांकडून कोरोना प्रतिबंध व वाहतुक नियंत्रण चौक्या उभ्या केल्या आहेत. यामाध्यमातून हेल्मेट, लायसन्स, मास्क, पीयुसी, गाडीची कागदपत्रे तपासणी, प्रलंबित दंड वसुली यातून ऑनलाईन वसुली केली जात आहे. तर दुपारी २ ते पहाटे ६ वाजेपर्यंत, पुणे महापालिकेच्या वसुली पावती पुस्तकाची दुप्पट तिनपट आणि पाचपटीने वसुली केली जात असल्याचे प्रत्यक्षात दिसून आले आहे. पुणे महापालिकेचे घनकचरा आणि आरोग्य विभागाकडील निरीक्षक व इतर कर्मचार्‍यांकडून देखील वसुली केली जात आहे. पुणे महापालिकेच्या कर्मचार्‍यांना कुणी भिक घालत नाहीत. हुज्जत अधिक घातली जात असल्याने जास्तीत जास्त वसुली पुणे शहर पोलीसांकडून अर्धालिने करून घेतले जात आहे.
तसंही लॉकडाऊनमुळे पथारी व्यावसायिक रस्त्यावर बसत नाहीत. त्यामुळे पुणे महापालिका आणि कर्मचार्‍यांचे हात ओले होत नाहीत. पोलीसांचीही अशीच अवस्था आहे. बर्‍याच प्रकारचे अवैध धंदे बंद असल्याने, सतत नोटा मोजणार्‍या हातांना शिवशिवल्यासारखे झाले आहे. त्यामुळे पुणे शहर पोलीसांनी, पुणे महापालिकेकडून अर्धालिने वसुलीचे काम घेतले असल्याची टिपण्णी एका पोलीस कर्मचार्‍यानेच केली आहे.
हुज्जत घातली, विचारणा केली तर सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्याची पुणे पोलीसांची अक्कलहुशारी –
कोरोना महामारीने जीवन जगणे कठिण झाले, परंतु अतिअत्यावश्यक बाबींसाठी किंवा हॉस्पीटल तसेच इतर कामांसाठी बाहेर पडल्यानंतर, (पुणे पोलीसांच्या वेबसाईटवर शहरांतर्गत एक दिवसांच्या प्रवासासाठी (हॉस्पीटल, लग्न, मयत व इतर अनुषांगिक बाबींसाठी) तातडीने मंजुरी मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत,शिवाय फॉर्म रिजेक्ट केला जात आहे. परंतु हॉस्पीटल, लग्न आणि मयत, पेशंटच्या भेटी ह्या टाळता येण्यासारख्या बाबी नाहीत. वेळात वेळ काढुन बाहेर पडल्यानंतर, शहर पोलीसांकडुन हेल्मेट, नो- पार्कींग, झेब्रा क्रॉसिंग अशी पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत बसून सीसीटीव्ही कॅमर्‍यातून केलेल्या कारवाईची, प्रलंबित दंडाची वसुली जोरदार केली जात आहे. आजपर्यंत मार्च एंडींगला देखील एवढी मोठी कारवाई केली नसेल एवढी दंडाची वसुली कोरोना काळातील कारवाई दरम्यान केली जात आहे.
कुणाच्या तोंडावर मास्क नाही असे आज पुणे शहरात कुठेही आढळुन येत नाहीत. प्रत्येकाला मरणाची भिती आहे. नियम सगळे पाळत आहेत. भांडवलदारांचे भाडोत्री वृत्तवाहीन्या आणि वृत्तपत्रे मात्र जाणुनबजून विनामास्क कारवाईच्या भल्या मोठ्या बातम्या देवून, किती वसुली केली, अशा प्रकारचे वृत्त प्रसारित करून, पुणेकर किती निर्ढावलेले आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु नागरीक नियम पाळत आहेत, दरम्यान कारवाईस विरोध केल्यानंतर, किंवा खिशात पैसे नाहीत वा डेबिट के्रडीट कार्डात पैसे नाहीत असे सांगुन देखील पोलीस हट्टाला पेटून उठत आहेत. मित्रांना बोलवा, घरच्यांना बोलवा आणि दंड भरा असे सांगत आहेत. दंड वसुली दणक्यात करीत असतांना, कुणी आकांताने ओरडुन सांगण्याचा प्रयत्न केला असता, शासकीय कामात अडथळा आणला म्हणून भादंवी ३५३ नुसार गुन्हा दाखल केला जात आहे. वाहन जप्त केले जात आहे.


पुणेकरांच्या आरोग्याची काळजी नव्हे हा तर जबरी दरोडा –
पुण्यातील सर्व खाजगी हॉस्पीटलमधुन कोरोनावर मोफत उपचाराचे आदेश का काढले जात नाहीत –
पुणेकरांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याचे रंगबिरंगी चित्र रंगविले जात आहे. पुणे पोलीस आणि पुणे महापालिका पुणेकरांसाठी किती जीव ओतून आरोग्य सुविधा निर्माण करीत आहेत, हे मिडियाच्या माध्यमातून चित्र रंगविले जात आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, पुण्यातील कोणतेही हॉस्पीटल ५० हजार एक/ दोन लाख रुपये डिपॉजिट घेतल्याशिवाय कोणत्याही पेशटंला हॉस्पीटलमध्ये प्रवेश देत नाहीत. अव्वाच्या सव्वा बिल लावुन, पेशंटच्या मरणाची भिती दाखवुन, पेशंटच्या नातेवाईकांडून जबरीने वसुली करीत आहेत. पुण्याच्या रास्तपेठेतील, अलंकार जवळील दोन हॉस्पीटल सहित सगळ्या ठिकाणी काय प्रकार सुरू आहेत, हे आता पुणेकरांना सगळे समजले आहे.
पुणेकरांच्या आरोग्याची काळजी असेल तर खाजगी हॉस्पीटलांनी कोरोना झालेल्या पेशंटवर मोफत उपचार करावेत असा आदेश का काढत नाहीयेत. असा आदेश आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यांनी काढले आहेत. मग महाराष्ट्र मागे का आहे हा प्रश्‍न आहे. पुण्यातही पुणे महापालिकेने, खाजगी हॉस्पीटल चालकांनी मोफत उपचार करावेत असा आदेश काढल्यास, एक दिवसातच पुण्यातील कोरोना अटोक्यात आलाच म्हणून समजा असे मिश्‍लिपणे पुण्यात बोलले जात आहे. वस्तुस्थिती काय आहे सर्वांना ज्ञात आहे.


पोलीस मित्रांची भररस्त्यात भाईगिरी –
कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन मध्ये पोलीसांना कारवाई करण्यात मदत व्हावी त्यांच्यावरील कामाचा ताण कमी व्हावा या उद्देशाने वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या, वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना पोलीस मित्र नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, संबंधित पोलीस ठाण्यांनी देखील त्यांच्या हद्दीतील होतकरू तरूणांची नियुक्ती करण्याऐवजी टवाळखोर आणि गुंड प्रवृत्ती तसेच अवैध धंदे चालविणार्‍या, अवैध धंदयावर पंटर म्हणुन काम करणार्‍यांना पोलीस मित्र म्हणून ओळखपत्र देवून त्यांची नियुक्ती केली आहे.
आवश्यक व महत्वाच्या कामासाठी बाहेर पडलेल्या नागरीकांना कुठे निघालास, काय काम आहे, आयडी आहे का अशा प्रकारची अरेरावीची विचारणा करून, हातातील काठी गाडीवर मारून, नागरीकांवर उगारून जाब विचारला जात आहे. अतिशय उर्मट व उद्धटपणे वर्तन केले जात आहे. चेकपोस्ट नाकाबंदी ठिकाणचे पोलीसही लांब थांबुन हा तमाशा पाहत आहेत.
दरम्यान पोलीस मित्रांना कोणत्याही प्रकारचे शस्त्र, लाठी काठी वापरण्याचा अधिकार दिलेला नसतांना देखील पोलीसांसमोरच अशा प्रकारचे गैरवर्तन होत असतांना पोलीस गप्प बसत असल्याचे चित्र आहे. तसेच हेच पोलीस मित्र पोलीसांच्या वतीने वसुलीचे टार्गेट पूर्ण करीत असल्याचेही दिसून आले आहे.
मोठ्या हॉस्पीटलांचे प्रवेशव्दार असलेल्या समर्थ पोलीसांची टोणगेशाही. गावाला सोडलेला वळू आता खात्यातील कर्मचार्‍यांना देखील ढुश्या मारू लागला –
समर्थ वाहतुक विभागात पुराणिक नावाचे पोलीस निरीक्षक कार्यरत असून, दिवसरात्र वसुलीच्या कामा दंग असतात. एसपीओ नागरीकांना काठी उगारून थांबवत आहेत, वसुली करीत आहेत. हेच पुराणिक समर्थ पोलीस स्टेशन बाहेरच राजेशाही खुर्ची टाकुन, पोलीस मित्रांना चिथावणी देवून, त्यांच्याकरवी गैरवसुली करीत असल्याचे दिसून आले आहे. नागरीक तर नागरीक आता, तर समर्थ पोलीस स्टेशन मधील काही पोलीस कर्मचार्‍यांना छळण्याचे काम हाती घेतले आहे. कर्तव्यावर असतांना देखील त्यांच्यावर कारवाई करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. हा खरं तर मानसिक आजाराचा भाग असल्याने त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठविणेचे योग्य असल्याचे अनेक पोलीस कर्मचार्‍यांचे मत आहे. (पाने चार आहेत. एका बातमीसाठी एवढी जागा देता येत नाहीये. त्यामुळे तुर्तातुर्त इतकेच… )


बातमीचा सारांश अर्थात सवाल माझा ऐका
१) राज्य शासन आणि पुणे महापालिकेला, पुणेकरांच्या आरोग्याची एवढीच काळजी आहे तर खाजगी हॉस्पीटल चालकांना कोरोनावर मोफत उपचार करण्याबाबतचे आदेश का काढत नाहीत
२) सगळेच लोक मरणाला घाबरतात, त्यात पुणेकर अपवाद नाहीत. मास्क सगळेच वापरतात, मग विनामास्कची कारवाई नेमकी कोणत्या स्वरूपाची आहे.
३) पोलीस मित्रांची दादागिरी- भाईगिरी. दुपारच्या तडाख्यात आणि रात्रीच्या अंधारात जबरीने मारतोड आणि वसुलीगिरी
४) पोलीसांना काहीही विचारा, सरकारी कामात अडथळा आणला म्हणून ३५३ दाखल करून स्टेशन डायरी केलीच म्हणून समजा
५) मोठ्या हॉस्पीटलांचे प्रवेशव्दार असलेल्या समर्थ पोलीसांची टोणगेशाही. गावाला सोडलेला वळू आता खात्यातील कर्मचार्‍यांना देखील ढुश्या मारू लागला.
६) हेल्मेट आणि मास्क – नागरीकांच्या हिताचेच आहे, त्यात सक्ती कशासाठी… दंडाची तरतुद नेमकी कशासाठी… हेल्मेट नाही म्हणून ५०० रुपये दंड, मास्क आहे पण नाकाच्या खाली आहे म्हणून देखील ५०० रुपये दंड… ही कसली सुरक्षितता, हा तर जबरी दरोडाच म्हणावा काय…
७) सगळ्याच प्रकारची कारवाई करतांना, अगोदर प्रबोधन करा, जनजागृती करा, समज दया, वापरातील समज- गैरसमज दूर करा, मग मागाहून न ऐकणार्‍यांना दंड वसुली न करता थेट येरवडा कारागृहच दाखवा. बघा … पटापट पुणेकर कसे सुधारतात ते… पण हे का होत नाहीये… सुरक्षिततेच्या नावाखाली हेल्मेट कंपन्यांचे भले करण्यासाठी… मास्कचे बंधन आणि हॉस्पीटलची भिती निर्माण करून, सुरक्षिततेच्या नावाखाली जिझिया कराची वसुली सुरू आहे. मोगलांनी देखील जिझिया कर एवढा वसुल केला नसेल एवढा जिझिया कर आज लॉकडाऊनच्या काळात पुणे महापालिका आणि पुणे पोलीसांकडून वसुल केला जात आहे.
८) पुण्यात विजापुरचा आदिलशहा, मुघलांनी अनेक वर्षे राज्य केलं, पुढे जावुन ब्रिटीशांची हुकूमत आली. इतिहासाच्या पानांतुन आजच्या सारखी दंडेली या शासनकर्त्यांनी देखील केली नसल्याचे वाचनात येते. संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे केल्यानंतर, पुण्याच्या पेशवाईतूनच अस्पृश्यतेचा जन्म झाला, त्याचा विस्तार संपूर्ण भारतभर झाला. आज २०२१ मध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टनिंग) आणि स्पृशास्पृश्यता या दोन शब्दात भेद तरी नेमका काय आहे… म्हणजे थोडक्यात कोरोनाच्या रूपाने पेशवाई अवतरली आहे असे म्हणावे काय…
९) नॅशनल फोरम पोस्टमनचे काम करीत नाही-
महाराष्ट्रातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने अनावश्यक असलेल्या विषयांवर एखादया सत्ताधारी वा विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर टिकाटिप्पण्णी केल्यास, उदाहरणच दयायचे तर अजितदादांनी एक विधान केल्यास, ती बात चंद्रकांत दादांकडे जावुन सांगणे आणि दोघांच्याही बाईट घेवून मागाहुन वृत्तवाहीनीवर दिवसभर विषय चघळत राहणे अशा प्रकारची पोस्टमनगिरी आम्ही करीत नाही. सरकारच्या सवलती आणि दिवाळी दसर्‍याच्या जाहीराती, जिल्हानिहाय मॅनेज झालेल्या टेंडरच्या जाहीराती घेवून आम्ही मूग गिळून गप्प तर बसतच नाहीये. आम्ही ना सत्ताधारी पक्षाचे, ना विरोधी पक्षांचे एजंट. भांडवलदारांचे तर मूळीच नाही. जे आहे ते रोख-ठोक मांडणे आणि जनप्रबोधन करणे आमचे काम आहे. वर्ष पहिले अंक पहिला आणि आज २४ वर्षानंतर देखील वर्ष २२ वा अंक १६ वा अगदी त्याच दमाने प्रसारित करीत आहोत. रोख-ठोक मांडणी, टाकोटाक सादरीकरण आमचे कर्तव्यच आहे. भांडवलाच्या अभावी आम्ही आजही ए-थ्रीच्या चारच पानात आहोत. परंतु ही चारच पानं विघातक शक्तींना त्यांची जागा दाखवुन देण्यास पुरेशी आहेत.