Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

अनु जाती, मराठा एकत्र आल्यामुळेच भाजपाने घडवली भीमा-कोरेगाव दंगल

पणजी/ वृत्तसेवा/

                 अनु जाती आणि मराठा समाज एकत्र आल्यामुळे भाजपाने धसका घेतला आणि भीमा-कोरगाव प्रकरण घडवून आणले, असे प्रतिपादन भीमा-कोरगाव प्रकरणाचे अभ्यासक प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी येथे शुक्रवारी केले. गोव्यातील विविध संघटनांनी एकत्र येऊन प्रा. तेलतुंबडे यांचे व्याख्यान आयोजिले होते.  लोकशाही, मतभेद आणि आर्थिक वाढ असा त्यांचा विषय होता. या व्याख्यानाच्या शेवटी ते भीमा-कोरगाव प्रकरणावर बोलले. काय घडवले गेले, कसे घडवले गेले ते त्यांनी उलगडले. जात आणि धर्माचा वापर करून ब्राह्मण्यवादी राजसत्तेने कसे डाव साधले असा त्यांच्या कथनाचा सूर होता. भीमा-कोरगावची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी त्यांनी सांगितली.

                यानंतर ते म्हणाले, माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील आणि पी. बी. सावंत यांच्यासह सुमारे २५० वर संघटना एकत्र येऊन एल्गार परिषद आयोजिली होती. यामध्ये मराठा संघटनाही होत्या आणि याच एकत्रिकरणाचा धसका भाजपने घेतला. संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराच्या विषयाचा खोटा इतिहास रचला गेला. पर्यायी, खोटा इतिहास रचण्यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे खूप काळांपासून सक्रीय आहेत.

                खरे तर मूळ गावात वडू-तुळापूर समेट झाला होता तरीही अन्य गावात हिंसेची तयारी केलेली. घरांमध्ये अगोदरच दगड जमवलेले, टँकरमध्ये रॉकेल भरून ठेवलेले. प्रा. तेलतुंबडे सांगत होते. अनु जातीचेच लोक अनु जातींना कसे मारतील? अशी विचारणाही त्यांनी केली. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंविरोधात तक्रार दाखल झाली पण आजपर्यंत काहीही झाले नाही, असे ते म्हणाले. पोलिसांनीच कुभांड रचले. एल्गार परिषदेत भडकावू भाषणे दिली, अशी आवई उठवली. एल्गार परिषद माओवाद्यांची असल्याचा कांगावा केला.

                समाजात माओवादी या विषयी खूप गैरसमज पसरवलेले आहेत. माओवादी म्हणजे रक्ताची लढाई असा समज पसरवला गेला आहे, असे ते म्हणाले. देशातील विचारवंतांच्या निवासस्थानावर छापे टाकले गेले. त्यावेळी प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या गोव्यातील घरांवरही छापा टाकला होता. ते घरी नव्हते. त्यांच्या पत्नी अगोदरच मुंबईला गेल्या होत्या.

                तेही मुंबईत होते. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंच्ट महाविद्यालयात प्रा. तेलतुंबडे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. छापा टाकला तेव्हा सुरक्षा रक्षकांना धमकावले, सहकार्यांनाही पोलिसांनी धमकावल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी घराचा व्हिडिओ घेतला आणि ते गेले. ते म्हणाले, पोलिस काहीही करू शकतात. आमच्याबाबतीत षड़यंत्र रचू शकतात तर इतरांबाबत काहीही होईल. पोलीस कोणालाही अटक करू शकतात.

                प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या निवासस्थानी छापा घातला तेव्हा संगणक ताब्यात घेतल्याचे बोलले गेले. या संदर्भात प्रा. तेलतुंबडे म्हणाले, संगणक म्हणजे सत्य साईबाबा आहे, तुम्ही मागाल ते संगणक देऊ शकतो. जसे सत्या साईबाब हवेत वस्तू काढत तसे. त्यामुळे पोलिसांनी संगणकांवर मिळालेली माहिती म्हणून जे काही जाहीर केले आहे ते शंभर टक्के कुभांड आहे. खरे तर राजकारणी, पोलीस आणि न्याय-व्यवस्था स्वतंत्र पाहिजे पण आपल्या देशात या तिन्ही व्यवस्था हितसंबंधित आहेत.