Saturday, May 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

स्वारगेट पोलीसांचे क्रुर क्रौर्ये स्वारगेट पोलीसांच्या जबर मारहाणीत युवकाचा कोठडीत मृत्यू

police injustice

पुणे/दि/ प्रतिनिधी/

                पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मिलिंद गायकवाड यांच्या अन्यायकारक बदलीने पुणे शहर पोलीस दल धास्तावले आहे. भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांनी खंडणी मागितल्या प्रकरणी श्री. गायकवाड यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. श्री. गायकवाड यांच्या धाडसी वर्तनामुळे पुणे शहरातील नागरीकांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. दरम्यान अन्यायकारक बदलीने पोलीस आणि नागरीक धास्तावलेले असतांनाच, परवा पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्याने क्रुर व पाशवी कृत्य करून, सर्वसामान्य पुणेकर नागरीक व पोलीस दलास भयंकर धक्का दिला आहे. मोबाईल चोरीच्या संशयावरून एका युवकास मार्केटयार्ड  येथुन उचलण्यात आले. त्यात स्वारगेट पोलीस ठाण्याच्या कोठडीत जबरी मारहाण केल्यामुळे त्या युवकाचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार अशोक विजयादशमी (दसर्‍या) दिवशी घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

                कु्रर प्रकरणाची हकीकत अशी की,अजित अलाप पुजारी वय २० रा. सध्या घोरपडी, मूळ रा. भद्रावती जि. शिमोगा कर्नाटक हा युवक त्याचा दाजी व बहिण पुणे शहरात वास्तव्याला असल्याने तो पुण्यात आला होता.

                गुरूवारी अशोक विजया दशमी असल्याने तो व त्याचा दाजी यलप्पा पुजारी याच्या सोबत फुले आणण्यासाठी शिवाजी मार्केटयार्डात आला होता. दरम्यान मार्केटयार्ड मध्ये साध्या वेशातील पोलीसांनी अजित व यलप्पा या दोघांना मोबाईल चोरीच्या संशायावरून पकडुन त्यांना पांढर्‍या रंगाच्या कार मध्ये बसविण्यात आले व स्वारगेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

                (वास्तविक पाहता शिवाजी मार्केटयार्ड ही मूळातच स्वारगेट पोलीस ठाण्याची हद्द नाही. त्यामुळे तिथे साध्या वेशातील पोलीस कर्तव्याववर थांबले होते, हे वास्तवाला  धरून नाही. शिवाजी मार्केटयार्डचे कार्यक्षेत्र हे मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे अख्त्यारित आहे. त्यामुळे स्वारगेटचे पोलीस कर्तव्याला मार्केटयार्डात येणे ही हद्दसोड नेमकी कशासाठी हे पाहणे आवश्यक आहे. तसेच संबंधितांना पोलीस वाहना एैवजी पांढर्‍या रंगाच्या खाजगी कार मध्ये बसवून घेवून गेले हे मात्र अति संशयाचा घेरा वाढविणारे आहे.)

                अजित पुजारी व त्याचा दाजी यलप्पा यांना स्वारगेट पोलीस ठाण्यात आणून त्यांना जबर मारहाण करण्यात आली. ही जबरी मारहाण सुरू असतांच अजित पुजारी या यवुकाने छातीत दुखत असल्याचे सांगत असतांना देखील त्याला जबर मारहाण सुरूच होती. दरम्यानच्या काळात दोघांकडे पोलीसांनी चौकशी सुरू केली असता, अजित याला कन्नड शिवाय दुसरी मराठी किंवा हिंदी भाषा येतच नव्हती. परंतु त्याचा दाजी यलप्पा सर्व सांगत असतांना देखील अजितला जबर मारहाण सुरू होती.

                या मारहाणीमुळे पोटात व छातीत दुखत असल्याने वेदना वाढल्यानंतर, स्वारगेट पोलीसांनी अजितला दोन गोळ्या दिल्या. दरम्यान दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तो अचानक कोसळला आणि कोठडीतच त्याचा मृत्यू झाला.

                क्रुर कृत्य करणार्‍या पोलीसांनी नंतर अजितला खाजगी रूग्णालयात नेले. तथापी खाजगी रूग्णालयाच्या डॉक्टरांनी पोलीसांना, ससुन रूग्णालयात घेवून जाण्यास सांगितले.

                ससुन रूग्णालयात आणल्यानंतर, तो मृत्यु पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तथापी याच वेळी त्याचा दाजी यलप्पा याला स्वारगेट पोलीसांनी पकडुन ठेवले होते. नंतर त्याला शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास बी.टी. कवडे रोड येथे सोडून देण्यात आले.

                अजितच्या पाठीवर तसेच शरीरावर जबरी मारहाणीच्या खुणाही दिसून आल्या आहेत. ही बाब जेंव्हा त्यांच्या नातेवाईकांना समजली तेंव्हा, सर्वांनी ससुन रूग्णालयात धाव घेतली. स्वारगेट पोलीस ठाण्याबाहेर देखील मोठी गर्दी जमा झाली होती. पोलीसांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याच वेळी वडार समाज संघटनांनी येथे येण्यास सुरूवात केली.

                वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक कदम हे सर्व गप्प बसून बघत बसले होते. कोणतीही कार्यवाही करीत नव्हते ना नागरीकांच्या व नातेवाईकांच्या भावना समजून घेत नव्हते. सर्वांनी नंतर पोलीस आयुक्तालय गाठले.

                दरम्यान पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने, त्याचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करणार आहे. तसेच तहसिलदारांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. स्वारगेट पोलीसांनी क्रौर्याची परिसिमा गाठली एवढे मात्र नक्की. पोलीस आजही असे वागु शकतात…….

स्वारगेट पोलीसांनी युवकाला जीव जाईपर्यंत जबरी मारहाण करण्याची

काय गरज होती… स्वारगेट पोलीसांना १६ प्रश्‍न………..

१. मोबाईल चोरीच्या संशयावरून पकडल्यानंतर, त्याची पोलीसी भाषेत चौकशी केली काय

२. गुन्हे रेकॉर्डवर त्याचा पूर्वइतिहास पाहीला होता काय…

३. स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीतून एकुण किती मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत, त्यापैकी एकुण किती गुन्हे दाखल केले आहेत.

४. पोलीसी नजरेतून सराईत चोर आणि नवशिका चोर किंवा चोरीच्या प्रकरणाशी संबंध नाही हे पोलीसी भाषेतील चौकशीत आढळुन आले नाही काय…

५. जबरी मारहाण करून त्याच्या माथी इतरांनी केलेले गुन्हे लादायचे होते काय.. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याची प्रथा आजही सुरू आहे काय…

६. संबंधिताला मराठी वा हिंदी भाषा येत नाही म्हटल्यावर पोलीसांनी हद्दीतील सराईत चोरांच्या म्होरक्याकरवी किंवा खबर्‍यामार्फत याची का केली नाही.

७.  स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीतील पाकीटमार, पीएमपीएमएल व एसटी स्टँडवरून बॅगा पळविणारे, सानसाखळी चोर, घरफोडी करणार्‍यांची एक टोळीच  कार्यरत असल्याने त्यापैकी संबंध युवक इसम आहे किंवा कसे हे कसे पडताळण्यात आले नाही.

८. संबंधित युवक इसम हा सराईत चोर आहे असे पोलीसांना संशय आला होता तर त्याला पोलीस निरीक्षक गुन्हे व वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या समक्ष उभे केले होते काय… केले असेल तर त्यांनी काय सुचना केल्या, पोलीस निरीक्षकांच्या समक्ष उभे केले नसेल तर कुणाच्या आदेशाने त्या युवकाला जबरी मारहाण केली… एवढी थर्ड डिग्री देण्याची आवश्यकता होती काय…

९. स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीतील महर्षिनगर पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रातील गुुंडगिरी, अंमली पदार्थांची विक्री व वापर, गांजा – मेफेड्रॉन सारख्या पदार्थांची खुलेआम विक्री, हातभट्टी विक्री करणारे, यांची एक टोळीच आहे, त्यांना कधी अशी थर्डडिग्री घेतली आहे काय… मग या युवकावर थर्डडिग्रीचा वापर नेमका का केला..

१०. नेहरू स्टेडीअम पोलीस चौकीत दर १५ मिनटाला पाकीटमार, बॅगा पळविल्याबद्दल, मारहाण केल्याबद्दल एक तक्रार आलेली असते, त्यांची रितसर तक्रार नोंदवून घेण्यात कसुरी केली जाते.. वरीष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे पोलीस ठाण्यावर नियंत्रण आहे की नाही…

११. व्हाल्गा चौकातील मटका व जुगारीचा अड्डा, हातभट्टी विक्री, चायनिज गाड्यावरून दारूड्यांचा धिंगाणा, स्वारगेट पोलीसांना दिसत नाहीये काय…कोणत्या खबर्‍याने संबंधित युवक मोबाईल चोर आहे याची खबर दिली होती…. चायनिज वाल्याने की, हातभट्टीच्या धंद्यावर काम करणार्‍या पंटरने…

१२. स्वारगेट एस.टी स्टँड, स्वारगेट वाहनतळावर दिवस-रात्र वेश्याव्यवसाय वाढत चाललाय ही मेहरबानी कुणाची… पोलीसांची की स्वारगेटच्या लाईनबॉयची…

१३. स्वारगेटच्या वसुलीवरून पोलीसांत धुमश्‍चक्री सुरू आहे. एकाने साहेबाचे कान भरून, सर्व धंदेवाल्यांना पळताभुई थोडी केली…सगळा स्टँड रिकामा  केला. दुसर्‍याने हातकी सफाई म्हणून सर्व धंदेवाल्यांना आश्रय देवून, साहेबांकडे शिफारस केली आहे… क्षीरसागर मार्केटला पळाले… तरी जीव अजून स्वारगेट मध्येच का अडकुन पडलाय…. वसुलीच्या प्रकारातून युवकाची हत्या घडली काय….

१४. युवकाच्या हत्ये प्रकरणी संबंधित पोलीसांना सेवेतून बडतर्फ करणे इष्ट आहे. परंतु दोन्ही पोलीस निरीक्षकांवर कोणता गुन्हा दाखल करणार…. त्यांच्यावर कोणती कारवाई होणार….

१५. स्वारगेट पोलीस म्हणजे – ः पोलीसही तेच, न्यायाधिशही तेच आणि डॉक्टरही तेच… एकाच वेळी तीनही भुमिका स्वारगेट पोलीस निभावत असते. आता युवक पोलीस कोठडीत गतप्राण झाला आहे. उद्या पोलीसांवर थातुर मातुर कारवाई होईलही… पण त्याच्या घरचे काय… हातातोंडाला आलेला मुलगा जग सोडून गेलाय… त्याचे काय…

१६. उद्या हेच पोलीस सांगतील…

पोलीस म्हणून म्हणतील- त्याला चोरीच्या संशावरून पकडला.

न्यायाधिश म्हणून म्हणतील – नव्हे तो चोरच होता…

डॉक्टर म्हणून म्हणतील – नव्हे, नव्हे त्याला पकडल्यानंतर तो घाबरला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला…

आणि उपाशीपोटी असलेले इतर पोलीस- पत्रकारीतेच्या भाषेत म्हणतील… वसुलीसाठी बिच्चार्‍याचा जीव घेतला..हे मात्र अयोग्य झाले. त्यान हे करायला नका होतं. आता घे म्हणावं वसुली…..

नव्हे नव्हे, नव्हे…. पोलीस हा पोलीसच असतो. त्याने डॉक्टर किंवा न्यायाधिशाची भूमिका करू नयेच.