Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

प्रस्थापित घराणेशाहीवाल्यांना सत्ता आपल्याकडेच रहावी असे का वाटते…? काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीची वृत्ती,

नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
राज्यात काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी उठली आहे. देशात 10 वर्ष सत्तेत असलेल्या पक्षाची उणीदुणी काढण्यापेक्षा, हे सर्व पक्ष वंचित बहुजन आघाडी विरूद्ध गरळ ओकत आहेत. वंचित बहुजन आघाडीचा एकही खासदार नाही, एकही आमदार नाही. त्यांची देशात व राज्यात कुठेही सत्ता नव्हती, तरी देखील वंचित बहुजन आघाडीविरूद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा हे चार पक्ष का तुटून पडले आहेत याचा विचार होणे गरजेचे ठरत आहेत. महायुती व महाविकास आघाडीने राज्यात एकाही मुस्लिम समाजातील नेतृत्वाला उमेदवारी दिली नाही. आंबेडकरी समुहातील नेतृत्वाला उमेदवारी दिली नाही. भटके, विमुक्त, आलुतेदार- बलुतेदारांना उमेदवारी दिली नाही. या समाजाने केवळ महायुती व महाविकास आघाडीला मतदान करायचे, परंतु सत्तेत वाटा मागायचा नाही असेच धोरण आजपर्यंत ठेवले आहे. दरम्यान प्रस्थापित घराणेशाहीच्या पक्षांना सत्ता ही स्वतःकडेच रहावी असे का वाटते, वंचित बहुजन समाजाला सत्तेपासून दूर का ठेवले जात आहे त्याचा हा लेखाजोखा…

वंचितांची ताकद वाढु नये म्हणून महाराष्ट्रातील 169 घराणे आपली घराणेशाही शाबुत रहावी म्हणून अनेक हातखंडे वापरतात. घराणेशाही वाले म्हणजे काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना होय. वंचित समाजाची राजकीय ताकद वाढली तर आपली घराणेशाही संपणार, म्हणून त्यांचा पहिला शत्रु म्हणून वंचित बहुजन आघाडीला किंवा वंचित जाती समुहांना समजतात. काँग्रेस किंवा भाजपा मधील भांडणे ही केवळ लुटूपुटूची भांडणे असतात. ते एकमेकांचे नातेवाईक आहेत, त्यामुळे केंव्हाही समझोता करतात. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस मधील भांडणे देखील असेच तकलादू असतात. कथित भांडणे करून जनतेला मुर्ख बनविले जाते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यामधील वाद किंवा मतभेद हे देखील तकलादू असतात. बाहेर दाखवायचे दात वेगळे असतात व खायचे दात वेगळे असतात. 

पक्ष बदल, विचाराधारा बदलाचे ह्यांना काहीच वाटत नाही.

भाजपामधुन काँग्रेस मध्ये व काँग्रेस मधुन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये किंवा शिवसेनेमध्ये नेते सहजपणे जातात. पक्ष प्रवेश करतात. त्यांना विचारधारेचा अडथळा कधीच येत नाही. किंवा त्यांचे राजकीय करीअर संपेल याची त्यांना भिती वाटत नाही. कारण ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते एकमेकांना सावरुन घेतात. कुणीही कुणाच्या जिवावर उठत नाहीत. राजकारणात कुणीही कुणाचा शत्रु नसतो अशी बतावणी करून जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली जाते. 

घराणेशाहीवाल्यांची धुळफेक-
वंचित बहुजन समाजाचे राजकारण उभे राहू नये म्हणून घराणेशाहीवाले वंचित बहुजन आघाडीवर अनेक प्रकारचे हल्ले करतात. बी टीम हा अपप्रचार घराणेशाहीवाले करतात. जो जो घराणेशाहीवाल्याच्या विरोधात जाईल, त्याला भाजपाची बी टीम म्हणून बदनाम करावे आणि त्यांची मते घराणेशाहीवाल्यांनी ओरबाडुन घ्यावेत. ही अशी त्यांची रणनिती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देखील देशात सामाजिक लोकशाहीची प्रस्थापणा करीत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर देखील काँग्रेसने अक्षरशः चिखलफेक केली आहे. ब्रिटीशांचे हस्तक आहेत इथपर्यंत काँग्रेसवाले गरळ ओकत होते. आता देखील बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बी टीमचा अपप्रचार करून आंबेडकडी, वंचित बहुजन समाजाची धुळफेक करीत आहेत.

वंचित समाजात घरभेदी निर्माण करणे –
अनु. जाती, जमाती, ओबीसी, भटके विमुक्त, मुस्लिम, आलुतेदार- बलुतेदार अशा वंचित समाजात घरभेदी निर्माण करून सत्ता संपादन करणे ही एक रणनिती आहे. आंबेडकरवादी पक्षाने घराणेशाहीवाल्यांपुढे आव्हान उभे केले की, आंबेडकरी समाजातील दलाल, लाचार, संधीसाधु, हावरट शोधायचे व त्यांच्या मार्फत बहुजनवादी राजकारण करणाऱ्या आंबेडकरवादी पक्षांवर बेताल वक्तव्य करून, आपसात दुही माजवुन आंबेडकरी मतांमध्ये फुट घडवुन आणणे हा त्यांचा डाव असतो. वंचित बहुजन समाजाचे राजकारण यशस्वी होवू नये, वंचित समाज एकवटू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीवर 2019 मध्ये भाजपाची बी टीम म्हणून आरोप केला. मात्र 5 वर्ष निघुन गेले तरी एकही पुरावा त्यांनी सादर केला नही.

घराणेशाहीच्या पक्षांच्या कोलांटउड्या –
2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या घराणेशाहीच्या पक्षातील नेत्यांनी अक्षरशः कोलांडउड्या मारल्या असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. अर्धी शिवसेना व निम्मी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाकडे गेली आहे. काँग्रेस मधील दिग्गज नेते भाजपामध्ये गेले आहेत. भाजपा मधुन देखील काही नेते काँग्रेस मध्ये आले आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे भाजपाचे खासदार होते. त्यामुळे ह्याच घराणेशाहीच्या पक्षांनी वेगवेगळ्या पक्षात कोलांटउड्या मारल्या आहेत. ह्यांना विचारधारेचे काहीच देणेघेणे नसते. निमित्त केवळ सीबीआय, इडी, व इन्कमटॅक्सचे आहे. परंतु ह्या चारही पक्षांची विचारधारा एकच आहे. एक जहाल व एक मवाळ परंतु विचारधारा एकच आहे. त्यात सत्ता केवळ 169 घराण्यांच्याच ताब्यात राहिली पाहिजे अशी यांची वृत्ती आहे. भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसचा पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्या आदेशानेच झाल्याचे दस्तुरखुद्द अजित पवार यांनीच सांगितले आहे. त्यामुळे प्रस्थापित पक्षातील नेते आपआपसात कोलांटउड्या कशा मारतात हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. केंद्रात पुनः भाजपाची सत्ता आली तर हेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष भाजपा सोबत जाणार नाहीत याची काही गॅरंटी आहे काय असा सवाल व्यक्त होत आहे.
सत्ता घराणेशाहीकडेच का राहिली पाहिजे-
स्वातंत्र्याच्या 70/75 वर्षात पूर्वी मुघलांच्या व नंतर ब्रिटीशांच्या काळात मोठ मोठया पदावर कार्यरत असलेल्या घराण्यांनी स्वातंत्र्यानंतर, सत्तेवर कब्जा मिळविला आहे. आज यांच्याकडेच सहकारी साखर कारखाने, सहकारी सुतगिरणी, सहकारी दुध डेअऱ्या,सहकारी बँका, पतसंस्था आहेत. वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकाकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेवून ह्यांनी स्वतःचे मोठ मोठे कारखाने उभे केले आहेत. यात कोट्यवधी, अब्जावधी रुपयांची उलाढाल होत असते. त्यातही ह्यांनी सहकाराच्या नावाखाली स्वाहाकार केला असल्याने, कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार व गैरव्यवहार केले आहेत. उदया जर वंचित समाजाने एकत्र येवून, राज्याची व देशाची सत्ता काबिज केली तर, मागील 60/70 वर्षात केलेला भ्रष्टाचार व गैरव्यवहार बाहेर येईल ही खरी भिती घराणेशाहीच्या पक्षांना आहे. त्यातच केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी देशाच्या व राज्याच्या विकासासाठी आला होता, त्या रकमेचे काय झाले, ह्याचा हिशोबही हेच वंचित बहुजन समाजाचे आमदार, खासदार विचारणार… त्यामुळे ह्या घराणेशाहीवाल्यांना देश सोडून पळुन जावे लागेल. ह्या भितीमुळेच वंचित बहुजन समाजाचे राजकारण उभे राहू दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे.

आता 2024 च्या लोकसभा निवडणूकीतही घराणेशाहीवाल्यांची वंचितांना बदनाम करण्याची रणनिती-
राज्यात 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीला भाजपाची बी टीम म्हणून अनुल्लेखाने मारले. स्वतः एक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या मारल्या, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ह्या तीनही पक्षातील वर्षानुवर्षे आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी देखील भाजपामध्ये गेले आहेत. अर्धी शिवसेना व निम्मी राष्ट्रवादी काँग्रेस आज भाजपा सोबत गेली आहे. थोडक्यात निवडणूकीत वंचितांवर आरोप करून त्यांची मते घराणेशाहीवाले पक्ष ओरबाडून घेतात. आमदार, खासदार होतात आणि पुन्हा भाजपा मध्ये जातात, किंवा सत्ताधारी पक्षात जातात व स्वतःची घराणेशाही टिकवुन ठेवतात.

आता 2024 मध्ये देखील वंचित बहुजन आघाडीवर भाजपाची बी टीम म्हणून आरोप केले जात आहेत. त्यात आता तुषार गांधी, श्याम मानव, रावसाहेब कसबे यांच्या सारख्यांना पुढे करून आंबेडकरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. ( यापूर्वी रिपब्लिकन पक्षातील एका गटाला जवळ करून, किंवा आठवले, कवाडे, गवई सारख्यांना जवळ करून आंबेडकरी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता. ) यामुळे आंबेडकरी मते, वंचित बहुजन समाजाची मते विखुरण्याचा यांचा डाव आहे. 
आता त्यांच्या प्रचारामध्ये संविधान खतरे मे अशा प्रकारचा कंठशोष घराणेशाहीच्या पक्षांकडून केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान धोक्यात आहे असे महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्याकडून केला जात आहे. तर दुसऱ्या बाजुने भाजपाकडून अब की बार 400 पार, संविधान हद्दपार... अशा घोषणा केल्या जात आहेत. थोडक्यात भाजपा प्रणित महायुती व काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी कडून अशा प्रकारची चर्चा घडवून बहुजन समाजात विष पसरविण्याचे काम केले जात आहे. त्यांच्यात बुद्धीभेद निर्माण केला जात आहे. निवडणूकीत बुद्धीभेद करून वंचित बहुजन समाजाची मते ओरबाडण्याचा यांचा रडीचा डाव आहे हे वंचित समाजाने समजुन घेणे गरजेचे आहे. 

आता 2024 मध्ये घराणेशाहीवाले वंचित बहुजन आघाडीवर पुन्हा आरोप करीत आहेत आणि संविधान वाचविण्याचा कंठशोष करून सहानुभूती मिळवु इच्छितात. मात्र संविधान वाचविण्याचा आराखडा मांडत नाहीत. म्हणजे संविधान वाचविण्याचे हे त्यांचे ढोंग आहे.