Saturday, April 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील स्वारगेट आणि मार्केटयार्ड पोलीसी कारभारामुळे… तुझ्या गळा, माझ्या गळा, बांधु मटक्यांच्या माळा…

तुझा 1 क्लब, माझे दोन क्लब…चौथा आला नटराजवर…
स्वारगेट व मार्केटयार्डात कायदयापेक्षा मोठा हात नेमका कुणाचा आहे….

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
राज्याचे तत्कालिन गृहमंत्री कै. आर.आर पाटील यांनी महाराष्ट्रात डान्सबार वर बंदी आणली. केवळ घोषणा न करता, डान्सबार बंदीचा कायदा आणला. तसेच राज्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास, संपूर्ण पोलीस स्टेशनचे अधिकारी निलंबित केले जातील अशी घोषणा केली होती. नंतर अनेक वर्षानंतर, पुण्यातही तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी देखील ज्या पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व गैरकायदयाचे धंदे आढळुन येतील त्यांच्या विरूद्ध कठोर कारवाई केली जाईल अशी तंबी दिली होती. तंबी दिली खरी परंतु कारवाई कधीच केली नाही. परंतु कारवाईच्या भीतीने पोलीस स्टेशन हद्दीत नवीन अवैध धंदे सुरू होऊ दिले जात नव्हते. आता मात्र रान मोकळे झाले आहे. ना तंबी, ना कारवाईची भीती, सगळे अलबेल सुरू आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत तर कहर झाला आहे. त्या पोठोपाठ त्याच्या लगतच असल्या मार्केटयार्डातही जुगाऱ्यांनी कहर केला आहे. त्यामुळे… तु भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे हे अवैध धंदेवाल्यांच्या पाठीशी नेमका कुणाचा हात आहे हे पाहण्याची वेळ आली आहे. किंवा कायदयापेक्षा मोठा हात नेमका कुणाचा आहे हे मात्र ज्ञात होत नाहीये.

स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील जुआरीमेल –
स्वारगेट म्हटले की, प्रवाशांची नुसती धावपळ आणि पळापळ दिसून येते. परंतु याच स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीला अवैध व बेकायदेशिर धंदेवाल्यांनी विषारी विळखा घातला आहे. पोलीस स्टेशन हद्दीत एकही चौक असा नाही की, जिथे अवैध धंदे नाहीत. जिकडे तिकडे धंदेच धंदे दिसून येत आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले तरी नावाला कारवाई होते. परंतु अवैध धंदा मात्र सुरूच असतो. एवढच कशाला… त्यात कमी की काय म्हणून स्वारगेट पोलीस स्टेशन लगतच आता जुगाराचा क्लब सुरू झाला आहे. 18 ते 22 तास हा धंदा सुरू असतो. पोलीस काहीच कारवाई करीत नाहीत. लाईन बॉय… अंडरवर्ल्ड डॉनचा फोटो मोबाईलच्या स्टेटसला ठेवून थेट पोलीस स्टेशनलगतच सुरू आहे हे विशेष.

त्याच्याही पुढे कहर झाला आहे. एकाच इसमाने याच हद्दीत सुमारे 16 मटक्यांचे अड्डे सुरू केले आहेत. ते मागील अनेक वर्षांपासून बिनबोभाट सुरू आहेत. त्यात भर म्हणून दोन क्लब सुरू आहेत. आता जुगाऱ्यांचा क्लब म्हटल की, दारू आणि गांजाचा तर धुर तर निघणारच. जाईन तिथं आता गांजाच्या धुरासह अंमली पदार्थांचे धुर बाहेर पडत आहेत. अवैध धंदे चालविणाऱ्यांना स्थानिक पोलीसांचा धाक तर नाहीच. परंतु क्राईम ब्रंॅच मधील कोणत्याही युनिटचा धाक राहिला नाही. सामाजिक सुरक्षा विभागाने तर कारवाया पूर्णपणे थांबविल्या असल्याचे दिसून येत आहे. अंमली पदार्थ विभाग देखील गप्पच आहे. युनिटच्याही कारवाया थंड आहेत. त्यामुळे ह्या अवैध धंदयाच्या पाठीशी गुप्तपणे असणारा हात नेमका कुणाचा आहे याचा तपास लागत नाहीये. दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशनच्या लगतच जुगाराचा क्लब सुरू करणे एवढे सोप्पे नाही. त्यासाठी कायदयापेक्षा मोठा हात असल्याखेरीज एवढे धाडस कुणी करू शकत नाही. परंतु देशात संविधानाचा अंमल सुरू आहे. त्यामुळे कायदयापेक्षा देशात कुणीच मोठा नाही. मग हा कायदयापेक्षा मोठा हात नेमका कुणचा असू शकतो किंवा कायदा राबविणारे हात गैरकायदयाचे राज्य आणू पाहत आहेत काय असाही संशय बळावत आहे.  

स्वारगेट पाठोपाठ मार्केटयार्ड पोलीसही कमी नाहीत-
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत दोन झोपडपट्टया आणि कृषी उत्पन्न बाजार समिती व लगतचा काही भाग समाविष्ठ आहे. बाजार समिती व छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड यांच्या सुरक्षेसाठीच मार्केटयार्ड पोलीस स्टेशनची निर्मिती झाली आहे. दरम्यान आशिया खंडातील या मार्केटयार्डातही सर्वकाही आलबेल नाही. येथेही एकाच इसमाचे पाच सहा अड्डे असून, गंगाधामवर बरेच काही गैरकृत्य सुरू असल्याचे बोलले जात आहे. यातील विनोदाचा भाग असा की, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत आहे, तर छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड बाजार, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत आहे. रस्त्याच्या अलिकडे मार्केटयार्ड पोलीस स्टेशन तर रस्त्याच्या पलिकडे स्वारगेट पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे आजही बऱ्याचदा गल्लत होते.

स्वारगेट मार्केटयार्डच्या गैरधंदयाची एकच पद्धत-
एकाच ठिकाणी जुगार अड्डे चालविण्यापेक्षा ते विभागून चालविले जात आहेत. स्थानिक पोलीस स्टेशन तर कधीच कारवाई करणार नाहीत. त्यामुळे त्यांची भीती असण्याचे काही कारण नसते. पोलीस नियंत्रण कक्षाकडून फोन आल्यास, किंवा क्राईम युनिटकडे कारवाईची जबाबदारी दिली तर ते कारवाई करून करून किती करणार… एकाच धंदयावर कारवाई करणार…परंतु इतर 15 पैकी 14 धंदे तर सुरूच असतात किंवा 6 पैकी 5 धंदे तर सुरूच राहणार आहेत. त्यामुळे ही जबरी खेळी धंदेवाले देखील खेळतात. हा खेळ स्वारगेट मार्केटयार्डात नेहमी चालु असतो. लुटला जातो तो नशिबाला भाग्य समजणारा… लुटला जातो तो… आशेवर जुगार खेळणारा… परंतु नशिबाला भाग्य व आशेवर जगणारा कधीच जिंकत नसतो. लोटपोट किंवा जिंकतात मात्र इतरच. दरम्यान स्वारगेट व मार्केटयार्डात कायदयापेक्षा मोठा हात नेमका कुणाचा आहे ते मात्र अजुन गवसला नाही हे देखील तितकेच खरे आहे. तुर्तास..