Thursday, July 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

अनाधिकृत बांधकामावर कारवाई करतांना पुणे महापालिका अभियंत्याला शिवीगाळ, रस्त्यात वाहने आडवी लावली…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेतील शाखा अभियंता श्री. दत्तात्रय जगताप व त्यांचे सहकारी हे अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच रस्त्यात गाड्या आडव्या लावुन कारवाई करण्यापासून त्यांना परावृत्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधितांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की, पुणे महापालिकेतील शाखा अभियंता व त्यांचे सहकारी हे अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करणेसाठी अहिरेगाव येथे गेले होते. तथापी अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करू नये म्हणून विठ्ठल वांजळे, एस. व्ही. वांजळे, कैलास वांजळे, अविनाश निवृत्ती मोहोळ, ओंकार झारी, रोहन वांजळे, चार महिला आणि इतरांना त्यांचे पथकाला विरोध केला. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून अंगावर धावुन गेले. याबाबत दत्तात्रय जगताप यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात संबधितांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.17) सकाळी साडेअकरा ते दुपारी दोनच्या सुमारास अहिरेगाव येथील सर्व्हे नंबर 76, 87 मध्ये घडली आहे.

दरम्यान फिर्यादी दत्तात्रय जगताप हे शाखा अभियंता बांधकाम विकास झोन 3 म्हणून  महापालिकेच्या बांधकाम विभागात काम करतात. त्यांच्या विभागाकडून नवीन बांधकामास मंजुरी देण्याबरोबरच अनधिकृत बांधकामावर  कारवाई केली जाते. दरम्यान, अहिरेगाव येथे अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू होते. याबाबत, संबंधितांना नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ती नोटीस घेतली नाही. त्यामुळे फिर्यादी जगताप हे त्यांच्या विभागातील कर्मचारी आणि पोलिस घेऊन कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या चारचाकी गाड्या रस्त्यात आडव्या लावून रस्ता बंद करून गैरकायद्याची मंडळी एकत्र केली. त्यानंतर त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून  फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.