Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

‘वंचित’ ला INDIA आघाडीपासून वंचित ठेवण्याचा कोणता शहाणपणा ?

नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/
इंडीया आघाडीची बहुचर्चित बैठक मुंबईत पार पडली. भाजप विरोधात एकत्रित येण्याची हाक देणाऱ्या या आघाडीने वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे निमंत्रणच दिलेले नाहीत. वंचित सोबत नसेल तर महाराष्ट्रात इंडीया आघाडीचे भविष्य काय असेल?

आज मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या नियोजनामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या बैठकीमध्ये 2024 ला भाजपला घेरण्याचे मनसुभे आखले गेले आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांना एकत्रित येण्याची हाक देणाऱ्या या आघाडीने महाराष्ट्रातील राजकारणात प्रबळ असलेल्या वंचित बहुजन आघाडीला निमंत्रणच दिले नसल्याची बाब वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः स्पष्ट केलीय. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचितचा झंझावात निर्माण झाला होता. युतीची बोलणी फिस्कटल्याने वंचितने एम आय एम सोबत निवडणुका लढवल्या होत्या. या निवडणुकीत या आघाडीला एकूण मतांच्या 7 टक्के म्हणजेच 41 लाख 32 हजार इतकी मते मिळाली होती. मतदारसंघानुसार विचार केल्यास 10 ते 12 मतदारसंघात वंचितला 50 हजाराहून अधिक मतदान मिळाले होते. नांदेड, सोलापूर परभणी गडचिरोली-चिमूर, बुलढाणा, हातकनंगले आणि सांगली या मतदारसंघात वंचितचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर तसेच आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. वंचितच्या या मतांचा मोठा फटका आघाडीला बसला होता. त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंसारख्या काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना पराभव पत्करावा लागला होता. 

विधानसभा निवडणुकीमध्ये वंचितने 234 जागा लढवल्या होत्या यातील 10 जागांवर वंचितचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. या निवडणुकीत वंचीतच्या ताकतीचा आघाडीला कमीत कमी 30 जागांवर फटका बसला. गत निवडणुकांमध्ये वंचितच्या ताकतीचा अनुभव पाहता यावर्षी देखील वंचीतला सोबत न घेतल्यास महा विकास आघाडी तसेच इंडिया आघाडीला मोठे राजकीय नुकसान होऊ शकते. हे चित्र स्पष्ट असतानाही इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांना न देणे, आघाडीत समाविष्ट होण्याबाबत त्यांच्याशी चर्चा न करणे या वजाबाकीच्या राजकारणाचा फटका येत्या निवडणुकीत  इंडिया आघाडीला बसू शकतो.

 शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची वंचित सोबत युती आहे. परंतु वंचित अजूनही  आघाडीत सहभागी नाही. या गोंधळाच्या परिस्थितीत ही युती टिकवतानाही उद्धव ठाकरेंना मोठी कसरत करावी लागणार आहे. विरोधकांना एकत्र येण्याची हाक देणाऱ्या इंडिया आघाडीची हाक अद्याप त्यांचा समविचारी पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीपर्यंत पोहोचलेली नाही तर सक्षम विरोधी पर्याय निर्माण तर कसा होणार असा सवाल राजकीय विश्लेषक उपस्थित करत आहेत.