Friday, November 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा… वंचित बहुजन आघाडीची राज्यात ताकद किती?

vanchit-shevsena
  • लोकशाही जिंवत ठेवण्यासाठी शिवसेना आणि वंचित एकत्र आलो आहोत- ठाकरे
  • संयुक्त पत्रकार परिषदेत बाळासाहेब काय म्हणाले…
  • वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीचे संयुक्त निवेदन ज्ञ आम्ही एकत्र का आलो?

राजगृह- दादर- मुंबई/
आज ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत वंचित व शिवेसना युतीची घोषणा केली आहे. ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि लक्षवेधी घडामोड आहे. त्यामुळे आता यापुढे महाराष्ट्रात नविन युतीची चर्चा असणार आहे. आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युती करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत राजकीय युतीची मोठी घोषणा केली. त्यामुळे आता शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर ठाकरे गटासोबत आंबेडकरांनी युती केल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात युतीसाठी बोलणी सुरू होती. परंतु त्याची अधिकृत घोषणा झालेली नव्हती. त्यामुळं आता या युतीमुळं शिंदे गट आणि भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आम्हाला काल स्वप्न पडलं आणि आज एकत्र आलो असं झालेलं नाही. कॉग्रेस, राष्ट्रवादी यांचीशी चर्चा केली आहे. सध्या ही व्यक्तीगत युती असली तरी बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा घटक व्हावा, अशी ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली.

वंचित बहुजन आघाडीची राज्यात ताकद किती –
आज वंचित व शिवसेना युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर, वंचित महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी प्रबुद्ध भारत मध्ये वंचितच्या राजकीय ताकदीची जाणिव करून दिली आहे. तसेच याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यांनी प्रबुद्ध भारत मध्ये नमूद केलं आहे की, आजच्या युतीचे राजकीय परिणाम संघ आणि भाजप दोघांना चिंताक्रांत करणारी आहेत याचे महत्वाचे कारण 2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणूकीत भारिप बहुजन महासंघाने राज्यात 23 उमेदवार उभे केले होते.त्यांना एकत्रित 3,60,854 (0.7%) मते मिळाली होती.2014 मध्ये झालेल्या 13व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत भारिप बहुजन महासंघाने 70 उमेदवार उभे होते, मात्र त्यापैकी केवळ एकच आमदार विजयी झाला.सर्व उमेदवारांना एकत्रित 4,72,925 (0.9%) मते मिळाली होती.

मात्र वंचित ने 2019 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूकीत, 41,32,242 (7.64%) एवढी मते मिळवली होती.महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघात 5,40,54,245 एवढे एकूण मतदान झाले होते,त्यात 41,32,242 हा वंचितचा वोट शेयर आहे.औरंगाबाद या एका लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी समर्थित एआयएमआयएम पहिल्या स्थानी होती, अकोला या एका मतदार संघात वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या स्थानी होती तर 41 मतदार संघात वंबआ तिसऱ्या स्थानी होती.

राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी 80 हजारांहून अधिक मते घेतली होती.2019 च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 288 पैकी 236 जागा पक्षावर लढत 25,23,583 मते घेतली होती.2019 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष  मागील जागा  122, 2019 मध्ये जिंकलेल्या जागा  105, शिवसेना मागील जागा  63, 2019 मध्ये जिंकलेल्या जागा  56, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  मागील जागा  41,2019 मध्ये जिंकलेल्या जागा  54. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- मागील जागा  42, 2019 मध्ये जिंकलेल्या जागा  44 असे पक्षीय बलाबल होते.

वंचितने स्वबळावर केलेली मतांची बेगमी पाहता आणि सेना आणि वंचित अशी मतांची गोळाबेरीज राज्यातील आगामी सत्ता संपादनाची नांदी ठरते.काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या पक्षांनी राजकीय गरज आणि देशातील धोकादायक वळणावर आलेली लोकशाही पाहता पुढाकार घेतला पाहिजे.हे घडले तर भाजप आणि शिंदे गट राज्यात चटणीला सुद्धा उरत नाही.आजच्या युती निमित्ताने काँग्रेस राष्ट्रवादीने हे राजकीय समजूतदार भूमिका घेवून मविआला राजकीय बळकटी देण्याची भूमिका घेतली पाहिजे.त्याशिवाय भाजपला थांबविणे शक्य नाही.बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे ह्यांनी घेतलेल्या युतीच्या निर्णयाने राज्यात हा नवा पर्याय बळकट झाला आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने पुढे आले पाहिजे.आजच्या युतीचे सर्व स्तरावर होणारे समर्थन आणि स्वागत पाहता वंचित समुहाला सत्ताधारी करण्याचा बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे धोरणाच्या यशस्वितेची नांदी ठरेल.एका नव्या पर्वाच्या राजकीय अध्यायाची हि सुरुवात आहे. देशातील हुकूमशाही आणि ईडी सरकार आजच्या निर्णयामुळे हादरले आहे एवढे मात्र नक्की.मागील सर्व विसरून एकत्र आले पाहिजे हा आशावाद उद्धवजी आणि बाळासाहेब दोघांनी व्यक्त केला आहे, बॉल आता काँग्रेस राष्ट्रवादी च्या कोर्टात आहे.नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल हा आशावाद आहे. असे राजेंद्र पातोडे, प्रदेश महासचिव, वंचित बहुजन युवा आघाडी यांनी नमूद केलं आहे. 

राजगृहावरील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय म्हणाले –
लोकशाही जिंवत ठेवण्यासाठी शिवसेना आणि वंचित एकत्र आलो आहोत- ठाकरे
संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, माझे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे आजोबा हे एकमेकांचे स्नेही होते. त्यांनी त्यावेळेला समाजातील वाईट रुढी आणि परंपरेविरोधात प्रहार केला. परंतु आता राजकारणातील वाईट रुढी आणि परंपरांना मोडण्यासाठी ठाकरे आणि आंबेडकर घराण्यातील आम्ही वारसदार एकत्र येत आहोत. सध्या जनतेला भ्रमात ठेवून देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळं आता लोकशाही जिंवत ठेवण्यासाठी शिवसेना आणि वंचित एकत्र येत असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे.
सध्या राज्यात आणि देशात जे काही सुरू आहे, ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. मोदींच्या सभेत कशा पद्धतीनं लोकं आणली गेली, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं घाणेरडं राजकारण आणि राजकारणातील वैचारीक प्रदूषण संपवण्यासाठी आम्ही युती करण्याचा निर्णय घेतल्याचं ठाकरे म्हणाले.
बाळासाहेब आंबेडकर काय म्हणाले –
युतीची घोषणा करताना वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, आमच्या उमेदवारांना जिंकवणं हे मतदारांच्या हातात आहे, ते कोणत्याही राजकीय पक्षाच्या हातात नाही. परंतु उमेदवारी देताना लोकांचं सामाजिकीकरण होत नाही. महाराष्ट्राची सत्ता सध्या केवळ 369 कुटुंबियांच्या आणि काही भांडवलदारांच्या हातात आहे. नात्यागोत्यांचं राजकारण सातत्यानं वाढत असून गरिबांचं राजकारण कमी होत आहे. त्यामुळं आता राजकारणात नव्या गोष्टी मांडण्याची गरज असून त्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत येत असल्याचं बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीचे संयुक्त निवेदन
आम्ही एकत्र का आलो?

देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडे जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हुकूमशाहीकडे सुरू झालेली वाटचाल थांबवण्यासाठी राजकीय पाऊल उचलण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. जनसामान्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बाजूला सारून अवास्तव विषयांना प्राधान्य दिले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात (25 नोव्हेंबर 1949 रोजी) देशाला उद्देशून इशारा दिला होता की, देशामध्ये सामान्यांचे प्रश्न सोडून इतर विषयांत महत्त्व दिले तर देशाच्या स्वातंत्र्याला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच देश आणि लोकहिताला प्राधान्य दिले. लोकशाहीस प्राधान्य दिले नाही तर देशात अराजक निर्माण होईल ही त्यांची भूमिका डॉ. आंबेडकरांच्या परखड विचारांशीच मिळणारी आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म ही आवश्यक बाब असल्याचे नमूद केले आहे, परंतु या तिघांनीही राष्ट्राला प्राधान्य दिलेले आहे. लोकशाही टिकली तरच देश टिकतो, असे मत प्रबोधनकार ठाकरे यांनीसुद्धा मांडले आहे. म्हणून आम्ही एकत्र येऊन देशाचे स्थैर्य, नीतिमत्ता व राष्ट्रीय हिताचे राजकारण करण्यास कटिबद्ध आहोत! असे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे व शिवसेना नेते सुभाष यांनी यांनी संयुक्त पत्रक जाहीर केले आहे.