Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

या आयएएस-आयपीएस लोकांचं करायचं काय ?

आम्ही भ्रष्ट म्हणून राजकारण्यांकडे बोट दाखवतो परंतु भारतामध्ये सर्वात जास्त भ्रष्ट कोण असतील तर ते हे आयएएस आणि आयपीएस हे अधिकारी शंभर पिढ्यांचे भले होईल इतकी कमई करून ठेवतात आणि वर नैतिकतेच्या गोष्टी सांगायला , भाषणबाजी करायला सर्वात पुढे असतात सांगताहेत ॲड. विश्वास कश्यप….


एका महत्त्वाच्या बातमीकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेले आहे .बातमी अशी आहे की , दिल्ली सरकार मधील आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांच्या कुत्र्यास मोकळेपणाने मैदानात फिरता यावे म्हणून दिल्ली येथील त्यागराज स्टेडियममधील क्रीडापटूंचे प्रशिक्षण लवकर बंद केले जायचे . कुत्रा आणि खिरवार पती पत्नीला मुक्तपणे फिरता यावे यासाठी संध्याकाळी सात वाजता त्यागराज स्टेडियममधील प्रशिक्षण संपूर्णपणे बंद केले जात असे . याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसमध्ये गुरुवार दिनांक 26 मे 2022 रोजी पहिल्या पानावर प्रकाशित झाले . संजीव खिरवार सोबत त्यांची आयएएस पत्नी रिंकू डग्गा यासुद्धा फिरायच्या . जसे काही स्टेडियम त्यांच्या बापजादाच्या मालकीचे होते . बातमी प्रसिद्ध झाल्यावर सरकारने या दोन्ही आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. खिरवारला लडाख येथे आणि रिंकू बाईला अरुणाचल प्रदेशात पाठविले .
अधिकाराचा माज … प्रश्न या दोघांची बदली झाली इतकाच मर्यादित नाही . तर मूळ प्रश्न असा आहे की यांना या अधिकारपदाचा इतका माज येतोच कसा ? बऱ्याच पुरुष अधिकाऱ्यांपेक्षा महिला अधिकाऱ्यांमध्ये काकणभर घमेंड जरा जास्तच असते . माकडाच्या हातात … आयएएस आणि आयपीएस मंडळी ही स्वतः संस्थानिक असल्यासारखीच वागत असतात . स्वतःला लोकशाही व्यवस्थेमधील राजे , राजपुत्र , संस्थानिक समजतात . अमर्याद अधिकार मिळाल्याने हे वाटेल तसे वागतात . माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर जसे वागते अगदी तसेच वागतात .
सचिवालय नव्हे मंत्रालयच … आत्ताचे मंत्रालय हे पूर्वीचे सचिवालय म्हणून ओळखले जायचे . सचिव म्हणजे सेक्रेटरी म्हणजे आयएएस . सचिवाचे आलय म्हणजे सचिवांचे घर . सचिवालय . या लोकांचा फालतूपणा हुशार राजकारण्यांच्या लक्षात आला . त्यांनी सचिवालय नाव बदलून मंत्रालय केले . हे सांस्कृतिक दृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्या योग्यच आहे . मंत्र्यांचे उत्तरदायित्व हे जनतेशी असते . सचिवाचे उत्तरदायित्व हे जरी कागदोपत्री जनतेशी असले तरी व्यावहारिक दृष्ट्या त्याचे उत्तरदायित्व कोणाशीच नसते . त्याचे उत्तरदायित्व त्याच्या खात्यातील वरिष्ठांशी असते . म्हणजे एका आयएएसचे उत्तरदायित्व दुसऱ्या आयएएस च्या हातात असते . म्हणजे सगळाच भ्रष्ट कारभार .
राजकारणी जर चुकीचे वागले तर ते पाच वर्षांनी निवडून येत नाहीत . त्यांना त्यांच्या कर्माची फळे मिळतात . काही काही राजकारण्यांची तर आयुष्य उद्ध्वस्त होतात . परंतु या आयएएस आणि आयपीएस मंडळींचे काहीही वाकडे होत नाही . फार फार तर बदली . जास्त मलईदार पोस्टवरून कमी मलईदार पोस्टवर बदली होते . भ्रष्ट राजकारणी ? काहीतरीच .. आम्ही भ्रष्ट म्हणून राजकारण्यांकडे बोट दाखवतो परंतु भारतामध्ये सर्वात जास्त भ्रष्ट कोण असतील तर ते हे आयएएस आणि आयपीएस . हे अधिकारी शंभर पिढ्यांचे भले होईल इतकी कमई करून ठेवतात आणि वर नैतिकतेच्या गोष्टी सांगायला , भाषणबाजी करायला सर्वात पुढे असतात .
पूजा सिंघल …. दिनांक 6 मे 2022 रोजी झारखंड या गरीब राज्यातील आयएएस अधिकारी पूजा सिंघलच्या घरी ईडीने कारवाई केली . त्यावेळी कोट्यावधी रुपयांची रोकड मिळाली . ती रोकड मोजण्यासाठी नोटा मोजण्याचे कित्येक यंत्रे वापरावी लागली . तिचा चार्टर अकाउंटंट सुमनसिंग याच्याकडे जवळजवळ वीस कोटीची रोख रक्कम मिळाली . हा घोटाळा किमान 300 कोटी रुपयांचा असावा असे प्रथमदर्शनी तपासात दिसते .
भ्रष्ट रेकॉर्ड … ही पूजा सिंघल सन 1999 च्या बॅचची आयएएस अधिकारी आहे . ती वयाच्या एकविसाव्या वर्षी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली . त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतली गेली . तिच्या बावीस वर्षाच्या सर्विस मध्ये इतकी कमाई आणि इतकं अधःपतन . काय तर म्हणे स्त्री शक्ती . गोंडा घोळणाऱ्या अधिकारी … सन 2013-14 मधील घटना . मुंबई पालिकेतील एक तत्कालीन आयएएस अधिकारी बाईच्या निष्काळजीपणामुळे माझगाव येथील बाबू गेनू मंडई इमारतीतील 62 रहिवाशांना आपला जीव गमवावा लागला . यामध्ये दै . ‘ सकाळ ‘ मधील योगेश पवार या तरुण आणि धडाडीच्या पत्रकाराचाही समावेश होता . हे सर्व पालिकेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय होते . या आयएएस महिला अधिकाऱ्याने वेळीच इमारत आणि पुनर्विकास / दुरुस्तीचा निर्णय घेतला असता तर हे जीव वाचू शकले असते . या आयएएस बाई त्या फाईलवर अनेक महिने नुसत्या बसून होत्या . दुर्घटना झाल्यानंतर त्यांच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी या बाईना वाचवले . नाही तर या बाई एव्हाना जेलमध्ये खडी फोडायला गेल्या असत्या .
मंत्र्यांसमोर गोंडा घोळणे आणि पत्रकारांशी उत्तम संबंध ठेऊन आपण किती कर्तृत्ववान अधिकारी आहोत हे मिरवण्यात बाई माहीर आहेत . परमविरसिंग…. ही आयपीएस मंडळी पण काही कमी नाही बर का . मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत . त्यात खंडणी सारखे गुन्हे आहेत . हे महाशय शिस्तप्रिय असल्याचा आव आणायचे . शिस्तीच्या नावाखाली घातला गेलेला सावळागोंधळ आता समोर येत आहे . खासदार सत्यपालसिंग … मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपालसिंग सकाळीच तडकाफडकी राजीनामा देऊन दुपारी उत्तरप्रदेशमध्ये जाऊन लोकसभेचा भाजप पक्षाचा उमेदवारी अर्ज भरतात . या माणसाने गोरगरिबांना काय न्याय दिला असेल ? सगळी नोकरी त्यांनी राजकीय पक्षाच्या दृष्टिकोनातूनच केली नसेल कशावरून ?
रश्मी शुक्ला बाई … महिला आयपीएस रश्मी शुक्ला बाई एका राजकीय पक्षासाठी युनिफॉर्म च्या बुरख्याखाली खबरेगिरीचे कर्तव्य बजावतात . त्या महिलेकडून न्यायाची काय अपेक्षा ठेवणार ? म्हणे स्त्री शक्ती . खंडणीखोर त्रिपाठी … दहा-बारा वर्षांपूर्वी आयपीएस म्हणून नोकरीस लागलेला मुंबईतील उपायुक्त दर्जाचा त्रिपाठी नावाच्या महाभागावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने तो सध्या फरार घोषित आहे. लाज वाटली पाहिजे आयपीएस म्हणून घेणाऱ्या अधिकाऱ्यांना . आयपीएस लोकांची एक युनियन आहे . ही युनियन कधीही असल्या भ्रष्ट घटनेवर आपले मत प्रदर्शित करीत नाही .
काही अडचण आहे का युनियनला ? भ्रष्ट अधिकाऱ्यांना रस्त्यात नागडे करून मारणे हाच एकमेव पर्याय असू शकतो का ? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे . समीर मियाँ … एक तो समीर मियाँ वानखेडे . सेलिब्रिटी वर खोटे गुन्हे दाखल करून स्वतः सेलेब्रिटी होण्याचा प्रयत्न करीत होता . त्याबरोबरच मलई पण खात होता . सध्या नोकरी कशी वाचेल या विवंचनेत ‘ भाई ‘ हात चोळत बसले आहेत . यूपीएससी परीक्षा बंद करा .. आमचे स्पष्ट मत आहे की यूपीएससी परीक्षाच बंद करावी . नको ते आयएएस आयपीएस . जर त्यांना ठेवायचेच असेल तर त्यांचे अमर्याद अधिकार तरी कमी केले पाहिजेत . राज्याराज्यांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांच्यातून अधिकारी निवडावेत ( एमपीएससी ). आता हे अधिकारी सुद्धा भ्रष्टच बर का परंतु दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने पाहावे लागेल .
इंग्लंडमधील व्यवस्था… ज्यांनी आमच्यावर दीडशे वर्षे राज्य केले त्या इंग्लंडमध्ये आयपीएस या दर्जाचे रँकच नाही . इंग्लंडमध्ये पोलीस शिपाई ते पोलीस कमिशनर अशी त्यांची पदे असतात . पोलीस शिपाई जितका जास्त सक्षम तितक्या लवकर तो कमिशनर पदापर्यंत आपल्या हुशारीने जाऊ शकतो . मानसिक रुग्ण … यूपीएससी परीक्षेच्या नादाला लागून लाखो तरुण मुला-मुलींच्या आयुष्य दरवर्षी उध्वस्त होत आहे . यूपीएससी देणारी मुले अपयशामुळे मानसिक रुग्ण होत आहेत . गरिबांची लेकरं… एखाद्या गरीब घरातील मुलगा आयएएस आयपीएस झाल्यावर त्याच्यात 360 डिग्री चा बदल होतो . त्याला गरिबाबद्दल काही वाटत नाही . ते स्वतःची गरिबी लगेच विसरतात . श्रीमंतांचे भले व्हावे म्हणून गरिबांवर कसा अन्याय करता येईल या मानसिकतेतून ते विचार करतात . त्यांची गरिबी ही विद्यार्थ्यांपुढे कराव्या लागणाऱ्या भाषणातील फक्त स्टोरी उरते . बाकी काही नाही . प्रचंड भ्रष्ट होऊन जातात ही गरीबाघरची लेकरं .
पाच टक्के प्रामाणिक … सगळेच आयएएस आयपीएस भ्रष्ट आहेत असे बिलकुल नाही . जे काही पाच टक्के आहेत त्यांच्या जिवावरच या देशाचा प्रशासकीय गाडा चालू आहे . त्या पाच टक्क्यांना कडक सलामच केला पाहिजे . परंतु या पाच टक्क्यांसाठी मात्र या 95 % भ्रष्ट अधिकार्यांना आपण कसे काय माफ करू शकतो ?
जन आंदोलन या भ्रष्ट आयएएस आणि आयपीएस यांच्या विरोधात संपूर्ण देशात जन आंदोलन उभी राहिली पाहिजेत . ही चळवळ राष्ट्रहिताची असेल यामध्ये कोणतीही शंका नाही . झटक्यात प्रचंड वाढणारी मालमत्ता … आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मालमत्ता झटक्यात प्रचंड पटीने वाढतात कशा याची सखोल चौकशी करण्याची गरज कुणालाच कशी वाटत नाही ? जय भारत
ॲड.विश्वास काश्यप ,
माजी पोलिस अधिकारी , मुंबई