Friday, May 3 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

गायरान जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक, 20 जुलैला विधानभवनावर मोर्चा

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum
राज्यातील गायरान जमीनधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात येत्या 20 जुलैला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातील वंचितनं मोठी तयारी सुरु केली आहे. याच मोर्चाच्या तयारीसाठी वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर मोठी मेहनत घेत आहेत.

गुरूवार दि.20 जुलैच्या विधानभवनावरील मोर्चाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळेल. या मोर्चाची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती सुजात आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. राज्यभरातील गायरानधारकांशी या मोर्चाच्या अनुषंगाने बोलणं सुरू असल्याचे आंबेडकर म्हणाले. गायरानधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी बाळासाहेब आंबेडक यांचे भावनिक नातं आहे. हा प्रश्न गायरानधारकांसाठी जीवन-मरणाचा असल्याचे सुजात आंबेडकर म्हणाले. हंगाम सुरु झाल्यावर 31 जुलैपर्यंत जमीनीचे पट्टे खाली कसे करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सध्याच्या राजकारणाबद्दल तरुणाईमध्ये नकारात्मक भावना –
सध्याच्या परिस्थितीत हा प्रश्न सुटला नाही तर पुढची भूमिका पक्ष ठरवेल असेही सुजात आंबेडकर म्हणाले. सध्याच्या राजकारणाबद्दल तरुणाईमध्ये अतिशय नकारात्मक भावना आहे. मतदानातून तरुणाईनं सध्याच्या राजकारणातील संधीसाधूंना धडा शिकवावा असेही ते म्हणाले. राज्याच्या राजकारणातील चार घराण्यांना एकतर तुरुंगात जायचं नाहीये किंवा सत्तेत रहाचंय. त्यामूळं या कोलांटउड्या सुरु असल्याचे सुजात आंबेडकर म्हणाले. आदित्य ठाकरेंना आतापर्यंत दोन-तीनदा भेटलो आहे. पुढे आम्ही चर्चा करु. दोन्ही पक्ष आता कामाला लागतील. आमच्या दोन पक्षांच्या मैत्रीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला.