काँग्रेसची अवस्था आजही जुन्या जमिनदारासारखी आहे
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
स्वातंत्र्याच्या 75 वर्षात काँग्रेसनेच अधिक काळ देशात व महाराष्ट्रात सत्ता उपभोगली आहे. देशातील व राज्यातील बहुजन समाजाला सत्तेत येऊ दिले नाही. यांनीच राज्य केलं. त्यामुळेच राज्यात 3/4 वेळेस काँग्रेसला जनतेने सत्तेतून बाहेर फेकले आहे. सत्तेतून बाहेर फेकले गेलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आता देखील बहुजन समाजाला सत्तेपर्यंत पोहोचू देत नाहीत. आंबेडकरी समुह व बहुजन समाजाची या पक्षांना मते हवीत परंतु या समाजांना सत्तेत वाटा दयायचा नाहीये. पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड येथे पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गळयात आणि गाडीवर निळे झेंडे लावुन फिरत आहेत. दोन्ही काँग्रेसवाले कुणाला विचारून निळे झेंडे वापरत आहेत असा सवाल आंबेडकरी जनता विचारत आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा पुरस्कृत रिपब्लिकन सेल-
प्रत्येक राजकीय पक्षात वेगवेगळे सेल किंवा विभाग कार्यरत असतात.उदाहरणार्थ- महिला आघाडी, युवा आघाडी, मागासवर्गीय सेल/ आघाडी, अल्पसंख्याक आघाडी/सेल, अनुसुचित जाती सेल / आघाडी, आदिवास सेल/ आघाडी याच्यासह अनेक सेल किंवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश, जिल्हानिहाय, शहर निहाय स्थापन केल्या जातात. अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाला राजकीय मदत मिळण्यापेक्षा राज्यात आंबेडकरी राजकीय ताकद वाढू नये म्हणून त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी या नावाने दलित नेते पुढे करून स्वतःच्या संघटना मार्केटमध्ये उभ्या केल्या आहेत.
एका दगडातून अनेक पक्षी मारणे सोईचे व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे. त्यात प्रामुख्याने –
- राज्यात अनु. जाती व अनु. जमाती अर्थात दलित व आदिवासी समाज एकत्र होणार नाही याबाबत अधिक लक्ष दिले जात आहे.
- आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांसोबत ओबीसी समाज एकत्र होणार नाही यासाठी अधिक प्रयत्न केले जात आहेत.
- दलित मतांमध्ये फुट पाडणे अधिक सोईच कसे होईल यासाठी अटोकाट प्रयत्न केले जात आहेत.
- प्रगल्भ आंबेडकरी विचार एकाच जातीमध्ये कसा राहिल यासाठी जास्तीचे प्रयत्न केले जात आहेत.
- आंबेडकरी समाज हे एकाच जातीपुरते विचार करणारे आहेत असाही प्रचार करणे सोईचे व्हावे यामागचा मुळ उद्देश आहे.
- राज्यात एस.टी/ एस.सी/ ओबीसी/ व्हीजेएनटी जाती समुहाने अभ्यास करून शासन प्रशासनात कितीही मोठे स्थानावर बसले तरी आंबेडकरी विचारांपासून दूर रहावे यासाठी बळकट प्रयत्न केले जात आहेत.
- त्यातही आंबेडकरी समाज मतदान मोठ्या संख्येने करतो, त्यामुळे त्यांच्यात बुद्धीभेद निर्माण करून, रिपब्लिकन पक्षाचे गट-तट आहेत. ही शक्ती एक झाली तर सत्ता येऊ शकते असा अपप्रचार करून, दलित मतांमध्ये विभाजन करणे.
- काँग्रेस पुरस्कृत रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रिपब्लिकन पार्टी, भाजपा पुरस्कृत रिपब्लिकन पार्टीचे दलित नेते विशेषतः बौद्ध समाजातील एखादा पुढारी तयार करायचा आणि त्याला भरपुर प्रसिद्धी देऊन हाच दलितांचा, हाच आंबेडकरी समाजाचा नेता म्हणून पुढे आणायचे… टीव्ही चॅनेल, वृत्तपत्रातून त्या पुरस्कृत दलित पुढाऱ्याच्या बातम्या छापुन, प्रसारित करून त्याला मिडीयाव्दारे मोठे करून आमच्या बरोबर आंबेडकरी जनता आहे हे दाखवुन देण्याचा सतत प्रयत्न करणे.
- प्रस्थापित राजकीय पक्षाने नेता केलेल्या बौद्ध समाजाच्या तथाकथित पुढाऱ्यास विधानपरिषदेत आमदार करणे, आंबेडकरी राजकीय ताकद वाढत असल्याचे पाहून मंत्री करणे असे प्रकारही सर्रास केले जात आहेत.
- राज्यात बाळासाहेब आंबेडकर वगळता कोणत्याही नेत्याकडे आंबेडकरी जनता नाही. त्यामुळेच बाळासाहेब आंबेडकर यांची नाहक बदनामी करणे, वेगवेगळे अपप्रचार करणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत.
- बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर आज अभेद्य आंबेडकरी जनतेसह ओबीसी वर्ग, मुस्लिम वर्ग मोठ्या संख्येने आहे, त्यामुळे त्यांच्या बुद्धीभेद करण्यासाठी प्रस्थापित राजकीय पक्ष पुरस्कृत दलित नेतृत्व पुढे करून ओबीसी व मुस्लिमांमध्ये बुद्धीभेद करण्याचे मोठे षडयंत्र अनेक वर्ष सुरू आहे.
- बाळासाहेब आंबेडकर त्यामुळेच म्हणतात की, मला मिडीयाने मोठा केला नाहीये. त्यामुळे मला डिस्ट्रॉय करणे (राजकारणातून संपविणे) एवढे सोपे नाहीये.
- वंचित- सेना युती झाल्यानंतर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यांना खिजगणीत पडलेले दलित नेते आठवु लागले आहेत. त्यामुळे आठवले गट, खरात गट, कवाडे गट, गवई गट , अे गट ब गट, सगळे सगळे आठवु लागले आहेत.
- सीट ओर नो सिट पण सगळी मते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाला आजपर्यंत दिली आहेत. परंतु समाजव्यवस्था मात्र विस्कळीत झाली आहे. आता देखील हेच षडयंत्र सुरू आहे.
एवढं असतांनाही प्रत्येक निवडणूकीत प्रस्थापित पक्षाचे नेते पुढे काय काय करता ते पहा –
जातीय व धार्मिक ध्रूवीकरण करून सत्ता कशी मिळविली जाते पहा-
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व प्रस्थापित राजकीय पक्षांच्या विकृत बुद्धीभेदाला टक्कर देत बाळासाहेब आंबेडकर एक एक प्रयोग करीत बहुजनांची वज्रमुठ उभी करीत असतांना, ऐन निवडणूक काळात सत्ताधारी व प्रस्थापित राजकीय पक्षांनी कुटील व कपटी राजकीय डावपेच खेळले आहेत.
- ॲट्रॉसिटीचा मुद्दा नसतांना देखील तो विषय ऐन निवडणूकीत चर्चेत आणणे, विकाऊ पत्रकारांना हाताशी धरून या विषयांवर माध्यमांत व वृत्तपत्रात विनाकारण चर्चा घडवुन वातावरण गढुळ करण्याचे काम केले जाते.
- निवडणूक लोकसभेची असो की विधानसभेची, जिल्हा परिषद असो की महापालिका, पंचायत समिती व नगरपालिकेची…. प्रत्येक निवडणूकीत ज्या मतदारसंघात बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाचा उमेदवार जिंकण्याच्या स्थितीत आहे, त्या त्या मतदारसंघात जातीय व धार्मिक विष पेरण्याचे काम सत्ताधारी व प्रस्थापित राजकीय पक्षांनी केले आहे. गणपतीच्या अंगावर निळ टाकणे, देवी देवतांच्या मंदिरावर रातोरात निळा झेंडा लावणे, बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना करणे, बुध्द विहारासमोर किंवा मोठ्या दलित वसाहतीमध्ये देवी देवतांची स्पीकरवरून मोठ्याने गाणी लावणे यासह दलित समाजाबद्दल इतर समाजाच्या मनात घृणा निर्माण होईल असे कृत्य करणे आणि दलितांच्या मनात सवर्ण समाजाबाबत व्देष व तिरस्कार निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्याचे अनेक प्रयोग महाराष्ट्रात झाले आहेत. या सर्व प्रयोगाचे शिल्पकार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सह भाजपा व प्रस्थापित राजकीय पक्षांना जात असल्याचे आंबेडकरी विचारवंतांनी अनेक लेखांतून मत व्यक्त केले आहे. याबाबतच सविस्तर लेख नॅशनल फोरम मध्ये वाचावा.
या सर्व राजकीय कपटी खेळात एक उद्देश होता व आहे की, बाळासाहेब आंबेडकरांचे बहुजन हिताय, बहुजन सुखाय ची संकल्पना राज्यात रुजली जाऊ नये, शोषित, पिडीत, वंचित बहुजन समाजाला सत्तेत येऊ दयायचे नाही, गरीब मराठा समाजाला सत्तेत येऊ दयायचे नाही, ओबीसी समाजाला सत्तेत येऊ दयायचे नाही, अल्पसंख्याकांना तर सत्तेपासून दुरदुर ठेवायचे… हिंदू आणि हिंदूत्वावर चर्चा करून, मुस्लिम अल्पसंख्यांकाविरूद्ध विव्देषाचे राजकारण खेळण्यात आले आहे. ऐन निवडणूकीत धार्मिक व जातीय वातावरण निर्माण करून मतविभागणी घडवुन सत्तेपर्यंत पोहोचण्याचे अनेक प्रयत्न प्रस्थापित राजकीय पक्षांनी केलेले आहेत.
जातीय धार्मिक तेढ ऐन निवडणूकीत निर्माण करून, प्रादेशिक अस्मिता मोडून काढणे, नागरीकांच्या भावना चिरडून टाकणे, जातीय व धार्मिक धु्रवीकरणानुसार व धु्रवीकरणानंतर मतदारांच्या मानसिकतेनुसार, एक तर ही मते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावीत, ती जर काँग्रेस- राष्ट्रवादीला मिळाली नाहीत तर ती मते भाजपाला मिळाली पाहिजे यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागलेली असते. परंतु काहीही करून, ही मते बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय पक्षाला मिळणार नाहीत अशी तरतुद केली जाते. एकवेळ भावना दुखावलेला आंबेडकरी मतदार … रागाने आम्हाला मतदान करतील किंवा मतदानच करणार नाही म्हणजे राजकीय भाषेत प्रतिस्पर्धी उमेदवाराचे मतदान कुजवुन टाकणे असे त्याला म्हटले जाते.
काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस या सत्तापिपासू पक्षाने आजपर्यंत बहुजन समाजातील उगवत्या राजकीय नेतृत्वाचे पुरते खच्चीकरण केले आहे. आंबेडकरी राजकीय पक्षाची युती झाली तरी त्यांची मते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी किंवा अन्य बहुजन समाजातील नेत्याच्या राजकीय पक्षाला ती मिळत नाहीत. मतांचे आदान प्रदान केले जात नाही. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती केली तर आंबेडकरी जनसमुहांची मते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतात परंतु काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची मते बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाला दिली जात नाहीत. थोडक्यात अदान -प्रदान केली जात नाही तर काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसची मते भाजपाला वळवली जातात हा इतिहास आहे. त्यामुळे फुले, शाहु, आंबेडकरी विचारांच्या मतदारांनी प्रस्थापित राजकीय पक्षांचे डावपेच ओळखावेत. 14 एप्रिल, 6 डिसेंबर, 1 जानेवारी सह अन्य आंबेडकरी विचारांच्या ठिकाणी, आंबेडकरी विचारांची जनता मोठ्या संख्येने त्यांच्या अस्मितेच्या ठिकाणी स्वखर्चाने जात असतात. त्यात प्रस्थापित पक्ष पुरस्कृत दलित नेते येऊन भाषणबाजी करतात. त्यामुळे ते आंबेडकरी समाजाचे नेते नाहीत हे प्रथम लक्षात घ्यावे. आंबेडकरी जनसमुहाचे मतदान कधीच फुटत नाही, केवळ मतांच धु्रवीकरण करून ते फोडण्याचे प्रयत्न केले जातात. प्रस्थापित राजकीय पक्षांनी निळे झेंडे लावले तरी आंबेडकरी जनसमुह त्या पक्षाकडे आहेत असा त्याचा अर्थ समजुन घेवू नये. दुष्मनची चाल अब समझ गये है.
कोणत्याही निवडणूकीत प्रस्थापित पक्ष निळे झेंडे लावुन मिरवत असतो. त्या भुलभुलय्यांना बहुजन समाजाचे बळी पडू नये. सर्व भीमशक्ती बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभी आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सर्वजन हिताय… सर्वजन सुखाय… च्या वंचितच्या लढ्यात सर्वांना पुढे येऊन बहुजनांची अभेद्य ताकद उभी करावी. मी स्वतः वंचितचा कार्यकर्ताही नाही… आणि प्रचारकही नाही. मी केवळ फुले,शाहू, आंबेडकरी विचाराच्या तसेच बाळासाहेब आंबेडकर यांचा मतदार आहे. मतदार म्हणून मला मागील 25/30 वर्षात आलेले माझे अनुभव मी कथन केले आहेत.