Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सनातनी पिसाळले, राज्यात पुन्हा जातीयवादाचे थैमान

पुण्यात आंबेडकर जयंती मिरवणुक, कार्यकर्त्यांवर बंदुका उगारल्या…. लातूरमध्येही निळे झेंडे लावले म्हणून पोलिसांसह गावगुंडांची बेदम मारहाण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
निवडणूक आलेले आमदार, खासदार भारतीय संविधानाची शपथ घेवून कायदयाप्रमाणे मी कामकाज करेन, कुणाचेही लांगुनचालुन करणार नाही अशी शपथ घेतात. परंतु राजकीय पक्षाच्या बॅनरखाली भाषणबाजी करीत असतांना, जाती आणि धर्माबद्दल समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करतात. त्यामुळे शपथेचा भंग केला म्हणून त्यांची आमदारकी व खासदारकी रद्द होणे कायदयाला अपेक्षित आहे. परंतु काँग्रेसच्या 70 वर्षाच्या राजवटीसह जनता पार्टी, भाजपाच्या 8 वर्षाच्या कालावधीत कुणीही कारवाई केली नाही. याचा अर्थ जाती व धर्मामध्ये तेढ निर्माण केल्याशिवाय आमदार, खासदार होता येत नाही किंवा सत्ताधारी देखील होता येत नाही असे काहीसे समिकरण राजकीय पक्षांनी तयार केल्यामुळेच राज्यात आणि देशात जातीय व धार्मिक तेढ अधिक निर्माण झाली आहे. 14 एप्रिल रोजी पुण्यातील प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या कॅम्प मध्ये आंबेडकर जयंती मिरवणूकीतील कार्यकर्त्यांवर भाजपाच्या जातीयवादयांनी बंदूका रोखल्या. तर तिकडे लातुर मध्ये आंबेडकर जयंती साजरी करायला तुला कुणी परवानगी दिली म्हणून पोलीस निरीक्षक मोहिते यांनी चंद्रकांत कांबळे यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.

चंद्रकांत कांबळे रा. गांजारवाडी ता. चाकुर जिल्हा लातुर यांनी माहिती दिली की, गावात आम्ही आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी निळे झेंडे लावत असतांना, गावाचे सरपंच भुजंग शिंदे यांनी आडकाठी आणली. तसेच म्हारा मांगांचा झेंडा आमच्या दारात शोभत नाही. गावात आंबेडकर जयंती साजरी करायची नाही म्हणून गावातील गावगुंडांनी चंद्रकांत कांबळे व इतरांना मारहाण केली. याबाबत चाकुर पोलीस स्टेशन येथील पीएसआय बोडके यांनी आम्हाला नोटीस देऊन, गावात आंबेडकर जयंती आम्ही साजरी करणार नाही असे आमच्याकडून जबरदस्तीने लिहून घेतले आहे. दरम्यान आंबेडकर जयंतीची परवानगी मागण्यासाठी पोलीस स्टेशन येथे गेल्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मोहिते याने चंद्रकांत कांबळे यांना उद्देशून म्हणाले की, तुम्हाला लय माज सुटला आहे, असे म्हणून अतिशय गलिच्छ शिवीगाळ करण्यात आली तसेच आंबेडकरी जयंती साजरी करायला तुला कुणी परवानगी दिली म्हणून कांबळे यांना जबर मारहाण केली. 
आता कायदयाचे रक्षकच जर अशा प्रकारचे गैरकायदयाचे वर्तन करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहेच. तसेच महामानवांच्या जयंतीला परवानगी देण्याचा अधिकार पोलीसांना कोणत्या कायदयाने दिला आहे, याचे उत्तर पोलीस महासंचालकांनी देणे आवश्यक आहे. स्पीकर परवाना, मंडप परवाना, असु शकतात. परंतु आम्ही जयंती साजरी करायची की नाही यावर पोलीसांची मिजासखोरी कशासाठी पाहिजे... एखादया गुन्हेगाराला मारावे तसे गोरगरीब दलितांवर पोलीस अत्याचार करीत आहेत. गैरकायदयाचे वर्तन करून पोलीस खात्याची बदनामी केल्याप्रकरणी पीएसआ बोडके आणि वरीष्ठ पोलीस निरीक्षक मोहिते यांच्यावर खात्यातून बडतर्फीची कारवाई होणे आवश्यक आहे. 

पुण्यातही भाजपाच्या गावगुंडांनी आंबेडकर जयंतीवर बंदुका रोखल्या –
जातीय अत्याचारची दुसरी घटना पुण्यात घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने कॅम्प परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामध्ये फिर्यादी अमित मोरे सहभागी झाले होते. मिरवणूक बाटा चौकात आल्यानंतर मोरे यांच्या ओळखीतील संतोष यादव, सागर वैऱ्या आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्यांना धक्का दिला तसेच मोरे यांच्यासोबत असलेल्याला मारहाण केली. दरम्यान मोरे हे त्याबाबतची तक्रार देण्यासाठी लष्कर पोलिस ठाण्यात गेले असता, भाजपाचा माजी नगरसेवक विवेक यादव देखील साथीदारांसह लष्कर पोलिस ठाण्यात गेला. तसेच यादवने कमरेला लावलेले पिस्तुल रोखुन पोलिसांकडील तक्रार मागे न घेतल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी विवेक यादव (40, रा. वानवडी), त्याचा भाऊ संतोष यादव (25, रा. लुल्लानगर), सागर वैऱ्या (20), पंकज जगताप (35, रा. कुंभारबावडी, लष्कर), सुशिल यादव (35), शिवाजी उर्फ छत्या याच्यासह 20 ते 25 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमित नारायण मोरे (28, रा. लष्कर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लष्कर परिसरात घडली आहे.
दरम्यान लष्कर पोलीसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात न घेता जाणिवपूर्वक कमी शिक्षेची व जामिनमात्र गुन्हे दाखल केले असल्याचे दिसून आले आहे. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल जाधव अधिक तपास करीत आहेत. दरम्यान लष्कर पोलीस स्टेशन अतिशय संवेदनशिल पोलीस स्टेशन असून, त्यावर अतिशय जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक होणे आवश्यक असते.