Thursday, April 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजस्थानी लुटारूंचा पुण्यात धुमाकूळ
सिगारेट दुकानांवर दरोडा,
औषधाच्या नावाखाली दारूची तस्करी

नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधीः
पुणे शहरातील कोणतीही झोपडपट्टी, कोणतीही चाळ, कोणतीही सोसायटी अशी नाही की जिथे राजस्थानी किंवा ज्यांना मारवाडी म्हणून ओळखले जाते त्यांची दुकाने नाहीत. सर्वत्र या राजस्थानी मारवाडी व्यापाऱ्यांची किराणा मालाची दुकाने, सोन्याची दुकाने, औषधांची दुकाने, धान्याची दुकाने, गुटखा तंबाखूची दुकाने, प्लास्टीक वस्तु थोडक्यात विनानाशवंत मालाची दुकाने ही सर्वच्या सर्व दुकाने राजस्थानी आणि गुजराती व्यापारांची आहेत. बहुतांश दुकानांमधून मोठा काळा बाजार होत असल्याच्या बातम्या दैनंदिन प्रसारित होत आहेत. मागील दोन दिवसात पुण्यामध्ये दोन दरोड्याच्या बातम्या पुढे आलेल्या आहेत. यामध्ये सिगारेटच्या दुकानांवर दरोडा घालून लाखो रुपयांच्या सिगारेट चोरून नेल्या आहेत. तसेच औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी मध्ये देखील राजस्थानी लुटारूंची नावे पुढे आलेली आहेत.

पोलीसांनी मराठी भाषिक असलेल्या पारधी व दलित समाजाबद्दल मानसिकता बदलण्याची आवश्यकता –
दरम्यान दरोडा घालणारे राजस्थानी असतांना, शंका मात्र मराठी माणसांवर घेतली जाते. खरंतर मराठी, गुजराती, राजस्थानी, तामिळ किंवा उत्तर भारतीय असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव आम्हाला येथे करावयाचा नाही. प्रांतवादही पुढे आणावयाचा नाही. तथापि पुणे शहरांमध्ये कुठे जरी दरोडा पडला, घरफोडी झाली तर लगेच त्या हद्दीतील जवळपासच्या पारधी समाजावर तसेच दलित असलेल्या इतर जातींवर लक्ष केंद्रित करून त्यांना दरोडा घातला म्हणून संशयावरून अटक केलं जातं. गेली वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील पोलिसांचा संशय हा केवळ इथल्या दलित व आदिवासी मराठी भाषिकांवर होत आलेला आहे. अनेक पारधी समाजातील व दलित समूहातील इतर जातींवर चोरीचा संशय व्यक्त करून त्यांना हाल हाल केले असल्याची प्रकरणे अनेकदा आमच्या समोर आलेले आहेत. थोडक्यात चोरी करणारे रुबाबात फिरत आहेत आणि एक वेळच्या अन्नाला मोताद असलेले इतर जातीसमूहांवर मात्र चोरीचा संशय व्यक्त करून त्यांच्यावर पोलिसी अत्याचार केले जात आहेत असा अनुभव आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह पुण्यातील पोलीसांनी दलित व पारधी समाजाविषयीचा आकस दुर करणे आवश्यक ठरत आहे.
मुंबई इलाख्यातील गुन्हेगारी जमाती व त्याबाबतचा ब्रिटीशकालिन कायदा आता रद्द झालेला आहे. परंतु पोलीसांच्या मनांतील ब्रिटीश धार्जिणे धोरण स्वातंत्र्याच्या 75 वर्षात बदलेले नाही ही मोठी शोकांतिका आहे.

सिगारेट दुकानांवर दरोडा घालणाऱ्या राजस्थानी लुटारूंचा पुण्यात धुमाकूळ
समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत 16 एप्रिल 2023 रोजी नाना पेठेतील जय अंबे ट्रेडर्स या किराणा दुकानाचा पाठीमागील दरवाजा व लॉक कुणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून दुकानातील 5 लाख 9 हजार 350 रुपये किमतीची सिगारेटची पाकिटे व बॉक्स असा माल चोरून नेल्याचा गुन्हा समर्थ पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला होता. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील गुन्हे युनिट एक यांच्याकडील पोलीस अधिकारी व अंमलदार या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना, तसेच चोरी झालेल्या ठिकाणाजवळील आजूबाजूचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तीन आरोपीचे वर्णन निष्पन्न करून संबंधित आरोपी रिक्षामध्ये बसून गेल्याचे दिसून आले. या रिक्षाच्या बाहेरील वर्णनावरून रिक्षाचा वडगाव शेरीपर्यंत मागोवा घेतला असता संबंधित संशयित आरोपी हे साईकृपा हाऊसिंग सोसायटी वडगाव शेरी पुणे येथे रिक्षातून उतरल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा युनिट 1 यांच्याकडील पोलीस अंमलदार अमोल पवार व अण्णा माने यांनी आरोपींचा शोध घेतला असता, तीन आरोपी पैकी एक आरोपी हा साईकृपा हाऊसिंग सोसायटी वडगाव शेरी येथे राहत असल्याचे खात्री झाली. ही बाब गुन्हा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद यांना कळविले असता, त्यांनी लगेचच सपोनी आशिष कवठेकर व अंमलदार यांची टीम तयार करून कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले. युनिट एकचे अधिकारी व अंमलदार यांनी वडगाव शेरी येथे छापा टाकला असता तेथे बुधाराम बीयाराम चौधरी, वय- 45 वर्ष रा. साईकृपा हाऊसिंग सोसायटी वडगाव शेरी (मूळ रा. राजस्थान, राणीवाल येथे राहत असल्याचे त्याने पत्ता सांगितला.

 तसेच त्याच्या रूमची झडती घेतली असता किचन ओट्याखाली सिगारेटच्या पाकिट आणि भरलेल्या पिशव्या मिळून आल्या. तसेच आरोपींनी नाना पेठ येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी बुधाराम चौधरी याचा वावर मंडई परिसरात दिसून आल्याने, त्याच्याकडे अधिक तपास केला असता मंडई परिसरातील एक सिगारेट विक्रीचे दुकानातून सुद्धा माल चोरला असल्याचे त्याने सांगितले. चोरी केलेला माल हा वरील दुकानातील असल्याचे निष्पन्न झाल्याने एकूण 5 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे. त्याचे इतर साथीदार 2) रामलाल ढगळाराम चौधरी वय-29 वर्ष, 3) महावीर बगदाराम मेघवंशी व 19 वर्ष दोघे रा. सध्या दत्तवाडी (मूळ रा. राणीवाल जिल्हा -पोली, राजस्थान असे असून आरोपी क्र. एक ते तीन यांना अटक केली आहे. तिन्ही आरोपीकडून समर्थ पोलीस स्टेशन व विश्रामबाग पोलीस स्टेशन असे एकूण दोन घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईकामी समर्थ पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
 आरोपी बुधाराम दयाराम चौधरी याच्यावर यापूर्वी पुणे शहरात विश्रामबाग, कोंढवा, समर्थ, हडपसर अशा विविध पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी अशा प्रकारचे एकूण 10 गुन्हे दाखल आहेत.
 ही कामगिरी गुन्हे युनिट एककडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सपोनी आशिष कवठेकर, पो.उप निरी, अजय जाधव, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार, अण्णा माने, इमरान शेख, निलेश साबळे, शुभम देसाई, दत्ता सोनवणे, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे, अय्याज दड्डीकर, अभिनव लडकत, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, अनिकेत बाबर व तुषार माळवदकर यांनी केली आहे.

औषधांच्या नावाखाली राजस्थानी लुटारूकडून दारूची तस्करी –
गोवा राज्यातून औषधांच्या नावाखाली 46 लाख 67 हजारांची दारू घेऊन जात असलेला ट्रक पुणे विभागातील राज्य उत्पादन शुल्क यांच्या पथकाने पकडला. ही कारवाई मुळशी मालेगाव परिसरात करण्यात आली. दारूसह दोन तस्करांना अटक करण्यात आली. दानाराम चुनाराम नेहरा आणि रुखमनाराम खेताराम गोदरा अशी अटक केलेल्या दारू तस्करांची नावे आहेत.
राज्य उत्पादन शुल्कच्या गस्तीवरील सासवड विभागाच्या पथकाला मुळशी तालुक्यातील मालेगावच्या हद्दीत पुणे – माणगाव महामार्गावर ट्रकमधून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती अधीक्षक चरणसिंह राजपूत यांना मिळाली होती. पथकाने सापळा रचून ट्रक पकडला. चौकशी केली असता, गाडीमध्ये औषधे असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पथकाला संशय आल्याने त्यांनी गाडीची तपासणी केली असता, गाडीत इम्पेरियल ब्ल्यू किस्को 180 मिली. क्षमतेच्या 8 हजार 640 सीलबंद बाटल्यांसह रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या बाटल्या आढळल्या. त्यानुसार पथकाने 46 लाख 67 हजारांचा दारूसाठा आणि ट्रक असा तब्बल 57 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुण्यातही मध्यंतरी गुटख तस्करी, देशी विदेशी दारूची तस्करी यामध्ये राजस्थानी व्यापारी व लुटारूंची नावे पुढे आली आहेत. पुणे पोलीसांनी राजस्थानी गुन्हेगारांवर अधिक पाळत ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तसेच राजस्थानी व्हाईट कॉलर क्राईमवर अधिक संशोधन होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.