Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

फुकटच्या जादा पैशाचे अमिष पुणेकरांना पडले महागात, पुण्यात 395 चा उद्रेक, 420 ही कमी नाहीत…

395 मध्ये तथाकथित पत्रकार, कार्यकर्त्यांसह पोलीसांचाही सहभाग
420 मध्ये खाजगी सावकार सामान्यांना गंडा घालतात, तर याच खाजगी सावकारांना शेअर मार्केट मधील लॉबी गंडा घालत आहे…

पुणे/दि/ अनिरूद्ध शालण चव्हाण/
पाण्यातील मासा, पाणी कधी पितो हे कुणालाच ठाऊक नसते…. लहान माश्याला मोठे मासे खातात हा निसर्ग नियम आहे…. एससी,एसटी वर ओबीसींसह प्रस्थापित सवर्ण मंडळी असंवैधानिक अत्याचार करीत असतात… अगदी तस्संच काहीस पुणेकरांचे झाले आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन नंतर, सगळे जादा पैशाच्या मागे लागले आहेत. त्यातच पुणे शहरात सध्या मटका, जुगार अड्डयांचे महाव्दार उघडले आहे. गैरकायदयाच्या मंडळींनी त्या त्या हद्दीत एकत्र येऊ गैरकायदयाची कामे वेगात सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र ज्यादा पैशाच्या अमिषाने खाजगी सावकार सर्वसामान्य किरकोळ दुकानदार, नोकरदार,गृहिणी यांच्याकडून दुप्पट, तिप्पट व्याज वसूल करीत आहे, तर हेच खाजगी सावकार दरमहा 8/10 टक्के व्याज मिळते म्हणून शेअर मार्केट मध्ये लाखो, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करीत आहेत. परंतु मध्येच ही कंपनी गाशा गुंडाळते आणि खाजगी सावकारांचा तिळपापड होतो. मग पोलीसांचे पाय धरल्याशिवाय गत्यंतर उरत नाही. आज पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर गुन्हे शाखेकडे आर्थिक गुन्ह्याच्या शेकडोंनी तक्रारी दाखल आहेत. त्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सगळीकडे 395 सह 420चा उद्रेक झाला आहे.

पुण्यात मटका जुगार अड्डयांचे महाव्दार उघडले –
पुणे शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज एकही कोपरा आणि गल्लीबोळ शिल्लक राहिले नसेल, अशा सर्वच्या सर्व ठिकाणी आज मटका अड्डे, जुगार अड्डे, तीन पत्ते क्बल, महाभारतात कौरव पांडवांनी ज्या प्रकारचा जुगार खेळला होता, तो गिर्दी, काठी सारखे द्युत वेगात सुरू आहेत. या खेळात तर एक लाखापासून ते दोन कोटी रुपयांपर्यंत सट्टा लागतो. हा जुगार खेळण्यासाठी पुण्यासह मुंबई, गुजरात येथुन जुगार खेळण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कमी नाही. मसाज पार्लर, स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू आहेत, खाजगी सावकारी वेगात सुरू आहे. हा झाला भाग क्रमांक एक…पुढे नाट्याला सुरूवात होते.

तथाकथित पत्रकार आणि कार्यकर्त्यांची अवैध धंदयाविरूद्धची पत्रकबाजी आणि पुढे होणारे सेटलमेंट –
खरं तर या विषयावर कधीच कुणी उघडपणे बोलत नाहीत. तेरी भी चुप आणि मेरी भी चुप अशी आजची परिस्थिती आहे. कालचेच उदाहरण घ्या. बारामती तालुक्यात राहणारा व सध्या पुण्यात मामाकडे आलेला एक युटयुब व न्यूज पोर्टलच्या पत्रकाराने पोलीसांना पत्र देऊन… अमुक एका ठिकाणी जुगार अड्डा सुरू आहे. तो बंद करावा असे पत्र दिले. पुढे त्याने एक बातमी तयार केली. त्याला बातमी म्हणावे की काय असा प्रश्न पडतो. त्यात ऱ्हस्व- दीर्घ तर सोडाच परंतु बातमी म्हणून त्याला काहीच आकार नव्हता. तरी तो पत्रकार म्हणवून घेतो. मग काय… स्थानिक पोलीस लागले कामाला… अवैध धंदे चालविणारे कामाला लागले…. त्या पत्रकार बनाम कार्यकर्त्याला शोधून काढले. मग त्याने देखील तडजोड करून दर दिवशी व दरमहा एवढी रक्कम देण्यात दोघात ठरले. मग त्याने त्याच्या तथाकथित न्यूज पोर्टलवरील बातमी डिलिट करून टाकली.
मग काय त्याचा विश्वास अधिक दुणावला. त्याने पुनः दुसऱ्या शेजारच्या पोलीस स्टेशन हद्दीतील धंदयाविषयी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. तो तक्रार अर्ज पोलीस निरीक्षकांच्या मोबाईलवरील व्हॉटसॲपवर सेंड केला. मग काय… पुनः स्थानिक पोलीस कामाला लागले…. धंदेवाले कामाला लागले… पुनः त्याला शोधून काढून… सेटलमेंट आणि पुढे सेंटलमेंट… सगळीकडे असेच सुरू आहे.

गुन्हेगार आणि पोलीसांचे अवैध धंदे –
मला माहिती असलेल्या सहकार नगर, भारती विद्यापीठ, लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील बहुतांश मटका जुगार अड्डे, मसाज पार्लर, देशी विदेशी दारू व हातभट्टीच्या धंदयामध्ये स्थानिक पोलीसांचे पैसे लागलेले आहेत. तेच पोलीस पंटर व रायटर यांना हाताशी धरून हे धंदे चालवित असल्याचे समोर आले आहे. तत्कालिन सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक हे अवैध धंदयावर धडाधड कारवाई करीत असतांना, त्यातून ही बाब समोर आली होती.
काही निरीक्षणे आहेत त्या पैकी 1. काही पोलीस स्वतः मटका जुगार अड्डे चालवितात… 2. काही पोलीस भागीदारीत जुगार अड्डे, वेश्याव्यवसाय चालवितात… 3. काही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे सुरू असलेल्या धंदयात काही टक्केवारी घेवून धंदे चालवितात… तर 4. काही पोलीस फक्त धंदा सुरू आहे म्हणून पैसे घेतात. थोडक्यात या अवैध धंदयात पोलीसांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. या विषयावर कुणीच बोलणार नाहीये. परंतु मला हे दिसत असतांना मी का गप्प बसावे…

तथाकथित न्यूज पोर्टल आणि यु ट्युब चालकांचा धुमाकुळ –
आम्ही देखील पदवी नंतर जर्नालिझम पुढे विधी शाखेचे शिक्षण घेतल्यानंतर, काही लहान मोठया दैनिकात काम केले. पुढे 1997 नंतर पुण्यातील सिंबायोसिस मध्ये ई टीव्ही मराठी सह काही खाजगी वृत्तवाहिन्यांच्या नव्याने मुलाखती सुरू झाल्या. दैनिक वृत्तपत्रासह खाजगी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. दरम्यान प्रस्थापित दैनिक व प्रस्थापित खाजगी वृत्तवाहिन्यांमध्ये मनासारखे लिहता येत नाही, मनासारखे बोलता येत नाही म्हणून माझ्यासह अनेकांनी पुढे भारत सरकार यांच्याकडे नोंदणीकरून लहान मोठी वृत्तपत्रे सुरू केली.
आता देखील 2015 पासून संपूर्ण देशातील खाजगी वृत्तवाहिन्यांमधील पत्रकारांना प्रामाणिक पत्रकारीता करण्यास मज्जाव केल्यापासून शेकडो नव्हे हजारो पत्रकारांनी स्वतःचे न्यूज पोर्टल, यु ट्यु चॅनेल्स सुरू करून, प्रस्थापित सरकारविरूद्ध आवाज उठवित आहेत. काँग्रेसच्या काळात काय अन्‌‍ भाजपाच्या काळात काय… सगळे पक्ष सारखेच आहेत. निर्भिड पत्रकारीता मोडीत काढण्याचे काम या दोन्ही पक्षांनी केले आहे. लोकशाही मोडीतच काढली नाही तर लोकशाहीचे धिंडवडे मांडले आहेत.

हा झाला इतिहास भूगोल. परंतु ज्यांची 7 वी, 10 वी, 12 वी झाली आहे, कोण कुठे वृत्तपत्राचे वितरणाचे काम करीत होता, कोण प्लंबरचे काम करीत होता, कोण महापालिकेत कंत्राटी कामगार, कुणी सेक्युरिटी गार्ड , कोण रिक्षाचालक अशा सर्व मंडळींनी पुढे जाऊन स्वतःचे न्यूज पोर्टल व युट्युब चॅनल्स सुरू करून ब्लॅकमेलिंगचा धंदा तेजित सुरू केला आहे. आता या न्यूज पोर्टल व युट्युब चालविणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना जाब दयावा लागत नाही, यांना वृत्तपत्राचे ऑडीट करावे लागत नाही, शासकीय नियम व बंधने तर काहीच नसतात, प्रकाशन अधिनियम लागु नाही. त्यामुळे यांचे सगळे फावत चालले आहे. त्यामुळे खरी व निर्भिड पत्रकारीता आज संकटात आली आहे. अभ्यास करून लिहण्याचा जमाना लुप्त पावत चालला आहे. आत फक्त कॉपी पेस्टचा जमाना आला आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकत्यांनी व्हॉटसॲप व फेसबुकवर टाकलेले व्हीडीओवर स्वतःचे न्युज पोर्टलचे नाव लावुन बिगर अँकरींगच्या बातम्या चालविण्याचा जमाना आला आहे. अँकरींग करण्यासाठी देखील अभ्यास करावा लागतो. तोच अभ्यास नाही तर अँकरींग करणार तरी काय.. डोंबल....

त्यातही युट्युब किंवा न्यूज पोर्टलचे डोमेन हे जागतिक आहे. त्यात भारत सरकाचा हस्तक्षेप नाही. केवळ एखादा गुन्हा घडल्यास सायबर क्राईम कायदयानुसार भारतीय कायदे लागु होतात. नाहीतर वर जे लिहले आहे, तो सगळा कारभार सुरू आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष, त्यांचे स्थानिक पोलीसांशी असलेले साटेलोटे याबाबत तर काही बोलायलाच नको... तेरी भी चुप आणि मेरी भी चुप...

मुंबईतील तथाकथित पत्रकारांचा पुण्यात राडा –
पुण्यामध्ये तक्रारखोर कमी होते की काय म्हणून आता मुंबई, ठाणे व रायगड मधुन काही पत्रकार पुण्यात येत आहेत. तसे ते अनेक वर्षांपासून पुण्यात येत आहेत. मला आत्ताशी समजले आहे. तर हे एकुण आठ इसम असून, त्यांना गाईड करणारा एकच आहे. जुगार अड्डे चालविणाऱ्यांकडून एकाच तथाकथित पत्रकाराच्या मोबाईलवरील गुगल पे वरून हा पैसे घेत असल्याचे समोर आले आहे. यांचेही तथाकथित युटयुब, न्यूज पोर्टल आहेत. त्याचा धाक दाखवुन, तक्रारी करून, पुण्यात धुमाकुळ घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यातील पोलीसांनी अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंग विरूद्ध पुढे येणे आवश्यक होते. परंतु पोलीसांसह जुगार अड्डे चालविणारे या तथाकथित महाभागांपुढे नागिन डान्स करतात हे विशेष.
यातही काही अवैध धंदे चालविणारी मंडळी, सामनेवाल्याचा धंदा बंद पडावा म्हणून अधिक ताकद लावत आहेत. यासाठी या मुंबईतील पोर्टल चालविणाऱ्या पत्रकाराचा वापर करीत आहेत. पुण्यातील एका पेठेतील कुण्या एका काळात दादर मधील चप्पलचोराचा हा चार मजली इमारतीमधील धंदा बंद करण्यासाठी या पत्रकाराने थेट सहपोलीस आयुक्तांचे नाव पुढे करून धंदा बंद करण्यासाठी पुढे पाऊल उचलले होते. काय तर म्हणे लाखो रुपये वाटूनही एकाच महिन्यात चार वेळा कारवाया… म्हातारा जुन्या खऊट शिव्या घालत आजही दारात बसलेला असतो म्हणे…

395 मध्ये तथाकथित पत्रकार, कार्यकर्त्यांसह पोलीसांचाही सहभाग –
420 मध्ये खाजगी सावकार सामान्यांना गंडा घालतात, तर याच खाजगी सावकारांना शेअर मार्केट मधील लॉबी गंडा घालत आहे…

खरं तर 395 वाल्यांची हकीकत नमूद केली. परंतु पोलीस खात्यातही 395 वाल्यांची मोठी टोळी कार्यरत आहे. त्या विषयी पुढील लेखात बघुयात. आता 420 ठगीचे काही नमूने पाहुयात.
कोरोना महामारी आणि लॉकडाऊन नंतर सगळ्यांना ऐषआरामातील जीवन जगायचे आहे. त्यासाठी अजिबात कष्ट नकोत. त्यामुळे रिअल इस्टेट मधील भाडेखोरी, खाजगी सावकारीचा उदय झाला आहे. यातच जास्त क्राईम होत आहे त्यामुळे त्याला अधिक प्राधान्य देणे क्रमप्राप्त ठरते. किरकोळ दुकानदार, पथारी व्यावसायिक, गृहउद्योग, लघु उद्योग, गृहिणी, नोकरदार यांनाच मुलांच्या शिक्षणासह जीवनाश्यक वस्तुंसाठी किरकोळ पैशांची गरज असते. नागरी सहकारी पतसंस्था, सहकारी बँका यांचे हे काम असतांना देखील सहकारात असहकार घुसल्यामुळे खाजगी सावकारी वाढली आहे.
खाजगी सावकार देखील बँकापेक्षा दुप्पट तिप्पट व्याज लावुन पैसे देत आहेत. पैसे व व्याज वेळेत दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे, त्यातूनच कोयता गँग उदयाला आली आहे. याच 15/20 वर्षांच्या टपोरी मुलांना पुढे करून त्यांच्या हातात कोयते, छर्ऱ्याची बंदूक देवून खाजगी सावकार वसुलीसाठी पाठवित आहेत. हे पहायचे असेल तर मार्केटयार्ड, भवानी पेठेसह पुण्याच्या उपनगरात कुठेही जा तिथे हा धुमाकुळ दिसून येईल. याच मुलांचा वापर नंतर भारत सरकारडे नोंदणीकृत खाजगी फायनांन्शिल कंपन्यांच्या वसुलीसाठी देखील या मुलांचा वापर केला जात आहे. परंतु यावर पोलीसांसह कुणीच बोलत नाहीत.

दरम्यान किरकोळ दुकानदार, पथारी व्यावसायिक, गृहउद्योग, लघु उद्योग, गृहिणी, नोकरदार यांच्याकडून दुप्पट, तिप्पट व्याज वसुल करून हा काळा पैसा पुनः पांढरा करण्यासाठी हेच खाजगी सावकार शेअर मार्केट मधील जाहीराती व मित्र मंडळी यांच्या सल्लयाने गुंतवणूक करीत आहेत. ही गुंतवणूक एक लाख रुपयांपासून ते पाच कोटी रुपयांपर्यंतची आहे. (यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर व आर्थिक गुन्हे शाखेत जावून माहिती घ्यावी.) मोठया रकमेची गुंतवणूक आणि त्यावर मोठे व्याज मिळत असल्यामुळे आणखी स्वतःच्या नावाने, पत्नीच्या नावाने, भावाच्या नावाने गुंतवणूकीचा धडाका लावुन काळा पैसा पांढरा करण्याची चढाओढ लागली आहे. 
परंतु दुर्देव... पुढे जावून शेअर मार्केट मधील लॉबी देखील हुश्शार आहे. ते देखील वर्ष दिड वर्षात स्वतःचा गाशा गुंडाळतात. आणखी नवीन ठिकाणी जाऊन ज्यादा व्याजाचे आमिष दाखवुन लुटण्याचे उद्योग सुरू करतात. पुण्यातील बहुतांश खाजगी सावकार व काळ्या पैसेवाल्यांनी पुण्यासह मुंबई  व ठाण्यात मोठी गुंतवणूक केली आहे. पुढे त्यांची फसवणूक झाली म्हणून पोलीस आयुक्तालायच्या पायऱ्या झिजवत आहेत. 
खरं तर या विषयावर लिहण्यासारखे खूप आहे. परंतु आमच्याकडे वृत्तपत्राची पाने चार आहेत. एकाच विषयावर दोन दोन पाने देता येत नाहीत. इतरही बातम्यांना न्याय दयावा लागतो. त्यामुळे आज एवढं पुरेसं आहे. क्रमशः