Saturday, April 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

गुरुवार पेठेत पायी जाणाऱ्या डॉक्टर महिलेची सोनसाखळी हिसकावली, क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी पाठलाग करून चोरास पकडले …

घोरपडे पेठेतील तरुणांचा खडक पोलिसांकडून सत्कार

नॅशनल फोरम /पुणे /दि/ प्रतिनिधी/
पुण्यातील गुरुवार पेठेत भर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास डॉक्टर महिलेची सोनसाखळी चोरीचा प्रकार घडला असून पळून जाणाऱ्या चोरास घोरपडे पेठ येथे क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांनी पळून जाणाऱ्या चोराचा पाठलाग करून त्याला पकडले आहे . याबाबत फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सतीश गोवेकर खडक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता यादव यांनी या धाडसी तरुणांचा सत्कार केला आहे गुन्ह्याची हकीकत अशी की,

     १६ मे २०२३ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास महिला डॉ. अर्णिका अखिलेश सिंग वय २९ वर्षे, रा . शांतीनगर सोसायटी, गुरुवार पेठ पुणे या पायी चालत घरी जात असताना एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील चैन जबरीने चोरून तेथून पळ काढला . 

त्यावेळी त्या मदतीसाठी ओरडल्या असता घोरपडे पेठ येथे क्रिकेट खेळत असलेले स्थानिक तरुण गोवर्धन विलास गोगावले, हेमंत विनायक झेंडे , उमेश काशीद अभिषेक दिगंबर जाधव यांनी पळून जाणाऱ्या चोरास पाठलाग करून पकडले . तसेच घटनेच्या ठिकाणी तात्काळ पोहचलेल्या पो नि राऊत ( गुन्हे ) व पथकाच्या ताब्यात दिले . त्याच्याकडून चोरी केलेली चैन जप्त करण्यात आली आहे .

या घटने बाबत खडक पोलीस स्टेशन येथे कलम ३९२ भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नामे महेश लक्ष्मण सावंत रा. थेरगाव, वाकड पुणे यास अटक करण्यात आली आहे व पुढील तपास स पो नि जाधव हे करीत आहेत .

  चोरी करून पळून जाणाऱ्या आरोपीस मोठ्या धाडसाने पकडणारे स्थानिक  तरुण नागरिक गोवर्धन विलास गोगावले,  हेमंत विनायक झेंडे , उमेश काशीद, अभिषेक दिगंबर जाधव यांनि दाखवलेल्या तत्परतेबाबत व धाडसाबाबत श्री. सतीश गोवेकर,( सहायक पोलिस आयुक्त, फरासखाना विभाग)  व संगीता यादव, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,खडक पोलीस स्टेशन) यांनी या तरुणांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचे  आभार मानले . 
  तसेच या निमित्ताने नागरिकांनी देखील  अशा  प्रकारे धाडस दाखवून मदतीला पुढे यावे असे आवाहन खडक पोलिसांमार्फत करण्यात येत आहे .