Saturday, January 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बिबवेवाडी गंगाधाम चौकातील सॉलिटेअर एमटीएम ने पुणे महापालिकेचे थकविले दोन कोटी रुपये

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरासह दक्षिण पुण्यात बेकायदेशिर होर्डींगवाल्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यात एका आकारमानाच्या होर्डींगला परवानगी घेवून प्रत्यक्षात जागेवर जास्त आकारमानाचे होर्डींग उभारले गेले आहेत. वर्षानुवर्षे पुणे महापालिकेचा महसुल बुडविला जात आहे. दरम्यान पुणे महापालिकेतील आकाशचिन्ह व अतिक्रमण विभागावर उपआयुक्त माधव जगताप यांचीच मिरासदारी होती व आहे. त्यामुळे मागील सात/आठ वर्षात आकाशचिन्ह विभागाने पुणे महापालिकेच्या महसुलात वाढ करण्याऐवजी स्वतःचा आर्थिक विकास करण्याचे धोरण अवलंबविल्यामुळे पुणे शहरात होर्डींगचा धुमाकुळ सुरू आहे. त्यात बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील व पुण्याच्या दक्षिण भागातील सॉलिटेअर एमटीएम बांधकाम व्यावसायिकाने लहान मोठ्या आकारमानाचे सुमारे 125 पेक्षा अधिक होर्डींग उभे केले आहेत. तथापी मागील काही वर्षांपासुन त्यांनी होर्डींगचा महसुल भरला नाही. सॉलिटेअर विरूद्ध तक्रार केल्यानंतर, आता सुमारे 2 कोटी रुपये भरण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण –
पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील गंगाधाम चौकापासून सुरू होणारे सॉलिटेअर इमारती व एमटीएम मार्केटचे बांधकाम सुरू आहे. एकुण 22 एकर भुखंडावर सुमारे 2000 दुकानांचे/ शॉपिंग मॉलचे बांधकाम सुरू आहे. त्यांच्या संरक्षक भिंतीवर 20 बाय 30 आकाराचे सुमारे 45 होर्डींग बॅनर्स आहेत. तसेच 20 बाय 2 आकाराचे उभ्या साईजचे सुमारे 80 होर्डींग आहेत. सुमारे 45 + 80= 125 बॅनर्स मागील तीन वर्षांपासून ह्या जाहीराती दिसत आहेत. तथापी सॉलिटेअर एमटीएम बांधकाम व्यावसायिकाने जाहीरातीपोटी किती रक्कम भरली, त्याची काहीच माहिती बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय यांच्याकडील रजिस्टरमध्ये उपलब्ध नाही. ते अधिकृत आहेत की अनाधिकृत याचीही माहिती दिली गेली नाही. दरम्यान त्यांचेवर मागील काही वर्षात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

संबधित कंपनीने त्यांचे संरक्षक भिंतीवर ह्या जाहीरातींचे होर्डींग लावण्यात आलेल्या आहेत. तसेच या मार्केटमध्ये वेगवेगळ्या साहित्य व मार्केटचा तपशील देणाऱ्या उदा- सोने (गोल्ड) मार्केट, डायमंड मार्केट, कपडा मार्केट इ.इ. स्वरूपाच्या सुमारे 45 होर्डींगव्दारे जाहीराती केल्या जात आहेत. तसेच एमटीएम नमूद असलेले सुमारे 80 बॅनर्स/ होर्डींग आहेत. सुमारे 125 पेक्षा अधिक जाहीराती केलेल्या असतांना, त्याबाबतची परवानगी घेतली नसल्याची बाब माहितीचे अधिकार- 2005 चे संदर्भानुसार दिसून येत आहे. 

 गंगाधाम चौक ते वरचा कोंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरू असलेल्या बांधकामाच्या जागा वापराचे ठिकाणी ह्या जाहीराती केलेल्या आहेत. तथापी त्याची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याने पुणे महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच ते नुकसान आजही होत आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. श्रीनाथ चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर देखील कारवाईची कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत. याबाबत पुणे महापालिकेचे सहायक महापालिका आयुक्त श्री. आव्हाड यांची भेट घेवून बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील अनाधिकृत व बेकायदेशिर होर्डींगची माहिती दिली. दरम्यान महापालिका सहायक आयुक्त श्री. प्रदीप आव्हाड यांनी आकाशचिन्ह विभागाचे परवाना निरीक्षक श्री. विजय थनवाल यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. तथापी थनवाल हे कारवाई करण्यास पुढे येत नव्हते. कदाचित त्यांच्यावर आकाशचिन्ह विभागाचे उपआयुक्त श्री. माधव जगताप यांचा दबाव असल्याचे दिसून येत होते. माधव जगताप यांच्या दबावामुळेच अनेक होर्डींगधारकांवर कारवाई होत नाही असेही दिसून आले आहे. 

श्री. विजय थनवाल व सॉलिटेअर यांनी मुंबई प्रांतिक महानगरपालिका (जाहीरात व फलक नियंत्रण) नियम 2003 मधील तरतुदींचा भंग केला आहे. याच कायदयातील तरतुदीनुसार आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय कोणतेही अभिकरण, जाहीरात लावणार नाही. तसेच परिच्छेद 5 नुसार अनाधिकृत जाहीरात फलक, इत्यादी काढुन टाकणे किंवा पाडुन टाकणे याबाबत तरतुदी आहेत. या सर्व तरतुदींचा भंग जाहीरातदार संस्था यांनी केला आहे. तसेच पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाचे परवाना निरीक्षक श्री. विजय थन्वाल यांनी त्यांना दरमहा मिळत असलेल्या पारितोषण, यामुळे त्यांनी महापालिका अधिनियमातील तरतुदींची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे मागील दोन/तीन वर्षात पुणे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान केले असल्याबाबत देखील पुणे महापालिका आयुक्त कार्यालयास कळविले होते. 

माधव जगतापांचा पदभार काढुन घेतल्यानंतर नोटीसांचा धडाका –
दरम्यान पुणे महापालिकेच्या अतिक्रमण व आकाशचिन्ह विभागावर मागील सात/आठ वर्षांपासून ठाण मांडून बसलेले उपआयुक्त माधव जगताप यांच्याकडून दोन्ही पदांचा पदभार काढुन घेण्यात आलेला आहे. त्यामुळे स्वतःची वसुली बाहेर येवू नये किंवा माधव जगतापांचे नाव बाहेर येवू नये म्हणून सॉलिटेअरवर कारवाईचा बडगा उगारला असल्याची चर्चा आहे.
दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. श्रीनाथ चव्हाण यांनी, माहिती अधिकारात माहिती घेतली असता, माहे 31 मार्च 2023 रोजीपर्यंतचे चलन सॉलिटेअर एमटीएम यांनी घेवून गेले होते. तथापी आज ऑगस्ट 2024 पर्यंत होर्डींगची रक्कम भरलेली नव्हती. वर्षानुवर्ष होर्डींगची रक्कम भरली नाही तरी कारवाई केली जात नव्हती. दरम्यान कायदयातील तरतुदीनुसार, होर्डींगची रक्कम भरली नसल्यास कारवाई करण्याचे अधिकार पुणे महापालिकेकडे असतांना, केवळ आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आजही मोठ मोठ्या होर्डींग धारकांवर कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

दोन कोटी रुपये महसुल भरण्याची नोटीस –
बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयातील आकाशचिन्ह विभागातील भ्रष्ट सेवक श्री. विजय थनवाल यांनी स्वतःवरील कारवाईच्या भीतीने सॉलिटेअर या बांधकाम कंपनीस नोटीस बजावली असल्याचे समोर आले आहे. तसेच तातडीने पुणे महापालिकेचा महसुल भरण्यात यावा व त्याची प्रत बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुढील अंकात-
बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयातील आकाशचिन्ह विभागाचे परवाना निरीक्षक श्री. विजय थनवाल यांचे भ्रष्टाचाराचे महाउद्योग- लाखोंची गैरवसुली आणि कोट्यवधी रुपयांचा पुणे महापालिकेला चुना… वाचा पुढील अंकात….1) अनाधिकृत होर्डींगवर 2022 मध्ये कारवाई, सन 2024 मध्ये रातोरात 2013 ची परवानगी असल्याचे पुरावे तयार केले. 2) झाडे तोडली, होर्डींग उभे केले, म्हणे तिथे झाडेच नव्हती. वृक्ष अधिकारी म्हणतात, वृक्ष तोडणाऱ्यांवर आम्ही कारवाई करू… बघा, अतिक्रमण, आकाशचिन्ह आणि वृक्ष अधिकाऱ्यांचा काळु-बाळुचा तमाशा…