Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शिवाजीनगर-खडकी -विश्रांतवाडी पोलिसांच्या त्रिकुटाचा संघटित गुन्हेगारांच्या जुगार अड्ड्यात भागीदारी, सासु ड्रग माफिया तर जावई गॅम्बलर

पुणे पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनला गुन्हेगारी टोळ्यांनी केले ऑल आउट

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांनी ज्या गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का व एमपीडीए कायदयाने कारागृहात डांबले त्याच संघटित गुन्हेगारांच्या टोळीतील सदस्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीरपणे अवैध धंदा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मागील सात दिवसात पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला कळवून देखील मागील सात दिवसांपैकी एक दिवसही कारवाई झालेले नाही. अशीच अवस्था खडकी पोलीस स्टेशन व विश्रांतवाडी पोलीस स्टेशन यांची असून या तीनही लगतच्या पोलीस स्टेशनची संघटित गुन्हेगारांनी अक्षरशः चाळणी केली असून जागोजाग सर्वसामान्यांना बक्षीस आणि पैशाचे आमिष दाखवून मटका जुगार अड्डे, पत्त्याचे क्लब, पणती पाकोळी सारखे सोरट आदि सर्व प्रकारचे जुगार अड्डे सुरू करून तीनही पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांकडून सर्वसामान्य नागरिकांची लूट केली जात आहे. पुणे शहर पोलीस सातत्याने कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हेगार चेकिंग करीत आहेत. गुन्हेगार चेकिंग करत असल्याच्या बातम्या पुणे शहर पोलीस आयुक्तालय कडून प्रसिद्ध केला जात असल्या तरीही वास्तवात मात्र पुणे शहर पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनला संघटित गुन्हेगारांनी अक्षरशः ऑल आऊट केलं की काय अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे या सर्व गंभीर प्रकरणाकडे पुणे शहराचे पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने फैलावर घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

मध्यवर्ती शहरात कोयता हल्ला आणि पुणे शहर पोलीस खडबडून जागे झाले –
मध्यवर्ती पुणे शहरातील सदाशिव, नारायण पेठमध्ये विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला झाल्यानंतर, पुणे शहर पोलीस खडबडून जागे झाले. दरम्यान त्याच्या आदल्या दिवशी सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांनी वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलेला होता. असाच प्रकार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेला होता. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळ्यांचे मनोधर्य लक्षात घेता, पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा यांना कटाक्षाने आदेश देऊन प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत स्वतंत्रपणे कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हेगार चेकिंग करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. याच बरोबरीने सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी देखील स्वतंत्र मोबाईल क्रमांक देऊन गुन्हेगारांबाबतची माहिती पोलीसांना कळविण्याचे पुणेकरांना आवाहन केले.
मागील 15 दिवसांमध्ये संपूर्ण पुणे शहरातील पोलीस स्टेशन हद्दीत कधी नव्हे एवढे पोलीस चाळी, वाड्या, वस्ती, झोपडपट्टींच्या गल्लीबोळातून अक्षरशः पोलिसांनी रस्ते पिंजून काढले. जागोजाग पोलीस दिसून येत होते. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. त्याचबरोबर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून परिमंडळ 1 ते 5 व त्यांच्याकडील पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून शनिवारी मध्यरात्रौ 2 वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन व तपासणी करण्यात आली. या कोंबिंग ऑपरेशनमध्ये 1,824 गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी 577 गुन्हेगार मिळून आले आहेत. या विशेष मोहिमे दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालय मध्ये एकूण 13 आर्म ॲक्ट गुन्ह्यामध्ये एकूण 13 आरोपी अटक करून त्यांच्याकडून दोन पिस्टलसह सात जिवंत काडतुसे तसेच बारा धारदार हत्यारे असा एकूण 85 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 1 ते 5 मधील पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा यांच्याकडून मोठ्या कारवाया करण्यात आल्याची माहिती पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तात नमूद आहे. या कारवाईमध्ये आर्म्स ॲक्ट च्या एकूण 13 कारवाया करून तेरा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई प्रोहिबिशन ॲक्ट नुसार एकूण 43 कारवाया केल्या असून त्यात 44 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मपोका क 142 प्रमाणे पाच कराव्या करण्यात आले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. जुगार ॲक्ट नुसार 19 कारवाया करून 46 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेकडील विशेष कामगिरी एकूण चार ठिकाणी करण्यात आली असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. एनडीपीएस नुसार एक ठिकाणी कारवाई केली असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे एकूण 85 ठिकाणीचे 155 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आता ही झाली सरकारी आकडेवारी, आणि सरकारी कारवाई… परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे…

शिवाजीनगर पोलीस स्टेशन- सासु ड्रग माफिया तर जावई गॅम्बलर-
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका प्रतिष्ठित व अतिसंवेदनशिल ठिकाणी मोक्का व एमपीडीएतील संघटित गुन्हेगारी टोळीतील सदस्याने मटका जुगार अड्डा मागील एक-दीड महिन्यापासून सुरू केला असल्याची बाब समोर आले आहे. ही बाब पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील पोलीस नियंत्रण कक्षाला कळल्यानंतर, मागील सात दिवसा पैकी एकदाही कारवाई करण्यात आली नाही. मुंबई बाजार, कल्याण बाजार, ओपन, क्लोज, याच्या सर्व मटका जुगारीच्या चिट्ट्या पोलीस नियंत्रण कक्षाला सादर करून देखील अद्याप पर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही. याचा अर्थ नेका काय घ्यायचा….
संबंधित संघटित गुन्हेगाराच्या जुगार अड्ड्यामध्ये पोलिसांची भागीदारी असल्याची चर्चा होत आहेत. थोडक्यात याबाबतची मिळालेली खबर खरी असल्यानेच कदाचित या बेकायदेशीर व अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान संपूर्ण शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मिळालेल्या माहितीनुसार संघटित गुन्हेगारांनी संपूर्ण शिवाजीनगर पोलीस स्टेशनची अक्षरशः चाळण केली आहे की काय अशी परिस्थिती दिसून येत आहे. शिवाजीनगर गावठाण ते जंगली महाराज रस्ता, पुणे मनपा दगडी पायरी ते जुना एसटी स्टँड, हॉटेल सत्कार ते सागर हॉटेल एवढेच नव्हे शिवाजीनगर न्यायालय, पुणे मनपा इमारत, डी. एस. के. च शोरूम, ज्ञानेश्वर पादुका…. आदि… आदि… जाईन तिथं बेकायदेशीर स्वरूपाचे व्यवसाय सुरू असल्याचे समोर येत आहे याच्यावर कळस म्हणजे शिवाजीनगर पोलीस लाईन मध्ये पाण्याच्या टाकीजवळ आणि तिथून पुढे न.ता.वाडीत देशी दारू दुकानाबाहेर जुगार अड्डे बेमालूमपणे चालवले जात असल्याचे समोर आले आहे. कोणी चिट्या घेते, कोणी मोबाईलवर बसून ऑनलाईन आकडे घेते, कुणी ऑनलाइन पेमेंट करते अशी आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनची अवस्था असल्याचे सांगितले जात आहे.

 शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत तर सासू ड्रग माफिया आणि जावई गॅम्बलर असे दिसून येत आहे. दरम्यान याबाबत काही प्रश्न उपस्थित होते आहे ते असे की, स्थानिक पोलिसांना याबाबत काहीच माहिती नाहीये का? गुन्हे शाखा यांना देखील माहित नाहीये का? मग कोंबिंग ऑपरेशन कशाच्या आधारावर केलं जातं? काय निकष वापरले जातात? कोणते आरोपी चेक केले जातात? चेक केल्यानंतर कोणाला अटक केली जाते? किती तडीपार गुन्हेगारांचे पुणे शहरात वास्तव्य असून ते आजही मटका जुगार अड्डे व खाजगी सावकारी चालवीत आहेत? याविषयी जर पोलिसांना माहिती नसेल तर पुणे शहर पोलिसांना नेमकं काय माहिती आहे याविषयी पोलीस आयुक्त व सह पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी पोलीस दलाची झाडाझडती घेणे आवश्यक ठरत आहे.

शिवाजीनगर-खडकी भाई-भाई-
शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या लगतच रस्त्याच्या पलीकडे खडकी पोलीस स्टेशन असून या खडकी पोलीस स्टेशन हद्दीतही मागील अनेक वर्षांपासून वर्षानुवर्ष जुगार अड्डे चालवले जात आहेत. मग त्यात खडकी रेल्वे स्टेशन ते बोपोडीचा पेट्रोल पंप, बोपोडी पेट्रोल पंप ते डीपी रोड औंध ते खडकी भाजी मंडई या सर्व ठिकणी दे दणादण, मटका जुगार अड्डे, पत्त्यांचे क्लब, बेमालूमपणे सुरू आहेत. आता या अवैद्य धंद्यावर दहावी, बारावी किंवा पदवीधर झालेले किंवा यूपीएससी, एमपीएससी परीक्षा देऊन थकलेल्या अशा बेरोजगारांना मटक्याच्या चिट्या लिहिण्याचे काम दिले आहे का? तर मुळीच नाही. येथील जुगार अड्ड्यावरील पंटर, रायटर या सारखी कामे करणारे बहुतांश इसम हे कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यातील आरोपी असून ते संबंधित हद्दीतील ठिकाणच्या कारागृहातून बाहेर आलेले आरोपी आहेत, अशी माहिती देखील समोर आलेली आहे. आता खडकीच्या संदर्भामध्ये थेट पोलीस आयुक्तालय व तेथील अधिकाऱ्यांची नावे घेतली जातात. तेथील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नावे घेतली जातात. अमूक एक इसत त्या साहेबांच्या कनेक्ट मध्ये आहे, तो त्या साहेबांच्या कनेक्शन मध्ये आहे, तो थेट साहेबांपर्यंत पोहोचू शकतो, अशा प्रकारच्या बातम्या बाहेर पसरवल्या जात आहेत. नेमकी वस्तूस्थिती काय आहे? खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एवढा काळा पांढरा बाजार सुरू असताना सहाय्य पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त कोंबिंग ऑपरेशन दरम्यान कोणत्या गुन्हेगारांना चेक करतात यावर देखील सह पोलिस आयुक्तांनी कटाक्षाने नजर ठेवणे आवश्यक आहे.

विश्रांतवाडी म्हणजे, खडकी, शिवाजीनगराचा सख्खा शेजारी-
शिवाजीनगर व खडकी पोलीस स्टेशनला लगत असणारे विश्रांतवाडी पोलीस स्टेशन असून इथे देखील संघटित गुन्हेगारांचे साम्राज्य निर्माण झालेला आहे. आणि हे वर्षानुवर्ष सुरू आहे. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या लगतच असलेल्या राजीव गांधी नगर वसाहतीत पासून ते भीमनगर मच्छी मार्केटमध्ये जुगारीचे बाजार सुरू आहेत. भीमनगर, वडारवाडी, राजीव गांधी वसाहत तिथपासून ते शांतीनगर झोपडपट्टीमध्ये जुगारीचे बाजार भरत आहेत. रस्त्यावर गुटखा खाऊन पचापच पिचकारी मारून सर्व भिंती आणि रस्ते रंगवण्यात आल्याने विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचा चौकच गुटख्याने रंगलेला आहे. मटक्यांच्या रंगबिरंगी चिठ्ठ्या, पोलीस स्टेशनच्या चौकातच हवेत उडून आलेल्या असतात की टाकलेले असतात आता याचा शोध घेणे आवश्यक ठरत आहे. एकंदरीत शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्यापासून शोधायला सुरुवात झाली आणि लगतच्या दोन पोलीस स्टेशन हद्दीतल्या गैरकारभाराच्या सर्व बातम्या समोर आलेल्या आहेत.

प्रामाणिक कर्मचारी आणि पोलीस नियंत्रण कक्षाविषयी दोन शब्द-
पुणे शहर दलामध्ये अतिशय प्रामाणिक असलेले अनेक अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यांच्यामुळेच आज या त्रिकुटामध्ये काय चाललं आहे, ही माहिती वृत्तपत्राच्या समोर आली आहे. संबधित बेकायदेशिर गुन्ह्यांची माहिती नियंत्रण कक्षाला कळवून देखील कारवाई होत नसेल तर आता जाब विचारायचा तरी नक्की कोणाला असा प्रश्न निर्माण होतो. पोलीस नियंत्रण कक्ष याचा विचार करता, केवळ शिक्षा म्हणून काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली केली जाते, असा आजवरचा अनुभव आहे. थोडक्यात संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याने कर्तव्यात कसूर केली म्हणून त्यांची कार्यकारी पदावरून बदली करून त्यांना अकार्यकारी पदावर पदस्थापना दिली जाते.

अकार्यकारी असलेल्या पोलीस नियंत्रण कक्षात आल्यानंतर हेच अकार्यकारी पदावरील अकार्यक्षम म्हणून गणले गेलेले अधिकारी तिथे असताना देखील संबंधित पोलीस स्टेशनला जाब विचारू शकत नाहीत एवढे मोठे हे दुर्दैव आहे. त्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना, कारवाई म्हणून नियंत्रण कक्षात पाठवु नये. अन्यथा इथेही नियंत्रणाला अनियंत्रित केले जाते, त्याचा हा पुरावा आहे.
 वरील सर्व बाबी लक्षात घेता पोलीस आयुक्त, सह पोलिस आयुक्तांनी या प्रकरणावर गांभीर्याने लक्ष देऊन गुन्हेगारांची झाडाझडती तर घेतलीच पाहिजे. परंतु खात्याची देखील झाडाझडती घेणे आवश्यक ठरत आहे. आगामी काळात गणेशोत्सव जवळ येत आहे, महापालिकेच्या निवडणुका कोणत्या क्षणी जाहीर होऊ शकतात. अशा परिस्थितीत संबंधित सर्व पोलीस स्टेशनसह सर्व गुन्हे शाखांमध्ये सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे आवश्यक ठरत आहे.

दरम्यान खडकी पोलीस स्टेशन मधून याच कारणामुळे ताम्हाण्यांची बदली झाली परंतु नवीन आलेले अधिकारी देखील जुन्याच अधिकाऱ्यांचा कित्ता गिरवत असतील तर याबाबत पोलीस आयुक्तालय खडकी पोलीस स्टेशन हद्दीबाबत कोणता निर्णय घेणार हा कळीचा मुद्दा ठरत आहे. विश्रांतवाडीतही पोलीस स्टेशनच्या समोर नाकावर टिच्चुन मटका जुगार अड्डे आणि हातभट्टीचे फुगे विक्री होत असतील तर अशा अधिकाऱ्यांचे औक्षण सह पोलिस आयुक्तांनी कसे करावे याविषयी मनात शंका निर्माण होत आहे. ही सर्व विनानाव अर्धीच यादी आहे. इति. शिवाजीनगर पोलीस स्टेशन...