Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहरातील गुन्हेगारांवरील नियंत्रण आणि निर्मूलनाचा पुराणिक पॅटर्न

pune police 2022

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/नॅशनल फोरम/
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील ऑनलाईन लॉटरी जुगार अड्ड्यावर कारवाई करून सुमारे 55 आरोपींना अटक करण्यात आली तर साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतही सहा लाख रुपयांचा मुद्देमाल व 40 आरोपी अटक केले आहेत. मागील पाच महिन्यांपूर्वी श्री. राजेश पुराणिक यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आज जुलै अखेर पर्यंत सुमारे 40 पेक्षा अधिक ठिकाणी अवैध व बेकादेशिर धंदयावर कारवाया केल्या आहेत. गुन्हेगार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे कायमचे निर्मूलन व नियंत्रण करण्यासाठी, कायदयाव्दारे स्थापित कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने त्यांनी कर्तव्य बजाविले असल्याचे त्यांच्या आजपर्यंतच्या कारवाई वरून दिसून आले आहे.

काल शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्डयावरील नॅशनल फोरमच्या बातमी मध्ये पुराणिक पॅटर्न म्हणून उल्लेख केला. त्यावेळी अनेकांनी पुराणिक पॅटर्न म्हणजे काय, थोडक्यात आम्ही (पोलीस) काम करीत नाहीये काय असे प्रश्न उपस्थित केले. बातमीच्या माध्यमातून कुणाला मोठे किंवा लहान दाखविण्याचा हेतू नाहीये. पुणे शहर पोलीस दलाचे कामकाज व पोलीसांची गुन्हेगारांविरूद्धची कारवाई मी मागील 28/30 वर्षांपासून पाहतच आहे.  अगदीच 15/20 वर्षापूर्वी खात्याचा दबदबा रफ अन्‌‍ टफ्फ पोलीस अधिकारी. त्यामुळे गुन्हेगारी मंडळी पोलीसांना चळाचळा कापत असायची. पोलीस निरीक्षक रँक मध्ये विचार करायचा तर दारायस इराणी, शामराव धुळूबुळू यांची नाव घेता येतील. आजचे जुने आमदार, जुने नगरसेवक जे हयात आहेत, त्या सर्वांना दारायस इराणी यांनी त्यांच्या बुटाचा कसा तिर्थप्रसाद दिलाय हे सांगायचं तर दोन पानं भरून जातील. एवढे मान्यवर आणि एवढा दरारा असायचा. 
कामकाजाची तीच पद्धत आता राजेश पुराणिक यांच्यामध्ये दिसत आहे. मृदु स्वभाव असल्याने बोलण्यात आक्रमकता कधीच दिसून येत नाही. परंतु कर्तव्यावर असतांना, कायदयाची परिणाकारक अंमलबजावणी कशी केली जाते ते आपण त्यांच्या मागील पाच सहा महिन्यातील कारवाईवरून समजुन येत आहे. 

काय आहे पुराणिक पॅटर्न

  1. जुगार खेळणारा व खेळविणारा दोघेही तितकेच दोषी. त्यामुळे जुगार अड्डा चालविणाऱ्यांवर कारवाई करतांना, जुगार खेळतांना आढळुन आल्यास त्याच्यावरही इतिहासात प्रथमच करवाई करण्यात आली.
  2. पुणे शहर पोलीसांनी मागील अनेक वर्षात, अनेक जुगार अड्डयावर किंवा मसाज पार्लर, वेश्याव्यवसायावर कारवाई करतांना, केवळ या ठिकाणी असलेल्या पंटरवर कारवाई केली आहे, परंतु राजेश पुराणिक यांनी जुगार अड्डा मालक, रायटर, पंटर आणि जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करून जुगार प्रतिबंध कायदा, महिलांचा अपव्यापार कायदा, सायबर क्राईम नेमका काय आहे दाखवुन दिले.
    आज पर्यंतची पुणे शहर पोलीस दलाची कारवाई म्हणजे प्रत्येक जुगार अड्डयावरील दोन दोन पंटर बोलावून घेणे आणि जुगार अड्डयावर कारवाई केली म्हणून रेकॉर्डला दाखविणे एवढेच काम केले असल्याचे ऐकिवात आहे. श्री.राजेश पुराणिक यांच्यासारखी कारवाई आजपर्यंतच्या इतिहासात झाली नाही.
  3. जुगार ज्या मुद्देमालाच्या आधारे व ज्या ठिकाणाहून चालविला जातो, तेथील सर्व मुद्देमालावर देखील कारवाई होवू शकते हे श्री. राजेश पुराणिक यांनी दाखवुन दिले आहे. जुगार अड्ड्यावरील टेबल, खुर्ची, सोफे, टिव्ही, कॉम्प्युटर, फॅन, एसी, जुगार जर दुचाकी व चारचाकी वर घेतला जात असेल तर ती वाहने देखील जप्त करण्यात आली आहे. थोडक्यात जुगाराच्या साहित्यासह एकुण सर्व रक्कम जप्त केली आहे.
    आजपर्यंत जुगार अड्डयावर जेवढ्या कारवाया झाल्या, त्या सर्व कारवाईत दोन हजार, पाच हजार जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंतची रोकड जप्त केल्याचा इतिहास आहे, तथापी श्री. राजेश पुराणिक यांनी आजपर्यंत जेवढ्या कारवाया केल्या आहेत, त्या सर्व दोन लाखांपासून ते 8/ 10 लाखापर्यंत मुद्देमाल व रोकड जप्त केली आहे. थोडक्यात पुणे शहर पोलीस दलाने जुगार अड्ड्यांवर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये मुद्देमालासह जप्त करण्यात आलेली रोकड / कॅश कमी दाखविली जात होती हे सिद्ध होते.
  4. जुगार अड्डे, क्लब, वेश्या व्यवसाय, मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, गांजा, पन्नी, एम.डी व इतर अंमली पदार्थांची विक्री, देशी विदेशी दारूची तस्करी ह्या व इतर अशा सर्व अवैध व बेकायदेशिर धंदयात शक्यतो गुन्हेगार मंडळींचा अधिक संख्येने भरणा आहे. नागरीक ती गरज म्हणून त्याच्याकडे आकर्षिले जातात. त्यामुळे गुन्हेगारांना याच धंदयातुन मोठी कमाई होत असून, त्यांच्या धंद्यासाठी नव नवीन पंटर थोडक्यात भाई तयार होत आहेत. त्यामुळे अवैध धंदयाचे सरसकट निर्मूलन करीत असतांना, अशा प्रकारच्या अवैध धंदयाच्या ठिकाणी येणाऱ्यांवर देखील कठोरपणे कायदयाचा बडगा उगारल्यामुळे अवैध धंदयाचे ग्राहक देखील घाबरून गेले आहेत. थोडक्यात अवैध धंदे आपोआप बंद होतील अशी धारणा व्यक्त करण्यास काहीच हरकत नसावी.
  5. अवैध धंदयातून मोठी कमाई होत असल्यानेच, काळा पैसा व्हाईट करण्याच्या उद्देशाने पुणे शहरात खाजगी सावकारी बोकाळली आहे. खाजगी सावकारीने पुणे शहरात दररोज हत्या होत आहेत. रंजला, गांजलेला, अडला- नडलेला तो सर्वसामान्य नागरीक असो की एखादा छोटा मोठा उद्योग करणारा नागरीक. हात उसने पैसे घेण्यासाठी सावकारीच्या जाळ्यात ओढला जातो. लाखाची रक्कम असेल तर 5 टक्के, लहान रक्कम असेल तर 10 टक्के, 15 टक्के व कुठे कुठे तर 20 टक्के व्याजाने पैसे दिले जात आहेत. त्या पैशाची वेळेवर परतफेड केली नाही तर ह्याच खाजगी सावकाराने युवकांच्या हाती गावठी कट्टे, पिस्टल, सत्तुर सारखी हत्यारे दिली गेली असल्याचे दिसून येते, त्याच हत्याचारांचा धाक दाखवुन व्याजाचे पैसे वसुल केले जात आहेत. पैसे दिले नाही तर धाक दाखविण्यासाठी दिलेल्या हत्यारांचा वापर करून नागरीकांचे मुडदे पाडले जात आहेत. त्यामुळे श्री. राजेश पुराणिक यांनी याच अवैध व बेकादेशिर धंदयावर कारवाई करून त्याचे निर्मूलन करण्याचे काम हाती घेतले आहे, पूर्णपणे निर्मूलन होणार नसले तरी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळू शकते हा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. त्यामुळे राजेश पुराणिक यांची कारवाई वाईट आहे असे कसे म्हणायचे…
  6. अवैध व बेकायदेशिर धंदे करणारे श्री. राजेश पुराणिक यांच्या नावाने कडाकडा बोटं मोडत आहेत. साहजिकच ते बोटे मोडणारच. परंतु खात्यातील मंडळी तरी कुठे आरती करीत आहेत….. एक एक आरोप करीत सुटले असल्याचे ऐकिवात आहे. थोडक्यात वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांची बदली जेंव्हा होईल, तेंव्हा होईलही. बदली झाल्यामुळे त्यांच्या अंगातील पोलीसपण थोडेच बदलणार आहे काय…. पाच/सात वर्षाने सेवानिवृत्त झाले तरी त्यांचे लॉ झाले आहे. ब्लॅक कोट परिधान करून न्यायालयातही ते दिसतील त्यात आश्चर्य वाटायला नको. तसेही पाहता बदली, पदोन्नती, पदस्थापना ह्या शासकीय कर्तव्यावरील प्रत्येक खात्यातील महत्वाचा भाग असतो. तथापी कायदयाव्दारा स्थापित घटनात्मक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर, त्या पदाला न्याय देण्याच काम होणे आवश्यक आहे.

निगरगट्ट पुणे शहर पोलीस दल –
पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस दलातील आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून कामजाची चतुःसूत्री अंमलात आणली आहे. गुन्हे रोखणे, प्रतिबंध करणे आणि ते उघडकीस आणण्यासाठी फ्रंटलाईन पोलिसिंग, कम्युनिटी एगेजमेंट, सर्वसमावेश तपास आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करून गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचे काम केले आहे. श्री. अमिताभ गुप्ता हे 1992 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते प्रतिष्ठीत अशा आयआयटी कानपूरचे विद्यार्थी आहेत. या शिवाय ते मागील 29 वर्षांपासून पोलीस सेवेत असल्याने त्यांनी आज पर्यंत गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर आजपर्यंत मोक्काच्या 86 व एमपीडीए खाली 72 गुन्हेगारांना स्थानद्ध केले आहे.
पोलीस आयुक्त यांच्या सर्व प्रकारच्या केडर बैठकीत प्रत्येकाला समज देवून देखील त्याची परिणामकारक अंमलबजावणी होत नसल्यानेच त्यांनी अनेकांना मेमो देणे, इन्क्रीमेंट स्टॉप सारखी शिस्तभंगाची कारवाई करूनही पाहिली असल्याचे ज्ञात आहे. कारवाईची यादी दिली तर सगळेच म्हणतील किती निगरगट्ट आहेत हो, हे पुलिस…. असेच उद्गार तोंडातून बाहेर येतील. यामुळेच आम्ही गुन्हेगारांचे निर्मूलन आणि नियंत्रणचा पुराणिक पॅटर्न म्हटल त्यात गैर ते काय आहे…..