Thursday, April 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यात कोट्यवधी रुपयांच्या पेट्रोल- डिझेल चोरीचे रॅकेट, सामाजिक सुरक्षा विभागाच्या राजेश पुराणिक यांनी केला पर्दाफाश…

Petrol-diesel theft racket
  • लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील संबंधित डिझेल टँकर मधुन डिझेल चोरी प्रकरणात तपास व्याप्ती वाढली.
  • टँकर लॉबीला झुकते माप,
  • बीपीसीएल डेपोचे सुरक्षा कवच भेदुन काही टँकर असे दोन – दोन डीपरॉडच्या मदतीने पेट्रोल व डिझेलची चोरी करत असल्याचे दिसुन येते.
  • एचपीसीएल , बीपीसीएल व इंडीयन ऑईल या तिनही डेपोतून दररोज सुमारे सातशे ते आठसे टँकर्स बाहेर पडतात
  • या व्यवसायात गेल्या अनेक वर्षापासुन अविरतपणे सुरु असलेल्या चोरीच्या या गोरख धंद्यात शासनाचे पेट्रोल व डिझेलच्या महसुलाचे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.

पुणे/दि/ प्रतिनिधी/
लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील बीपीसीएल डेपोतून बाहेर पडलेल्या टँकरमधून पेट्रोल डिझेल चोरीचे रॅकेट पकडल्यानंतर त्या घटनेबाबत दाखल गुन्ह्याचा तपास सामाजिक सुरक्षा विभागाकडुन सुरु करण्यात आला आहे . सदर गुन्ह्यात पेट्रोल व डिझेल चोरीचे रॅकेट चालवाणारा आरोपी बालाजी मधुकर बजवळकर व त्याचा भाऊ दत्तात्रय गजेंद्र बजवळकर त्यांना या रॅकेटमध्ये सक्रिय सहभाग देणारा आरोपी उत्तम विजय गायकवाड रॅकेटसाठी पेट्रोल डिझेलने भरलेला टँकर पुरवणारा टँकर चालक अजिक्य मारुती शिरसाठ व टँकर ट्रान्सपोर्टचा मॅनेजर साहिल दिलीप तुपे यांना पोलीसांनी घटनास्थळीच टँकर क्रं . एमएच 12 एसएक्स 2559 व अन्य मुद्देमालासह अटक केली आहे .


पेट्रोल व डिझेल चोरी प्रकरणाचे तपासात डुप्लीकेट डीप रॉडचा वापर करणे व करु देणे , ॲटोमाईज्ड कॅलीबरेटेड सिस्टीम असतांनाही बकेटचा वापर करुन टॉपअपचा वापर करून काही टँकर लॉबीला झुकते माप देणे , टँकर फॅब्रिकेशन डीझाईनमध्ये फेरफार करून टँकरच्या कप्यात कॅव्हिटी निर्माण करुन त्याद्वारे पेट्रोल व डीझेलची हेराफेरी करणे , शंकर पाईपचा वापर करणे , व्हेईकल ट्रेकींग सिस्टीम मधील अलर्टकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करणे , टँकरचे डीझेल फ्युएल टॅकमधील डीझेल मधील हेराफेरी , ईव्हॅपोरायझेशन रिपोर्ट मधील गैर व्यवहार टेंडर सिस्टीम व ॲटोमाइज्ड ॲलोकेशन मधील हेराफेरी वगैरे प्रकरणात सविस्तर तपास करण्यात येत आहे .
या प्रकरणात आता पर्यंतच्या चौकशीमधुन मिळालेल्या माहिती नुसार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडुन पेट्रोल व डिझेलची वाहतुक करणारे एकुण 13 टँकर ताब्यात घेण्यात आले आहेत. या टँकरमध्ये पेट्रोल डिझेलची वाहतुक करतांना विशिष्ठ पध्दतीने फेरफार करुन पेट्रोलजन्य पदार्थ चोरी करून विक्री करीत असल्याचा संशय आहे . विशेष म्हणजे पोलीसांनी घटनास्थळावरुन पेट्रोल व डिझेलच्या साठ्यासह जप्त केलेल्या टँकरमध्ये पेट्रोल व डिझेल मोजण्याचे एकक म्हणुन वापरण्यात येणारे 1 ओरीजनल एक डुप्लिकेट असे 2 पितळी डिपरॉड जप्त केले असुन त्यांचे लांबीतला व मोजणितला फरक उघड्या डोळ्यांनीही दिसुन येत आहे .
दोन्ही डिपरॉडची न्याय वैज्ञानिक परीक्षण व वजनमापे निरीक्षकाकडून परीक्षण करुन अभिप्राय मागवण्यात येत आहे. विशेष म्हणजे बीपीसीएल डेपोचे सुरक्षा कवच भेदुन काही टँकर असे दोन दोन डीपरॉडच्या मदतीने पेट्रोल व डिझेलची चोरी करत असल्याचे दिसुन येत आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने पुणे पेट्रोल डिलर्स असोशिएशनचे पदाधिकारी यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता यांची गेल्याच आठवड्यात भेट घेवुन गुन्ह्याचे कारवाईबाबत तसेच शिघ्र तपासावर समाधान व्यक्त केले आहे . तसेच त्यांनी गुन्ह्याच्या तपासात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे .
गेले कित्येक दिवस राजरोसपणे सुरु असलेल्या या पेट्रोल व डिझेल चोरी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन त्याच्या मुळापर्यंत जावुन सर्व संबंधिताविरुध्द कारवाई करण्यासाठी पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेकडुन या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता ज्या अन्य ठिकाणी असे प्रकार चालत आहे तेथेही माहिती काढुन कारवाई करण्यात येणार आहे . लोणीकाळभोर परीसरात एचपीसीएल , बीपीसीएल व इंडीयन ऑईल अशा तिनही पेट्रोलीयम कंपन्यांचे डेपो कार्यरत असुन तेथे रेल्वे वॅगन्सद्वारे पेट्रोल , डिझेल इथेनॉल सारखे पेट्रोलियम प्रॉडक्ट आणले जातात.
या डेपोत पेट्रोलियम पदार्थांचा साठा करुन पेट्रोलपंप डिलर्स , रेल्वे , मोठे प्रकल्प इत्यादींना पेट्रोलियम पदार्थांचा सप्लाय त्यांचे मागणीनुसार टँकरद्वारे करण्यात येतो . या तिनही डेपोतून दररोज सुमारे सातशे ते आठसे टँकर्स बाहेर पडतात, या व्यवसायात गेल्या अनेक वर्षापासुन अविरतपणे सुरु असलेल्या चोरीच्या या गोरख धंद्यात शासनाचे पेट्रोल व डिझेलच्या महसुलाचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. याबाबत तपासकामी कोणत्याही प्रकारची उपयुक्त माहिती असल्यास तपासी पोलीस अधिकाऱ्यास संपर्क साधण्याबाबतचे आवाहन पुणे पोलीसांनी केले आहे .
या गंभिर चोरी प्रकरणाचा तपास श्री अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर , श्री . संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त श्री . रामनाथ पोकळे मा . अपर पोलीस आयुक्त सोो , गुन्हे , पुणे शहर व श्री श्रीनिवास घाडगे पोलीस उप आयुक्त , गुन्हे , पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्याकडुन करण्यात येत आहे .